नारळाचे झाड खर्‍या अर्थाने करू या कल्पवृक्ष

भारतीय संस्कृतीत नारळाला एक महत्त्वाचे स्थान आहे. कोकणची शान म्हणून आंबा, काजू यांच्यासोबतच नारळालादेखील मोठा मान आहे. नारळ म्हणजे रत्नांच्या खाणीमधून शोधून काढलेले रत्नच. पुरातन काळापासून पूजाअर्चा, होमहवनात नारळाचा उपयोग केला जात आहे आणि होत आहे. नारळ हे देवाचे आवडते फळ आहे. कारण नारळाचे वृक्ष असे आहेत की त्याच्या प्रत्येक भागापासून काहीना काही उपयोग होतो. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. नारळाशिवाय कोणतीच पूजाअर्चा पूर्णत्वास येत नाही. कोणत्याही कार्यामध्ये नारळाला अर्पण करूनच कामाची सुरुवात केली जाते. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या घराशेजारी एक तरी नारळाचे झाड असते. कोकणात वर्षाचे बाराही महिने नारळाचा पुरेपूर वापर करून घेतला जातो.

नारळाला शिवशंकराचे प्रतीक मानले जाते. नारळाला असलेले तीन डोळे म्हणजे शंकराचे डोळे मानले जातात. नारळावर असलेले केस म्हणजे शंकराच्या जटा म्हटल्या जातात. त्याचप्रमाणे नारळाचे पाणी म्हणजेच गंगा होय. देवांचे देव शिवशंकराची उपमा नारळाला दिल्याने सर्व फळांमध्ये सर्वश्रेष्ठ फळ म्हणून स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अधिवास असलेल्या आणि आर्थिक संकटमोचक लक्ष्मीस्वरूपी नारळाला अर्पण करून प्रत्येक कामाचा श्रीगणेशा करण्याची पद्धत आपल्या समाजात आहे. कोणताही कार्यक्रम नारळाशिवाय सुरूच होऊ शकत नाही. देवीचा कलश, देवीची ओटी भरण्यासाठी, नववधूची ओटी भरण्यासाठी, देवाला नवस बोलण्यासाठी, होळीमध्ये अर्पण करण्यासाठी, उद्घाटन, समारंभ, पूजा अशा विविध कार्यक्रमांमध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंबा हा फळांचा राजा असला तरी सर्व समाजांमध्ये सर्वगुणसंपन्न म्हणून सांस्कृतिक वारसा लाभलेला नारळ हा सर्वश्रेष्ठ म्हणून सर्वमान्य आहे.

नारळाच्या झाडाचा प्रत्येक अंगाचा वापर होतो, म्हणूनच नारळाला इच्छापूर्ती वृक्षसुद्धा म्हटले जाते. नारळापासून अनेक उत्पादने बनवता येते जसे की, नारळाचे वेफर्स, खवलेले खोबरे, नारळाचे दूध, ओल्या खोबर्‍याचे तेल, नारळाच्या पाण्यापासून व्हिनेगर, कोको पीट, काथ्या, झाडू, नारळाची साखर, करवंटीची 400 पेक्षा जास्त उत्पादने आणि बरेच काही नारळापासून तयार होते.

याशिवाय फॅशन, विविध उत्पादने, फर्निचर, शेती, इंटीरियर डिझाइन, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, लहान मुलांची खेळणी, गुरांचे, माशांचे आणि कोंबडीचे खाद्य, रासायनिक आणि तेलाच्या कंपन्यांमधील कच्चा माल, सौंदर्य प्रसाधने, पॅकेजिंग, ऑटोमोबाइल अशा इतर अनेक क्षेत्रातसुद्धा महत्त्वाची नारळ भूमिका निभावतो. ही सर्व उत्पादने रत्नागिरीतसुद्धा होऊ शकतात.
पण त्याआधी जागतिक वस्तुस्थिती पाहू.

 1. भारत देश नारळ लागवड क्षेत्रामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. उत्पादन क्षमतेमध्ये दुसर्‍या क्रमांकावर तर उत्पादकतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
 2. असे असूनदेखील नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ बनवून निर्यात करण्यात भारत इतर देशांच्या मानाने मागे आहे.
 3. फिलिपाइन्स, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड हे मूल्यवर्धित पदार्थांचे निर्यात करणारे मुख्य देश आहेत.
  महाराष्ट्राची नारळ उत्पादकतेची वस्तुस्थिती बघता महाराष्ट्राचे योगदान 1.4 टक्के एवढेच आहे.

रत्नागिरीबद्दलची वस्तुस्थिती पाहू या. उत्पादनक्षमता 25 लाख नारळ प्रतिमहिना आहे आणि मागणी साधारण 40 लाख नारळ प्रतिमहिना आहे. जवळजवळ 15 लाख नारळांची तफावत आहे. यासाठी आपल्याला इतर राज्यांतून आयात करावे लागते.

ही परिस्थिती बदलायची असेल तर नवीन लागवडीचे क्षेत्र वाढवावे लागेल अथवा आता अस्तित्वात असलेल्या झाडांची उत्पादन क्षमता वाढवावी लागेल. त्यापैकी दुसर्‍या पर्यायावर काम करणे आवश्यक आहे.

मात्र रत्नागिरीतील नारळ बागायतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. झाडावर चढणार्‍या कुशल कामगारांचा अभाव, नारळ लागवडीबददल तांत्रिकदृष्ट्या अज्ञान, खत आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, कीड आणि रोग व्यवस्थापनाचा अभाव, इरिओफाइड कोळी, रुगोज चक्राकार पांढरी माशी तसेच गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव, कोंबकुजव्या रोग, नारळ फळाचा लहान झालेला आकार, परिणामी कमी झालेली उत्पादनक्षमता, नारळ उत्पादनाची अनिश्चितता, योग्य दर न मिळणे अशा या समस्या आहेत.

या सर्वांवर उपाय म्हणून कल्पवृक्ष सुरक्षा मित्र ही देशातील पहिली संकल्पना स्वराज्य एंटरप्रायझेसच्या माध्यमातून 1 जानेवारी 2015 पासून शेतकर्‍यांच्या सेवेसाठी सुरू केली. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. जुलै 2017 मध्ये स्वराज्य एंटरप्रायझेसचे रूपांतर स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमध्ये झाले. ही कंपनी 2015 पासून रत्नागिरी शहरातील नारळ झाडांच्या व्यवस्थापनाचे आणि नारळ वृक्षाच्या सर्व भागांवरील मूल्यवर्धनाचे कार्य करते. रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळधारक आहेत. त्यांच्या वृक्षांची नोंदणी करून पुढे मूल्यवर्धनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया उपक्रमात कंपनी मोठ्या प्रमाणात कार्य करू इच्छिते. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. केरळच्या धर्तीवर नारळ आणि नारळ झाडापासून विविध वस्तू निर्मिती प्रकल्प उभे राहू शकतील.

कोकणातील विखुरलेल्या नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळ आणि नारळाच्या झाडापासून मूल्यवर्धित उत्पादनांचा जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरीमध्ये उभारून मोठ्या प्रमाणात स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणे हा कंपनीचा उद्देश आहे. या अभियानाकरिता कंपनी रत्नागिरी शहरापासून 25 किमी परिघातील दोन लाख नारळ झाडांची नोंदणी करण्याचे काम सुरू करत आहे. त्यामुळे मूल्यवर्धित उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून विखुरलेल्या नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनांचा जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरी तालुक्यात उभारला जाणार आहे. त्यातून 3233 रोजगारांची निर्मिती होऊ शकते. यासाठी कोणाची जमीन संपादित करायची गरज नाही. शिवाय मोठ्या प्रमाणावर होणार्‍या लागवडीमुळे या प्रकल्पाद्वारे कोकणाच्या आकर्षकतेत भर पडेल. हा प्रकल्प हरित प्रकल्पांपैकी एक असेल.

गेल्या 10 वर्षांत नारळाच्या एका झाडापासून शेतकर्‍यांना सुमारे एकूण 10 हजार ते 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असेल. पण कंपनीच्या व्यवस्थापनाच्या प्रणालीत आल्यावर शेतकर्‍यांना पुढील एकूण 10 वर्षांत साधारणत: एका झाडापासून एकूण 77,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते.
एका नारळाच्या झाडाचा सद्यःस्थितीत वार्षिक व्यवस्थापनाचा खर्च 2 हजार रुपये आहे. जास्तीत जास्त नारळ झाड मालकांना लाभ मिळावा म्हणून कंपनीने शाकार वार्षिक व्यवस्थापनाचा दर 1300 रुपये प्रतिवर्षी केला आहे. पण जे नारळ झाड मालक त्यांच्या एकूण झाडांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाडे व्यवस्थापनाला देतील त्यांच्यासाठी हाच दर 1,050 रुपये हा सवलतीचा दर दिला जाईल. यामध्ये एकूण 6 शाकार सेवा (दर दोन महिन्यांच्या अंतराने) देण्यात येतील.

याशिवाय रत्नागिरी शहरापासून 35 किलोमीटरच्या परिसरातील नारळ बागायतदारांना मोफत सेंद्रिय प्रमाणीकरण करून दिले जाईल. सध्या सर्वत्र रसायनविरहित म्हणजेच सेंद्रिय उत्पादनाची जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. पण सेंद्रिय प्रमाणीकरण करणे छोट्या शेतकर्‍यांना शक्य होत नाही. अनेक शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेत असताना सेंद्रिय म्हणून त्यांना विकता येत नाही. कारण जागेचे सेंद्रिय प्रमाणीकरणच केलेले नाही. हेच सेंद्रिय प्रमाणीकरण करण्याची जबाबदारी स्वराज्य अ‍ॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उचलली आहे.

वस्तुतः रत्नागिरीमध्ये नारळावरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मुबलक प्रमाणात नारळाची झाडे एकत्रित नाहीत आणि जी झाडे आहेत त्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे उत्पादनक्षमतादेखील कमी आहे. याच परिस्थितीला उत्तर म्हणून स्वराज्य अॅग्रो अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने रत्नागिरी शहरापासून पस्तीस किलोमीटर परिसरातील दोन लाख नारळाच्या झाडांची शाकार व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकत्र करण्याचा निर्णय घेतला आणि आता कामदेखील सुरू आहे.

नारळाची झाडे शाकार व्यवस्थापन सेवेला देणार्‍या नारळ झाड मालकाची नारळाची झाडे असलेली जागा सेंद्रिय प्रमाणीकरण कंपनीमार्फत मोफत करून देण्यात येईल. यासाठी झाड मालकाने त्याची सर्व नारळाची झाडे शाकार व्यवस्थापनासाठी देणे अनिर्वाय आहे. बागेत सेंद्रिय प्रमाणीकरण झाल्यामुळे त्या बागेत घेतले जाणारे सर्व उत्पादन जसे की आंबा, काजू, सुपारी, मसाल्याची पिके सेंद्रिय म्हणून विकता येऊ शकतात.

कंपनी शाकार व्यवस्थापन प्रणालीच्या खर्चामध्ये नारळ झाड मालकांना पुढील सेवादेखील मोफत देत आहोत.

 1. सहा वेळचे पोषण द्रव्यांची मात्रा, 2. भुंग्याचे औषधोपचार, 3. प्रतिझाड एक हजार रुपयांचा सुरक्षा विमा, 4. नारळ झाडांसाठी केलेला खर्च परत मिळावा यासाठी रत्नागिरीतील महत्त्वाच्या दुकानातून खरेदी केल्यावर खास आमच्या ग्राहकांसाठी सवलत दिली जाईल. हे पहिल्यांदाच होणार आहे.
  त्याच बरोबर कंपनी पुढील तीन मुद्द्यांवर मुख्यतः काम करत आहे : 1. नारळ झाडाचे आरोग्य सुधारणे. 2. नारळ झाड मालकांचे उत्पन्न वाढविणे. 3. स्थानिक पातळीवर किमान 3,200 रोजगारांची निर्मिती करणे.

नारळ झाडांच्या नोंदणीसाठी रत्नागिरी तालुक्यातील तरुण, महिला आणि बचत गटांचे सहकार्य अपेक्षित असून त्यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. जास्तीत जास्त नारळ झाडमालकांनी स्वतःची झाडे व्यवस्थापनाच्या प्रणालीमध्ये देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कंपनीने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

 • तुषार दत्ताराम आग्रे,
  चेअरमन, स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि.
  (संपर्क क्रमांक – 80070 88972)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply