रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ९ सप्टेंबरपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने नवनवीन संकल्प केले आहेत. त्याविषयीची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीची स्थापना ९ सप्टेंबर १९७३ रोजी झाली. ग. ल. सोहनी, एकनाथभाई नलावडे, डॉ. रमेश चव्हाण, हेरंब पटवर्धन, सुधीर वणजू यांच्यासारख्या सेवाभावी लोकांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे क्लब सुरू झाला. प्रत्येक वर्षीच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या योगदानामुळे आज क्लबचे कार्य सर्वतोमुखी झाले आहे, असे सांगून डॉ. बेडेकर म्हणाले की, पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रत्नागिरी लायन्स क्लबने रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात लायन्स क्लबने २५ वर्षांपूर्वी दिवालीबेन मेहता नेत्र रुग्णालय उभारले आहे. त्याशेजारची जागा एमआयडीसीकडून घेतली असून तेथे नवी इमारत उभी राहणार आहे. तेथे रक्तपेढी, आय ओपी़डी, डायलिसीस आणि फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात नेत्रविषयक सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. नवी इमारत आणि नियोजित प्रकल्पांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची गरज आहे. दानशूरांच्या मदतीने यंदा हा प्रकल्प सुरू करण्यावर भर आहे. येथे चष्मे बनवण्याची फॅक्टरी, फार्मसी शॉप, डॉक्टर्स केबिन, ऑप्टिकल शॉप सुरू करण्यात येणार आहे. येत्या १३ जानेवारीला लायन्स चार्टर्ड डेनिमित्त ५० वर्षांचा आढावा घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. मांडवी बंदर परिसर, रेल्वे स्थानक या भागात आयलॅंड उभारण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
लायन्स क्लबने अनेक सेवाभावी उपक्रम, हजारो वैद्यकीय शिबिरे, अनेकांना केलेली लाख मोलाची मदत, शैक्षणिक उपक्रम, शहरांमध्ये असलेल्या लायन्स क्लबच्या ११ प्रवासी बस शेड, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाणपोई, बालोद्यान, चिल्ड्रन्स हेल्थ पार्क असे उपक्रम राबवले. लायन्स महोत्सवांतर्गत नेत्र रुग्णालयाकरिता निधी संकलन केले. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक मेहता यांनी पाच लाखाची मदत, जे. आर. भिडे, राजन मोरे, कॅप्टन प्रमोद साळवी यांच्या लाखो रुपयांची मदत मिळाली. एस. आर. जोशी व डॉ. शेखर कोवळे यांच्या बहुमोल योगदानामुळे लायन्स इंटरनॅशनलच्या एलसीआयएफकडून २ कोटी रुपये किमतीची यंत्रसामग्री आणि मेडिकल इक्विपमेंट मिळाली.
लायन्स आय हॉस्पिटलची स्थापना २००५ मध्ये झाली. तेव्हापासून एप्रिल २०२२ पर्यंत ओपीडीमध्ये १ लाख ८६ हजार ९५६ रुग्णांची तपासणी झाली, तर ३६ हजार ८७७ शस्त्रक्रिया, १७९१ शिबिरे आयोजित केली. पाच तालुक्यांत क्लबची १० व्हिजन सेंटर आहेत. मोतीबिंदूच्या ५० टक्के शस्त्रक्रिया मोफत, उर्वरित अल्प दरांमध्ये केल्या जातात.
लायन्स आय हॉस्पिटलमध्ये डॉ. क्रांती कुत्तुरवार व डॉ. तन्वीर पटेल यांच्यासारखे प्रसिद्ध डॉक्टर्स सेवा देत आहेत. रेटिनातज्ज्ञ डॉ. अमित गडकर, डॉ. अभिजित मिसाळ व डॉ. अनंत भोसले पहिला रविवार आणि तिसऱ्या शनिवारी येतात आणि रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया करतात. रत्नागिरी शहर आणि परिसर या ठिकाणी हॉस्पिटलतर्फे महिन्यात ८ ते १० नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात डॉक्टर्स व प्रशिक्षित कर्मचारी यांच्या साहाय्याने अनेक शिबिरे घेतली जातात. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलच्या बसमधून रत्नागिरी लायन्स आय हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्यावर उपचार केले जातात. रत्नागिरी परिसरामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लायन्स हॉस्पिटलतर्फे १० व्हिजन सेंटर निर्माण करण्यात आली आहेत, त्याचा चांगला उपयोग अनेक गरीब रुग्णांना होत आहे.
लायन्स आय हॉस्पिटलमध्ये दारिद्र्यरेषेखालील गरजू रुग्णांना मोफत उपचार केले जातात. रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे उपचाराचे निदान करून सवलतीच्या दरात मोतीबिंदू ऑपरेशन केली जातात. दरमहा सुमारे २५० ऑपरेशन लायन्स आय हॉस्पिटलमध्ये केली जातात. अनुभवी डॉक्टर्स, स्वच्छ हॉस्पिटल, सर्व सोयीसुविधा, योग्य मार्गदर्शन करणारे कर्मचारी, सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी ऑपरेशनची फी, अद्ययावत लॅब सुविधा, रुग्णांना नेणे-आणणे यासाठी हॉस्पिटल बस यामुळे लायन्स आय हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकप्रिय ठरले आहे.
याव्यतिरिक्त लायन्स क्लबतर्फे नेत्रदान चळवळ राबवली जात आहे. यामुळे जनजागृती होऊन आतापर्यंत तीन व्यक्तींनी नेत्रदान केले आहे. लायन्स क्लबतर्फे गरजू लोकांना शीतशवपेटिका उपलब्ध करून देण्याची सुविधा लायन्स क्लबतर्फे करण्यात आलेली आहे. त्याचाही लाभ अनेकांना होत आहे. लायन्स हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे निदान व उपचार करताना अद्ययावत सेवा देण्यात येते. चष्म्याचा नंबर काढणे, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याचे आजार, तिरळेपणा, पापणीचे आजार, लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्या, रेटिना यासारख्या अनेक समस्यांवर हॉस्पिटलमध्ये उत्तम उपचार केले जातात.
पत्रकार परिषदेला डॉ. शैलेंद्र भोळे, लायन्स क्लब अध्यक्ष प्रवीण जैन, पराग पानवलकर, ओंकार फडके, विशाल ढोकळे, सुधीर वणजू, डॉ. रमेश चव्हाण, सुनीलदत्त देसाई, दत्तप्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
