रत्नागिरीत शनिवारी शिक्षक, सुजाण पालक प्रेरणा कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी (दि. १० सप्टेंबर) शिक्षक, सुजाण पालकांसाठी प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षक आणि पालकांनी कार्यशाळेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यजुवेंद्र महाजन

विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्तम होण्यासाठी पालकांची महत्त्वाची भूमिका असते. यासंदर्भात शिक्षक आणि सुजाण पालक प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध प्रेरक वक्ते यजुवेंद्र महाजन यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे, इन्फिगो आय केयर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते यजुवेंद्र महाजन व्यवसाय मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास विषयाचे प्रशिक्षक आहेत. व्यक्तिमत्त्व विकास, सुजाण पालकत्व आदा विषयांवर त्यांनी आजवर दोन हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेतलेले शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची संख्या नऊ लाखांहून अधिक आहे. शिक्षक प्रशिक्षण या विषयावर पुणे विद्यापीठात त्यांनी संशोधन केले आहे. सुमारे ७० हजार शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. दोन लाख विद्यार्थी आणि दहा हजार शिक्षकांना त्यांनी प्रेरणादायी पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. श्री. महाजन यांनी अभ्यास मित्र, करियर मित्र, पालक मित्र, स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास अशी पुस्तके लिहिली आहेत.

श्री. महाजन यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने शिक्षण क्रांती गौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे. आजवर पंधरा संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार दिले आहेत. काही शासकीय पुरस्कारदेखील त्यांना मिळाले आहेत.

श्री. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता रत्नागिरी-हातखंबा महामार्गावर टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेला शालेय शिक्षक, पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply