दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी चिपळूणच्या प्रज्ञा इंगवलेची निवड

चिपळूण : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या संग्रहालय विज्ञान मास्टर डिग्री कोर्ससाठी चिपळूणमधील प्रथितयश कवी, बोलीभाषा अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची कन्या प्रज्ञा इंगवले हिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगातून या कोर्ससाठी दोन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातून सोळा विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यात चिपळूणची प्रज्ञा इंगवले आणि मुंबईतील यशस्विता काळे या दोघींचा समावेश आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थान ही संस्था कला आणि सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील देशामधील अग्रगण्य संस्था आहे.

नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट ऑफ द हिस्ट्री ऑफ आर्ट, कॉन्झर्व्हेशन अँड म्युझिओलॉजीची (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) स्थापना २७ जानेवारी १९८९ रोजी झाली आहे. ही संस्था राष्ट्रीय संग्रहालयाच्या आवारात वसलेली आहे. या संग्रहालयात भारतीय आणि विदेशी अशा एकत्रित जवळपास दोन लाख वस्तू संग्रहित आहेत. ही संस्था कला आणि वारसा शिक्षणातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उच्च शिक्षणामध्ये सर्जनशीलता आणि सहभाग यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असते. संस्थेत प्रामुख्याने एमए आणि पीएचडी हे कला, संवर्धन आणि संग्रहालयशास्त्राच्या इतिहासातील अभ्यासक्रम शिकवले जातात. तेथील शिक्षणाची पद्धत केवळ वर्गातील शिकवण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संग्रहालयाची गॅलरी, साठवण/आरक्षित संग्रह आणि प्रयोगशाळांची ओळख करून देणे अशी आहे. या संस्थेच्या उपक्रमांमध्ये संशोधन नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. इतिहास, संवर्धन आणि संग्रहालयशास्त्र या विषयात संस्थेमध्ये आंतर-विषय संशोधनाची विस्तृत श्रेणी तयार केली गेली आहे. डिग्री कोर्ससाठीची प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश असलेल्या कठोर निवड प्रक्रियेद्वारे, एमए आणि पीएचडी प्रोग्रामसाठी दर वर्षी मर्यादित संख्येने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमासाठी कोकणातील कन्येची झालेली निवड अभिमानास्पद आहे.

कुमारी प्रज्ञा इंगवले उत्तम कलाकार असून, तिने यापूर्वी ‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या कलादालनात तैलचित्रे साकारली आहेत. ‘हा क्षण चिपळूणातील लोटिस्मा वाचनालय परिवारासह सगळ्या अपरान्त भूमीला अभिमान वाटावा असा आहे,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक आणि चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयाचे निर्माते प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply