Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महिलादिनानिमित्त बागकामाच्या छंदाविषयीची अनोखी स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : महिलादिनानिमित्त बागकामाच्या छंदाविषयीची अनोखी स्पर्धा वृक्षवल्ली नर्सरीतर्फे आयोजित करण्यात आली आहे.

नरबे (ता. रत्नागिरी) येथे १९९६ पासून वृक्षवल्ली नर्सरी सुरू झाली आहे. काळानुरूप बदल स्वीकारत गेला. आंबा, काजू, कोकम, काळीमिरी, चिकू, पेरू, बिनचिकाचा कापा फणस, स्टारफ्रूट, बुश-काळीमिरी यांची कलमे या रोपवाटिकेमध्ये तयार केली जातात. या सर्वांच्या मातृवृक्षांची स्वतःची लागवड आहे. त्यामुळे ग्राहकांना जातिवंत कलमे खात्रीशीरपणे दिली जातात. सोनचाफा हे या रोपवाटिकेचे वैशिष्ट्य आहे. अतिशय मनमोहक सुवास असणारी, सौंदर्या जातीची, वर्षभर फुलणारी सोनचाफ्याची कलमे तेथे तयार केली जातात. ही कलमे देशभरातील ग्राहकांना दिली जातात. बदलत्या काळाशी सुसंगत अशी सजावटीसाठी आवश्यक असणारी झाडे, कुंड्या, खते-औषधे, मिनिएचर गार्डन, व्हर्टिकल गार्डन वृक्षवल्लीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. सतत नवनवीन कल्पना राबवणाऱ्या प्रतीक आणि सौ. माधुरी कळंबटे यांच्या वृक्षवल्ली नर्सरीतर्फे राबविण्यात आलेल्या ओअॅसिस प्लांट लायब्ररीच्या संकल्पनेला राज्य शासनाचा स्टार्ट अप उद्योगासाठी दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय एक लाखाचा पुरस्कार अलीकडेच मिळाला आहे.

अशा रोपवाटिकेतर्फे बागकामाची आवड आणि छंद जोपासणाऱ्या महिलांसाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिलांच्या छंदाबद्दलच्या भावना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडीओची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या बागेविषयी आपल्याला काय वाटते, बागेची आवड कशी निर्माण झाली, ती आवड कशी जोपासली, बागकाम केल्यावर कसे वाटते, बागकाम म्हणजे तुमच्यासाठी आवड आहे, छंद आहे, एक मानसोपचार आहे, साधना आहे की एक व्यवसाय म्हणून तुम्ही त्याकडे पाहता? बागकाम म्हणजे तुम्हाला व्यक्त होण्याचे माध्यम वाटते का, किंवा अन्य काही वाटते, याविषयी महिलांनी या व्हिडीओमध्ये व्यक्त व्हायचे आहे. जोपासलेल्या बागेचे चित्रीकरण व्हिडीओमध्ये असावे. हा व्हिडीओ २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा. तो स्वच्छ दिसणारा आणि आवाजाचा दर्जाही चांगला असावा. मोबाइल उभा धरून चित्रीकरण केले असल्यास उत्तम होईल. चित्रित केलेला व्हिडीओ येत्या ८ मार्च रोजी रात्रीपर्यंत 9561994881 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version