Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

चिपळूणला १६-१७ जानेवारीला कोकण लोककला महोत्सव

चिपळूणला १६-१७ जानेवारीला कोकण लोककला महोत्सव
Advertisements

चिपळूण : येत्या १६ आणि १७ जानेवारीला येथे कोकण लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

निसर्गसौंदर्याबरोबरच समृद्ध लोककला, लोकपरंपरा, लोकसंगीत आणि सांस्कृतिक वैभवाची शिदोरी लाभलेल्या कोकणच्या अस्सल सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एक्सप्लोर कोकण, कोकण रिपोर्टर आणि व्हिजन थ्री न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा लोककला महोत्सव होणार आहे. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा दोन दिवसीय महोत्सव पार पडणार असल्याची माहिती आयोजक सतीश कदम, मकरंद भागवत आणि राजेंद्रकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील मंत्री, खासदार आमदार, विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नामवंत उद्योजक, व्यावसायिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचा हा सोहळा सर्वांच्या सहभागातून अधिक व्यापक आणि भव्य व्हावा. हा यामागील उद्देश आहे.

कोकणच्या मातीत रुजलेले दशावतार, पालखी सोहळ्यातील पारंपरिक नृत्य, नकटा, संकासूर, जाखडी. कोळी नृत्य चपई नृत्य, काटखेळ, वारली नृत्य, धनगरी गजा नृत्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, कातकरी नृत्य अशा अनेक आकर्षक लोककला महोत्सवात सादर होणार आहेत. या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण म्हणजे पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा स्वतः उपस्थित राहून प्रसिद्ध तारपा वाद्याचे सादरीकरण करणार आहेत. याशिवाय कोकणवर आधारित स्थानिक कलाकारांचे आकर्षक नृत्य सादर करून अन्य पारंपरिक कलाप्रकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कोकणच्या लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीकडे तिचे हस्तांतर करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे. यावेळी लोककलेच्या क्षेत्रात आयुष्यभर योगदान करणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंतांचा विशेष गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मानही करण्यात येणार आहे.

कोकणची लोककला केवळ मनोरंजनाची परंपरा नसून ती येथील लोकजीवन, श्रद्धा इतिहास आणि सामाजिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात पारंपरिक लोककला मागे पडू नयेत, कलाकारांना योग्य सन्मान आणि व्यासपीठ मिळावे तसेच नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख व्हावी, या व्यापक भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण लोककला महोत्सव केवळ दोन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या मातीचा, परंपरेचा, लोककलावंतांच्या कलेचा आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचा उत्सव ठरणार आहे. कोकणच्या लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version