रत्नागिरी : ‘भारत शिक्षण मंडळाने पटवर्धन हायस्कूल आणि अन्य घटक संस्थांच्या माध्यमातून माणूस घडवण्याचे महान कार्य केले आहे. गेल्या १२५ वर्षांत हजारो माणसे येथून घडली. ही अभिमानास्पद बाब सांगतानाच आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे. जगाची पावले कुठे पडत आहेत ते पाहून आपण आपली दिशा ठरवली नाही, तर आपण कालबाह्य होतो. त्यामुळे संस्थेने त्या दिशेने पावले टाकून विद्यार्थी घडवावेत,’ असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार यांनी केले. पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा प्रारंभ आज (२ सप्टेंबर २०२६) झाला. त्या वेळी ते बोलत होते. (व्हिडिओ आणि फोटो बातमीच्या शेवटी दिले आहेत.)
या वेळी व्यासपीठावर भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. नमिता कीर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, खजिनदार नित्यानंद भुते, संस्थापक अच्युतराव पटवर्धन यांचे सुपुत्र व माजी शिक्षक रमेश पटवर्धन, माजी मुख्याध्यापक दिवाकर लिमये, हरी करमरकर, विजय वाघमारे, माजी विद्यार्थी अतुल जोग, डॉ. दिलीप नागवेकर व मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर उपस्थित होत्या.
‘मला आजही गुरुवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांची शिस्त आठवते. त्यातूनच आम्ही घडत गेलो. माझे मराठीवरील प्रेम व उत्तम लेखन त्यांच्यामुळेच घडले. मुलांवर अपार माया करणारे कै. अच्युतराव हीच पटवर्धन हायस्कूलची खरी ओळख आहे,’ असे प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. नमिताताई कीर यांनी केले.
सुरुवातीला नमिता कीर यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर ध्वजारोहण आणि संस्थापक कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी, एनसीसीचे छात्र, तसेच संस्था पदाधिकारी, विश्वस्त उपस्थित होते. ध्वजारोहणावेळी एनसीसीच्या छात्रांनी सलामी दिली. त्यानंतर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढली. तिला मान्यवरांनी झेंडा दाखवला. पाठोपाठ पटवर्धन हायस्कूल, बियाणी बालमंदिर, आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालय आणि देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून जयस्तंभ, रामआळी, गोखले नाका, आठवडा बाजार मार्गे पुन्हा शाळा या मार्गावर पायी फेरी काढली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, सामाजिक संदेश देणारे फलक आदींद्वारे यातून जागृती करण्यात आली. या वेळी पावसानेही हजेरी लावली. फेरीमध्ये काही विद्यार्थी शाळेचे संस्थापक कै. नारायणराव, कै. केशवराव आणि कै. अच्युतराव पटवर्धन यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. शाळेच्या ठाकूर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संस्थेतर्फे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी चव्हाण यांनी केले.
फोटो लिंक : https://www.facebook.com/share/p/1DkE33dRHf/
Follow Kokan Media on Social Media

