रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध आणि कोविडचा प्रसार लक्षात घेता येथील आर्ट सर्कलने येत्या २२ ते २४ जानेवारी या कालावधीत होणारा संगीत महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्ट सर्कलतर्फे गेली १४ वर्षे संगीत महोत्सव थिबा राजवाडा परिसरात आयोजित केला जातो. गेल्या वर्षी करोनाप्रतिबंधक निर्बंध काहीसे शिथिल झाल्याने सर्व नियम पाळून महोत्सव जाला होता. यावर्षीही २२ ते २४ जानेवारी या दरम्यान हा महोत्सव ठरला होता. कलाकारदेखील निश्चित झाले होते. परंतु शासनाचे निर्बंध लक्षात घेता हा महोत्सव नाइलाजाने पुढे ढकलावा लागत आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर लगेचच महोत्सव साकारण्यात येणार आहे.
याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महोत्सव बंद करू या नको, नाट्यगृहात नेऊ या, “तीन नको, पण दो दिवसांचा करू या, राजवाड्यावरच करू या तीन दिवसांचाच करू या अशी बरीच चर्चा होत होती. भीमसेन जोशी यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्याच पट्टशिष्याकडून स्वरांजली अर्पण करण्याचे नियोजनसुद्धा पूर्ण झाले होते. एक चांगला महोत्सव होणार या आनंदात असतानाच पुन्हा करोनाच्या नव्या रूपाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू झाले. महोत्सव मोकळ्या मैदानात उघड्या आकाशाखाली होत असल्यामुळे क्षमतेच्या १० टक्के परवानगी मिळाली तरी महोत्सव करता येईल, असा विश्वास सुरुवातील वाटत होता. पण जसजशी आजारपणाची व्याप्ती लक्षात येऊ लागली, तसतशी इच्छा-आकांक्षांनाही मर्यादा येणार हे जाणवू लागले. स्थानिक प्रशासनाची भूमिका कितीही सकारात्मक असली तरी त्यांनाही नियम डावलून काही करता येणे शक्य नाही, हेही लक्षात आले.
सर्व पर्यायांचा विचार करून झाल्यावर नाइलाजास्तव पुन्हा एकदा महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सगळी तयारी झाली असताना, राजवाडा साफसफाई, रंगरंगोटी झाली असताना, कलाकारांच्या जाण्यायेण्याची तिकिटे काढून झाली असताना असा निर्णय घ्यावा लागणे आर्थिकदृष्ट्यासुद्धा नुकसानकारक आहे. तरीही प्रशासनावर पडणारा जास्तीचा ताण लक्षात घेता महोत्सव काही काळासाठी पुढे ढकलणे आणि योग्य वेळ येताच पुन्हा नियोजनाची तयारी करणे, हेच योग्य ठरणार आहे, असा विचार आर्ट सर्कलने केला आहे.
असे असले, तरी २०२२ साठी चालू केलेली सभासद नोंदणी मात्र चालूच राहणार आहे. त्यामुळे पुन्हा परवानगी मिळाल्यावर महोत्सव आयोजन करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक जुळणी तोपर्यंतच्या काळात होऊन जाईल, असे आर्ट सर्कलतर्फे कळविण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media