लेह/रत्नागिरी : रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तीन जानेवारी २०२७ रोजी होणार असलेल्या चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमधील लेह मॅरेथॉनमध्ये विशेष प्रोमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील सुमारे २०० धावपटूंनी लेह बाजारपेठ ते शांती स्तूप मार्गावर या मार्गावर धावून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. लेह मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सुमारे सहा हजार धावपटूंपर्यंत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची माहिती पोहोचण्यास या उपक्रमामुळे हातभार लागला आहे. कोकणात क्रीडा पर्यटनाच्या वाढीसाठी गेल्या चार वर्षांपासून विशेष प्रयत्न कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून केले जात आहेत. दरम्यान, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन उपक्रमाचे प्रमुख प्रसाद देवस्थळी जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या खारदुंग-ला चॅलेंज स्पर्धेत सहभागी झाले असून, अभिजित पड्याळ ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.
गेली तेरा वर्षे लडाखमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी लेह मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेसाठी भारतभरातून सुमारे सहा हजार धावपटू लेहमध्ये दाखल झाले आहेत. 'कोकणवासीयांनी जगभरातील धावपटूंसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन' अशी ओळख निर्माण झालेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा प्रचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या प्रचार मोहिमेसाठी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टीम २० ऑगस्ट रोजी रत्नागिरीहून रवाना झाली होती. सुरत, वडोदरा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमध्ये विविध रनिंग कम्युनिटींना भेटी देत ही टीम लेहमध्ये पोहोचली.
विशेष प्रोमो रनमध्ये देशातील नामवंत धावपटूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये १५ वेळा कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेले सतीश गुजराण, भारतातील कॉम्रेड्स मॅरेथॉनमधील वेगवान धावपटू आणि प्रशिक्षक योगेश सानप, एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या व्यवस्थापन समितीचे दिनेश हेडा, तेलंगण पोलिसांच्या अँटी करप्शन विभागातील पिल्ली राजू, मंगळुरूच्या महवीश हुसेन, हिमाचल प्रदेशातील अल्ट्रा रनर तेनझिंग डोलमा यांच्यासह अरुणाचल प्रदेशापासून गुजरातपर्यंत आणि आसेतू हिमाचलपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यातील धावपटू सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील कोणत्याही मॅरेथॉनचे अशा पद्धतीने थेट लडाखमध्ये येऊन प्रमोशन यापूर्वी कधीही झाले नसल्याची भावना उपस्थित धावपटूंनी व्यक्त केली. कोकणवासीय ज्या उत्साहाने या स्पर्धेचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आता कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी यायलाच हवे, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.
या प्रचार मोहिमेत रुचकर प्रॉडक्ट्सचे सुनील सहस्रबुद्धे यांनी विशेष सहकार्य केले. रत्नागिरीपासून लेहपर्यंत भेटलेल्या सर्व रनिंग कम्युनिटीजना, तसेच लेहमधील धावपटूंना रुचकरची हापूस आंब्याची आंबावडी भेट देण्यात आली. या आंबावडीची चव घेतल्यानंतर “आंबावडी इतकी स्वादिष्ट असेल तर कोकण किती सुंदर असेल!” अशा शब्दांत अनेक धावपटूंनी कौतुक केले.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा एक दिशा मार्ग. बहुतांश हाफ मॅरेथॉनमध्ये धावपटूंना त्याच मार्गाने परत यावे लागते; मात्र कोकण कोस्टलमध्ये संपूर्ण २१.१ किलोमीटरचा मार्ग प्रत्येक क्षणी नवा अनुभव देणारा आहे. यामुळे देशभरातील धावपटूंमध्ये या स्पर्धेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. येत्या तीन जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, लेहमध्ये प्रचार मोहीम सुरू असताना रत्नागिरीमध्ये टीम पंचकन्या मानसी मराठे, अंकिता पाटकर, स्नेहल कलाल, केतकी लेले आणि राधा बसणकर या दर रविवारी नियमितपणे मोफत प्रॅक्टिस रनचे आयोजन करत आहेत. बाहेरून जितके धावपटू येतील तितक्याच संख्येने रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंनीही सहभागी व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सलग ११० रविवार ही मोफत प्रॅक्टिस रन अखंडपणे सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम ३ जानेवारी २०२७ रोजीच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये तसेच २८ मार्च २०२७ रोजी होणाऱ्या गणपतीपुळे हाफ मॅरेथॉनमध्ये निश्चितपणे दिसून येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हिमालयाच्या कुशीत कोकणचा आवाज दुमदुमविणाऱ्या या उपक्रमामुळे “कोकणची मॅरेथॉन म्हणजे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन” हे समीकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media

