आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ – अमित शहा

रत्नागिरी : कोकणाचे वैशिष्ट्य असलेल्या आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी येथे केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री. शहा यांची आज (दि. ३ मे) दुपारी रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, रत्नागिरीत १२१ कोटी रुपये खर्च करून मोठे मासेमारी बंदर उभारण्याचे कामही सुरू आहे, कोकण रेल्वेचे विद्युतीकरणही मोदी सरकारने पूर्ण केले आहे. म्हणूनच विकासाकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांनी नारायण राणे यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने १० वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच विरोधकांवर टीकेची झोड उठवली, खासकरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘राम मंदिर झालं ते चांगलं झालं, असं उद्धव ठाकरे मुंबईत सभा घेऊन विचारू शकतात का, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव सभेत घ्यायला उद्धव ठाकरे धजावतील का,’ असे सवाल अमित शहा यांनी विचारले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नकली सेना असा उल्लेख करताना शहा म्हणाले, की उद्धव यांनी बाळासाहेब यांच्या घरात जन्म घेतला असला, तरी त्यांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. गादी मिळवण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधींकडे जाणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळची निवडणूक अस्सल शिवसेना कोणती हे ठरवणारी असेल, असेही शहा म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉ, ट्रिपल तलाक, कलम ३७० परत आणू, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याला आपण सहमत आहोत का, हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असेही ते म्हणाले. काश्मीरच्या लाल चौकात पूर्वी जाता येत नव्हते. कलम ३७० हटवले आणि आता तेथे कृष्णजन्माष्टमीचा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो,  असे ते म्हणाले.

नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्यांतर्गत विश्वकर्मा योजनेतून बारा बलुतेदारांना साह्य मिळत असल्याचे सांगून ती योजना साकारल्याबद्दल शहा यांनी राणे यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षांत महाराष्ट्राला १० लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी दिला. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केले. मोदींना पुन्हा निवडून देणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची हमी आहे, असेही शहा म्हणाले.

नारायण राणे म्हणाले,  देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी पंतप्रधान मोदी १० वर्षे झटत आहेत. जागतिक पातळीवर अकराव्या क्रमांकावरून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. २०३० मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. महिला, युवा, शेतकरी, गरीब या चार घटकांसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्ही विकासावर बोलतो; पण विरोधकांची २७ पक्षांची आघाडी कशावर बोलते? उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिव्यांच्या पलीकडे काही बोलत नाही. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. उद्धव यांनी आम्हाला शिवसेना शिकवण्याची गरज नाही. मी जिवाची, कुटुंबाची पर्वा केली नाही. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली, अशी टीकाही श्री. राणे यांनी केली.

कोकणचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते; पण आता कॅलिफोर्नियाचे लोक म्हणू देत, की आम्हाला कोकणासारखी प्रगती करायची आहे. अशा विकासासाठी मला संधी द्यावी. त्यासाठी महायुतीला निवडून द्यावे आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावे, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गाएवढेच मताधिक्य रत्नागिरीतून राणे यांना मिळवून देऊ अशी ग्वाही शहा यांना देत असल्याचे सांगितले. कोकणासाठी सहकाराचे विशेष धोरण आणावे आणि आंबा-काजूला न्याय द्यावा. तसेच आचारसंहितेनंतर महाराष्ट्राला मोठा प्रकल्प द्यावा, अशी मागणी सामंत यांनी शहा यांच्याकडे केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र सरकारच्या कामाचा आढावा घेतला आणि मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाबद्दल सांगितले. विदर्भापासून कोकणापर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारा नेता, असे नारायण राणे यांचे वर्णन करून बावनकुळे यांनी राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले.

२०१४ आणि १९मध्ये केवळ नरेंद्र मोदी यांच्या पुण्याईवर निवडून आलेल्यांचा या वेळी पराभव होणार आहे. कारण आता भाजप त्यांच्यासोबत नाही. राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे. कारण कार्यकर्त्यांनी दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे, असे भाजपचे लोकसभा सहप्रभारी आणि माजी आमदार बाळ माने म्हणाले.

विनाश की विकास, संस्कृती की विकृती हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मशालीच्या उजेडाची रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांना गरज नाही. मशाल अरबी समुद्रात नेऊन बुडवा. कोकण आणि राणे हे अभेद्य समीकरण आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महायुतीतल्या सर्व पक्षांचे दोन्ही जिल्ह्यांमधले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी आदी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, चित्रा वाघ, माजी खासदार नीलेश राणे, अ‍ॅड. बाबा परुळेकर, शिवसेना नेते किरण सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित यशवंराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित आदी या वेळी उपस्थित होते.

भर दुपारी सभा होणार असल्याने मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता आणि पाण्याची सोयही करण्यात आली होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply