सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे यांची अक्षरघराला भेट

तळेरे (ता. कणकवली) : निकेतचे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण निकेतला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उद्गार सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे यांनी काढले.

तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी निकेतच्या १५ वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक केले.

श्री. कब्रे मूळचे शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील रहिवासी असून त्यांच्या चित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शने झालेली आहेत. या भेटीदरम्यान कब्रे यांनी ‘अक्षरोत्सव’ मध्ये असलेल्या सर्व संदेशपत्रांची पाहणी केली. अनेकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खरच आनंदाचा दिवस आहे. गेले कित्येक दिवस अक्षरघराला भेट देण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. अक्षरघराची संकल्पनाही भन्नाट असल्याचे ते म्हणाले.
यावेळी चित्रकार प्रकाश कब्रे यांनी निकेत पावसकर यांच्या वाटचालीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अलीकडे निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला निःशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मुंबई सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर, लालबाग येथील आनंदभुवनचे मेघनाथ शेट्टी, लेखक महेश काणेकर, बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट, लोकसत्ताचे वरिष्ठ क्रीडा प्रतिनिधी प्रशांत केणी आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय पोस्टकार्डवरच संदेश का?
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्टकार्डवर आले. तसेच पोस्टकार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहीतरी वेगळी खासीयत असावी, यासाठी संदेशपत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.

तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दीपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कांबळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदीप पाटील, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये, इस्लामपूरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतीश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

निकेत पावसकर यांच्या पत्रसंग्रहाची वैशिष्ट्ये

संग्रहामध्ये जागतिक कीर्तीचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), महम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंडचे पंतप्रधान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कॅरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरिस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मँकगोवन, टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

  • देश-परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज दीड हजार व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा समावेश.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कोकणी, चायनीज, मोडी, ब्राह्मी आणि ब्रेल लिपीतील संदेशपत्रे
  • सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, शास्त्रज्ञ, कलावंत, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, छांदिष्ट, धार्मिक या क्षेत्रातील देश आणि परदेशातील व्यक्तींची संदेशपत्रे
  • नोबेल पुरस्कारप्राप्त, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, फ़िल्मफेअर अवॉर्ड, साहित्य अकादमी पुरस्कारासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या तसेच जागतिक विक्रम केलेल्या महनीय व्यक्तींची संदेशपत्रे
  • तळेरेसारख्या ग्रामीण भागात राहून एका पत्राच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी पत्रमैत्री जुळली.
  • पाच हजारापेक्षा अधिक व्यक्तींशी दहा हजारापेक्षा जास्तवेळा पत्राद्वारे संपर्क.
  • संग्रहाची महाराष्ट्रातील विविध दैनिके आणि वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली. त्याबाबत विविध वाहिन्या, आकाशवाणी केंद्र यावर मुलाखत प्रसारित झाल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरील “नमस्कार मंडळी” या कार्यक्रमात थेट मुलाखत प्रसारित. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रसारित.
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी या संग्रहाची विविध संस्था आणि शाळांनी प्रदर्शने आयोजित केली.
  • विविध पुरस्कारांनी सन्मान
  • छंद प्रदर्शन आणि त्यातून शालेय विद्यार्थ्यांना छंद का जोपासावा, त्याचे आयुष्यात महत्त्व यावर मार्गदर्शन
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply