भाद्रपद शुद्ध चतुर्दशी…म्हणजेच अनंत चतुर्दशी. लोकमान्यांनी राष्ट्रीय हेतूने सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा कालावधी दहा दिवस असा निश्चित केला. त्यामुळे गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी होऊ लागली. परंतु गेल्या काही वर्षात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वाढलेल्या स्वरूपात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघणाऱ्या भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नादात मूळ अनंत चतुर्दशीचे महत्त्व काहीसे विसरायला झाले आहे किंवा आपल्याला माहितीच झालेले नाही. (बऱ्याच जणांना तर चतुर्थी आणि चतुर्दशी यातील फरकच लक्षात न आल्यामुळे अनंत चतुर्थी असेच म्हटले जाते. तेव्हा अनंत चतुर्थी नाही …तर अनंत चतुर्दशी हे प्रथम समजून घेऊ.)
अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेष गणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. ब्रह्मांडात या दिवशी भगवान विष्णूंच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात . शेष देवता विष्णुतत्त्वांशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते. म्हणून शेषाला या विधीत महत्त्व दिले आहे.
या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर होऊन आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने चौदा वर्षे चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करतात. ( मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात, या ग्रंथींचे प्रतीक म्हणून या दोऱ्याला १४ गाठी असतात.) पण हे व्रत सार्वत्रिक नसून कोणी उपदेश केल्यास किंवा कोणाला अनंताचा दोरा सहजगत्या सापडल्यास हे व्रत करतात आणि मग ते कुळात चालू राहते. काही जण १४ वर्षांपर्यंत किंवा काही जण कायमच हे व्रत सुरू ठेवतात. पांडवांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी हे व्रत करण्याचा उपदेश केला अशी आख्यायिका आहे.
१४ प्रकारची फुले , फळे, धान्य आणि नैवेद्य यासह अनंताची पूजा केली जाते. आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या सत्यनारायणाच्या कथेसारखीच याही व्रताची कथा आहे. म्हणजे कोणी संकटात असताना त्याला दुसऱ्या कोणी हे व्रत करण्यास सांगितले. त्यामुळे पुढे त्याचे दुःख निवारण झाले, पण नंतर तो हे व्रत विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या, अशा स्वरूपाची कथा आहे.
सुमंत नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी दीक्षा यांच्या पोटी जन्माला आलेल्या कन्येचे नाव सुशीला. परंतु कन्येच्या जन्मानंतर सुमंतच्या पत्नीचे निधन झाले आणि त्याने पुनर्विवाह केला. पुढे या सुशीलेचा विवाह झाला कौंडिण्य ऋषींशी. पतीसोबत सासरी जात असताना वाटेत एका ठिकाणी काही स्त्रिया अनंत व्रत आचरित असल्याचे पाहून तिने त्या व्रताची चौकशी केली व ते व्रत ती करू लागली. त्यामुळे उभयतांना वैभवाचे दिवस आले. पण श्रीमंतीच्या धुंदीत एके दिवशी कौंडिण्य ऋषींनी सुशीलेच्या हातातील अनंताचा दोरा तोडून टाकले. त्यामुळे त्यांना पुन्हा सर्व वैभव गमवावे लागले. आपल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला आणि मग अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन देऊन पुन्हा हे व्रत करण्यास सांगितले मग पुन्हा त्याचा उद्धार झाला, अशी सर्वसाधारण सत्यनारायणाच्या कथे सारखीच या व्रताची कथा आहे. पण सत्यनारायण व्रताच्या तुलनेत अनंत चतुर्दशीचे व्रत खूपच प्राचीन आहे.
अशा प्रकारे १४ गाठींच्या दोऱ्याची मंत्रांच्या सहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची स्थापना केलेला दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. त्यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. हे कार्य बळ टिकण्याचा कालावधी प्रत्येकाचा कमीअधिक असतो. त्यामुळे प्रतिवर्षी जुने दोरे विसर्जन करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात, ज्यायोगे जीवनात भगवान विष्णूंच्या क्रियाशक्तिरूपी आशीर्वादाने चेतनेला सतत कार्यरत ठेवून आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी वरदान लाभते.
आज कलियुगात सर्व भोगवादी संस्कृतीमध्ये वावरत असताना आपल्या पुराणानुसार सांगितलेल्या परंतु विज्ञानधिष्ठित अशा संस्काराची किमान आपल्याला माहिती असावी या हेतूने आज हा प्रयत्न केला आहे. मंगलमूर्तींच्या १० दिवसांच्या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या पण काहीशा अपरिचित असलेल्या अनंत चतुर्दशीच्या व्रतासंबंधी लिहावे, असे मनात आल्यामुळे हा प्रयत्न केला.
ही लेखनरूपी सेवा गोपालकृष्णार्पणमस्तु ।।
- निबंध कानिटकर
(संपर्क : ९४२२३७६३२७)

