प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना दत्तात्रेय कृष्ण सांडू पुरस्कार

पणजी : गोमंतकीय साहित्यिक, पत्रकार आणि रत्नागिरीतील साप्ताहिक‘कोकण मीडिया’चे लेखक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना मुंबईतील दत्तात्रेय कृष्ण सांडू साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात मानाचा मानला गेलेला हा पुरस्कार त्यांच्या ‘माणसांची हाव सांगा संपणार तरी कधी’ या ललित लेखसंग्रहाला जाहीर झाला आहे.

मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट कथासंग्रह, कवितासंग्रह, बालवाङ्मय आणि संकीर्ण साहित्य या श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळावा, अशी अनेक साहित्यिकांची इच्छा असते. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांसाठी प्रतिष्ठानने पुस्तके मागविली होती. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या २०२१-२२ मध्ये प्रकाशित झालेल्या ललित लेखसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दामाजीनगर मंगळवेढा शाखेने केला होता. त्यावेळी प्रा. अशोक कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दामजीनगर मसाप शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश जडे, दै. दामाजी एक्स्प्रेसचे संपादक दिगंबर भगरे, अॅड. नंदकुमार पवार, प्रा. दत्ता सरगर, यतिराज वाकळे आदींच्या उपस्थितीत प्रकाशन झाले होते.

दै. दामाजी एक्स्प्रेसमधून प्रकाशत झालेल्या ‘मना मातीचा सुगंध’ या साप्ताहिक सदरामधील निवडक लेखांचा हा संग्रह आहे.

  • प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, गोवा (संपर्क : ९०११०८२२९९)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply