डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या ‘जरामरण’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

रत्नागिरी : रत्नागिरीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या वृद्धत्वकालीन जगणे या विषयावरील ‘जरामरण’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि, १० सप्टेंबर) होणार आहे.

वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी आणि साहित्य निर्मितीला प्रेरणा मिळावी, या हेतूने कार्यरत असलेल्या रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्याची संध्याकाळ म्हणजे म्हातारपण.. या संध्याकाळी माणसाने कसे जगावे, म्हातारपण कसे सुसह्य करावे, याचा एक वस्तुपाठ असावा, या हेतूने बाप आणि लेक या दोन्ही पिढ्यांना समजावून सांगण्याचा स्तुत्य प्रयत्न जरामरण या पुस्तकातून लेखक डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी केला आहे. यापूर्वी त्यांची पेशंटचे किस्से, दास्यातून मुक्ती अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय ते विविध सामाजिक संस्थांवरही कार्यरत आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचे कार्यवाह आणि सामाजिक विचारवंत माधव अंकलगे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाला मालगुंडच्या कविवर्य केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील उपस्थित राहणार आहेत.

उत्कृष्ट वाचक पुरस्कार
दरम्यान, जनसेवा ग्रंथालयाचे उत्कृष्ट वाचक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रत्नागिरीतील ज्येष्ठ लेखिका कै. स्मिताताई राजवाडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष आहे. निवड समितीच्या माध्यमातून जनसेवा ग्रंथालयाच्या सर्व सभासदांचा वार्षिक वाचन अहवाल आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून यावर्षीच्या दोन प्रथम आणि दोन उत्तेजनार्थ अशा विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षीचा प्रौढ गटातील उत्कृष्ट वाचक पुरस्कार जनसेवा ग्रंथालयाच्या ज्येष्ठ वाचक अनुराधा सतीश चांदोरकर यांना जाहीर झाला आहे. बालगटातील उत्कृष्ट वाचक पुरस्कार बाल सभासद हर्ष मंगेशकुमार पाटील याला जाहीर झाला आहे. बालगटात उत्तेजनार्थ दोन पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये ऋषिकेश आमोद केळकर आणि शारदा पराग अभ्यंकर यांचा समावेश आहे.

पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कारांचे वितरण येत्या शनिवारी, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमांना सर्व वाचक, सभासदांनी तसेच साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply