रत्नागिरी : बागकामाची आवड अनेक जणांना असते. घराभोवती सुंदर बाग असावी, असे स्वप्न अनेकांनी पाहिलेले असते आणि अनेक जण वेळात वेळ काढून ते स्वप्न सत्यातही उतरवतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अशा हौशी बागकाम करणाऱ्यांसाठी एक अनोखी स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ‘सुंदर माझी बाग’ असे या स्पर्धेचे नाव असून, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरीतील ‘वृक्षवल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ मे २०२४ ही अंतिम मुदत असून, स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
टेरेस/बाल्कनी गार्डन आणि आउटडोअर गार्डन अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या बागेचा एका मिनिटाचा एक व्हिडिओ पाठवायचा आहे. तसेच आपल्या बागेसोबत आपला एक सेल्फी पाठवायचा आहे. त्यासोबत ‘बागकाम म्हणजे माझ्यासाठी…’ या विषयावर जास्तीत जास्त १० ओळींमध्ये आपले विचारही लिहून पाठवायचे आहेत.
स्पर्धकांच्या बागेतील झाडांचे आरोग्य, क्रिएटिव्हिटी आणि एकूण मांडणी, तसेच वैविध्य आणि शाश्वत दृष्टिकोन या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे. बागकामाची आवड असलेल्या १२ वर्षांवरच्या कोणीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रत्येकी १०० रुपये प्रवेश फी आहे.
प्रत्येक विभागातून तीन विजेते निवडले जाणार आहेत. विजेत्यांचे फोटो आणि त्यांच्या बागेचे व्हिडिओज रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या फेसबुक पेजवर आणि ‘वृक्षवल्ली रत्नागिरी’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. विजेत्यांना ‘वृक्षवल्ली’तर्फे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्रीकांत भुर्के, सचिव प्रमोद कुलकर्णी आणि खजिनदार प्रकल्प आराध्ये यांनी केले आहे.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क : वृक्षवल्ली 7719890777
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

