Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

तळेरे महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प

प्रा. विनायक दळवी

Advertisements

तळेरे (कणकवली) : येथील मुंबई विद्यापीठाशी संलग्न विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी केली असून त्यांनी सर्व समाजासमोर दानाचा एक मोठा आणि आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. त्याचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे अवयवदान मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केलेल्या या उपक्रमात विनायक दळवी यांच्यासह ६४ जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली.

आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कृषी उद्योजक व्ही. के. सावंत उपस्थित होते.

समारंभाचे अध्यक्षपद कॅप्टन सौ. नीलिमा प्रभू यांनी भूषविले. यावेळी सत्यवान प्रभूही उपस्थित होते.

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या म्हणीला सार्थ ठरविणारे कार्य दळवी महाविद्यालयाने केले. आपल्या पश्चावत दुसऱ्याच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्याची किमया अवयवदान आणि देहदानात आहे. श्रीकांत आपटे यांच्या सहकार्याने आणि सुधीर पुराणिक यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

तीन वर्षांपूर्वीच महाविद्यालयाला सक्षम करून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हातात महाविद्यालय सोपविण्याची घोषणा विनायक दळवी यांनी केली होती. गेल्या १४ एप्रिल २०२१ रोजी तो संकल्प पूर्ण करून त्यांनी महाविद्यालयाच्या सक्रिय कार्यातून निवृत्ती स्वीकारली. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत स्नेहसंमेलनाचा पहिलाच कार्यक्रम झाला. त्यामध्ये अवयवदानाचा संकल्प विद्यार्थ्यांनी सोडला. श्री. दळवी यांनी क्रीडासंकुल तयार व्हावे म्हणून चार एकर जमीन देऊ केली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आणि भूदाते हेमंत महाडिक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात व्ही. के. सावंत यांनी गणेशपूजन करून केली. महाविद्यालयाची यशोगाथा श्रद्धा साटम हिने पीपीटीच्या साह्याने दाखवली. विनायक दळवी यांनी संस्कृतमध्ये शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत सहाय्यक प्राध्यापक ओंकार बर्वे यांनी संगीतबद्ध करून सादर केले.

महाविद्यालयाचे भूदाते सत्यवान प्रभू यांनी व्ही. के. सावंत यांची ओळख करून कृषीविषयक जीवन परिचय करून दिला. आज समाजात ६४ रक्तदाते मिळतांना कठीण आहे. अशा स्थितीत दळवी महाविद्यालयाने काही तासांत अवयवदानाची कायदेशीर नोंदणी करणारे ६४ दाते उपलब्ध करून दिले, ही खरीच मोठी बाब आहे, असे गौरवोद्गार यावेळी पाहुण्यांनी काढले. त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचाही समावेश आहे.

मृत्युपश्चात अवयवदान या संकल्पनेच्या कृतीचे उद्घाटन व्ही. के. सावंत यांनी विनायक दळवी यांचे ऑर्गन डोनेशन कार्ड दाखवून केले. तसेच पुढील वर्षी दळवी महाविद्यालयाच्या कृषीविषयक परिषदेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते म्हणाले की, दळवी सरांनी ११.२५ एकर जागा महाविद्यालयासाठी उपलब्ध करून दिली. त्यातील ७.२५ एकर जागा स्वकमाईतून क्रीडासंकुल आणि हॉस्टेलसाठी उपलब्ध करून दिली. हे दानही अजोड आहे.

कॅप्टन सौ. नीलिमा प्रभू यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्या म्हणाल्या की, दळवी सरांनी घालून दिलेला कामाचा वसा आपण घेऊन यशाची शिखरे पादाक्रांत करावी. निष्ठा आणि वचनबद्धता हे सूत्र आपल्या जीवनात अंगीकारावे.

समारंभात सुप्रिया काडगे, विशाखा तेरवणकर इत्यादी महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तेजस लाड याची माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी राणे हिने केले, तर हेमंत महाडिक यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version