प्रज्ञांगण व्यासपीठ नावलौकिक मिळवेल : पद्मश्री परशुराम गंगावणे 

तळेरे (ता. कणकवली) : ठाकर आदिवासींचे कलांगण आणि तळेरे येथे सुरू होत असलेले प्रज्ञांगण हे दोन्ही भाऊच आहेत. कलांगणने जसे देश-परदेशात नाव कमावले, तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला खात्री आहे. या व्यासपीठाचे उद्घाटन संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने झाल्याचे जाहीर करतो, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.

मुलांमध्ये विविध कलाकौशल्ये विकसित करून त्यांच्यात अंतर्बाह्य बदल घडवून आणण्यासाठी तळेरे येथे प्रज्ञांगण हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली, वैभववाडी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नामदेव गवळी, एकनाथ गंगावणे आणि चेतन गंगावणे उपस्थित होते.

दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रात “प्रज्ञांगण” या व्यासपीठाचा प्रारंभ, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांच्या “अक्षरोत्सव” प्रदर्शनाचे उद्घाटन, रांगोळीकार उदय दुदवडकर यांनी साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या सत्राची सुरुवात एकनाथ गंगावणे आणि चेतन गंगावणे यांनी परंपरागत चित्रकथी या कलेचे प्रात्यक्षिक दाखवून केली.

दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्यविकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती, संमोहन, अवघड गणिताची सोपी पद्धत याबाबत सदाशिव पांचाळ, चित्रकलेबाबत अक्षय मेस्त्री, मूर्तिकलेबाबत उदय दुदवडकर, गायनाबाबत विश्रांती कोयंडे, अभिनयाबाबत प्रमोद कोयंडे, नृत्याबाबत रोशन जंगम यांनी तर प्रथमेश पोळ, रीना दुदवडकर, श्रावणी मदभावे, सतीश मदभावे यांनी विविध मनोरंजक खेळ घेतले. यामध्ये प्रात्यक्षिके करताना मुलांनी शिबिराचा आनंद लुटला.

यावेळी प्रज्ञांगणच्या वतीने पद्मश्री परशुराम गंगावणे यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रणय तेली यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जयप्रकाश परब आणि प्रणय तेली यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, प्रा. कोकाटे, गवाणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, संतोष टक्के, संजय नकाशे, जाकीर शेख, युवराज पचकर, वारगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. नलगे, रामकृष्ण राणे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, प्रणील शेट्ये, विद्यार्थी – पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्ररसंचालन रीना दुदवडकर आणि प्रणाली मांजरेकर यांनी केले, तर सदाशिव पांचाळ यांनी आभार मानले.

‘प्रज्ञांगण’ व्यासपीठाबद्दल…


स्पर्धेच्या युगात, करोना काळामध्ये जगात प्रचंड बदल झाले आहेत. नोकऱ्या मिळवणे आधीच कठीण होते आणि आता ते महाकठीण झाले आहे. केवळ पदवीधर होऊन नोकरी मिळण्याचे दिवस संपले आहेत. विविध कलाकौशल्ये अंगी असतील, तरच यापुढील काळात नोकरी-व्यवसायासोबत अन्य क्षेत्रातही मार्गक्रमण करणे शक्य होईल. त्यासाठी लहान वयातच कलाकौशल्यांचा पाया घातला गेला पाहिजे. या उद्देशाने प्रज्ञांगणची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती रीना दुदवडकर हिने दिली. कॉम्प्युटरचे रोजगाराभिमुख अनेक अभ्यासक्रम, सहज सोप्या पद्धतीने गाणे शिकणे, नृत्यकलेचे प्रशिक्षण, वैविध्यपूर्ण चित्रकला, रांगोळी, शिल्पकला, जलद गतीने अभ्यास करण्याचे तंत्र, हार्मोनियम, तबलावादन प्रशिक्षण, प्रभावी भाषण करण्याची कला, रविवारची विज्ञान शाळा असे विद्यार्थी विकासकेंद्री उपक्रम राबविले जाणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply