लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…
………
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातले दोन महत्त्वाचे जिल्हे. अप्रतिम निसर्गसौंदर्य, हापूस आंबा आणि काजूसह अन्य वैशिष्ट्यपूर्ण फळं, ऐतिहासिक वारसा लाभलेले वाडे, वास्तू, मंदिरं, दुर्गम किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मत्स्यसंपदा, बेलाग कडे, जैवविविधतेने समृद्ध देवराया आणि जंगलं, अश्मयुगीन मानवाबद्दलचं कुतूहल जागृत करणारी गूढ कातळशिल्पं, दशावतार, ठाकर, जाखडी, नमन अशा लोककला अशा अनेकविध आश्चर्यांनी हे दोन जिल्हे नटलेले आहेत. झाडामाडांची समृद्धी खूप असली, तरी इथल्या जवळपास प्रत्येक घरातली कोणी तरी व्यक्ती मुंबईत नोकरीला असल्याने पूर्वीच्या काळी ‘चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर अवलंबून असलेला प्रदेश’ असं या भागाला म्हटलं जायचं. आता मात्र हे चित्र बऱ्यापैकी बदललं आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक समृद्धीही या दोन जिल्ह्यांमध्ये येऊ लागली आहे. आपल्याकडे असलेली नैसर्गिक समृद्धी किंवा गावपण म्हणून असलेल्या गोष्टी हे पर्यटन व्यवसायासाठीचं भांडवल होऊ शकतं, याची जाणीव कोकणी माणसाला होऊ लागली आहे.
मतदारसंघाची रचना
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी दापोली आणि गुहागर हे मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन आणि कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये १९४२ मतदान केंद्रांवर १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये सात लाख आठ हजार ४८७ पुरुष आणि सात लाख २९ हजार ९७३ महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदारांची संख्या २१ हजार ४८६ ने अधिक आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ११ हजार ९०८ आहे, तर ८५ वर्षांवरच्या मतदारांची संख्या २६ हजार १८१ आहे. १८ ते १९ वर्षं वयोगटातले १३ हजार ७६३ नवमतदारही आपला हक्क बजावू शकतील. या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी मतदान होणार आहे.
मतदारसंघातल्या समस्या आणि अपेक्षा
मुंबई-गोवा महामार्गाचं अनेक वर्षं रखडलेलं काम हा प्रमुख मुद्दा आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्यापैकी वेगाने पूर्ण झालं; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ते बरंच रखडलं आहे. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ते मान्य केलं असून, महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. नव्या महामार्गाच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम तातडीने हाती घेण्याची गरज आहे.
कोकण रेल्वेमुळे मुंबईतून कोकणात येण्यासाठी चांगली सोय झाली; मात्र लांब पल्ल्याच्या बऱ्याच गाड्या कोकणातल्या अनेक स्टेशन्सवर थांबत नसल्याची तक्रार कायम आहे. तसंच, गणपती, होळीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात कोकणात येण्यासाठी आरक्षण मिळणाऱ्यांची संख्या मोजकी असल्याने चारकमान्यांना बरीच कसरत करावी लागते. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचं काम वेगाने झालं, तसंच लोकल आणि पॅसेंजर गाड्यांचं प्रमाण वाढवलं, तर ही अडचण कमी होऊ शकते. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी प्रलंबित आहे. त्यासाठी अगदी अलीकडेही आंदोलन झालं होतं. कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचं कामही लवकर होण्याची गरज आहे. तसंच, मालवाहतुकीचा कोकणासाठी अधिक प्रभावीपणे वापर होण्याच्या दृष्टीने योजना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या आणि इतर सवलती पुन्हा सुरू झालेल्या नाहीत, याबद्दलही अनेकांची नाराजी आहे.
ग्रीन रिफायनरीच्या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं असलं, तरी भाजप प्रकल्प होण्याच्या बाजूने अनुकूल आहे. कोकणात उद्योग आणताना पर्यावरणपूरकतेचा विचार व्हायलाच हवा, अशी मागणी होत आहे. पश्चिम घाटाचं क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचं गाडगीळ अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. ती बाब लक्षात घेऊन कोकणात कशा प्रकारचे उद्योग आणायचे यासाठी एक निश्चित धोरण ठरवण्याची गरज आहे. कारण निसर्गसौंदर्यामुळेच दोन्ही जिल्ह्यांतला पर्यटन व्यवसाय वाढीला लागला आहे. सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे; मात्र त्याला आवश्यक अशा पूरक सोयी दोन्ही जिल्ह्यांत हव्या तितक्या प्रमाणात झालेल्या नाहीत. अनेक रस्त्यांची परिस्थिती चांगली नाही. सगळ्या रेल्वेगाड्या महत्त्वाच्या स्टेशन्सवर थांबत नाहीत. विमानतळ नावालाच आहेत. पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणीही होत आहे.
आजच्या डिजिटल युगातही अनेक गावांमध्ये रेंज नाही. तसंच, बीएसएनएलसारख्या सरकारी कंपनीचे टॉवर्स बिघाडामुळे तीन-चार दिवस बंद राहण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडतात. प्लास्टिकसह सर्व प्रकारचा कचरा आणि प्रदूषण याचा प्रश्न गावोगावी रौद्र रूप धारण करू लागला आहे. कारण कचरा पुनर्चक्रीकरण आणि विल्हेवाटीच्या कोणत्याच यंत्रणा शहरातही व्यवस्थित कार्यरत नाहीत, तिथे गावांची काय कथा? हा प्रश्न सुटण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा हे खरं असलं, तरी सरकारकडून त्याला साह्य करणारी यंत्रणा ग्रामपातळीवर तयार होण्यासाठी धोरणनिश्चितीची गरज आहे.
पावसाळ्यात कोकणात अनेक ठिकाणी पूर येण्याएवढा पाऊस पडत असला, तरी एकंदर पर्जन्यमान गेल्या काही वर्षांत सातत्याने घटत आहे, तसंच पावसाच्या वितरणात अनियमितता आली आहे. त्यामुळे कोकणाची जलसमृद्धी धोक्यात आली असून, त्याचा परिणाम शेतीवरही होत आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारी-मार्चपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. भूजलाचा उपसा अमर्याद होत असल्याने भूजलपातळीही भीतिदायक प्रमाणात घटत चालली आहे. जमीन जांभ्या दगडाची असल्याने पाणी मुरण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे पर्जन्यजलसंचय आणि भूजल पुनर्भरण केल्याशिवाय तरणोपाय नाही. वैयक्तिक, तसंच ग्रामपातळीवर हे बंधनकारक करण्यासाठी ठोस धोरण ठरवण्याची गरज आहे.
आंबा, काजू, नारळ, पोफळी अशा पिकांची बागायती शेती हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या जंगलतोडीमुळे वानर-माकडांचे अधिवास नष्ट होत आहेत. वानर आणि माकडं बागांमध्ये येऊन पिकांचं मोठं नुकसान करत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनंही केली; मात्र ठोस उपाययोजना तातडीने केली जाण्याची गरज व्यक्त होत आहे. बिहारमध्ये उपद्रवी नीलगायींना मारण्याची परवानगी देण्यात आली, तशी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी प्राधान्याने मार्गी लावणं हे स्थानिक नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यटनवाढीसाठीही अत्यावश्यक आहे. छोट्या उद्योगांच्या वाढीसाठी कोकणात बराच वाव असला, तरी त्यातली आव्हानं पेलण्याची नागरिकांची मानसिकता तयार होण्यासाठी सरकारी यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा होणं गरजेचं आहे.
राजकीय परिस्थिती – इतिहास आणि वर्तमान
आता या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊ या. कोकणात काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचा असलेला प्रभाव साधारणत: १९९० सालानंतर घटला आणि ती जागा शिवसेनेने घेतली. २००४च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते निवडून आले होते. नंतर मतदारसंघ फेररचना झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ तयार झाला. २००९च्या निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर नीलेश नारायण राणे, तर शिवसेनेकडून सुरेश प्रभू उभे होते. बहुजन समाज पक्षाकडून जयेंद्र परुळेकर यांना उमेदवारी मिळाली होती. नीलेश राणे तीन लाख ५३ हजार ९१५ मतं मिळवून विजयी झाले होते. सुरेश प्रभूंना तीन लाख सात हजार १६५ मतं मिळाली होती. त्या वेळी मतदारसंघात ५७.३९ टक्के मतदान झालं होतं. त्यापैकी ४९.२४ टक्के मतं नीलेश राणेंना, तर ४२.७४ टक्के मतं सुरेश प्रभूंना मिळाली होती.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत उभे राहिले होते. काँग्रेसने नीलेश राणे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. आम आदमी पक्षातर्फे अभिजित हेगशेट्ये, तर बहुजन समाज पक्षातर्फे राजेंद्र आयरे यांना उमेदवारी मिळाली होती. त्या निवडणुकीत विनायक राऊत चार लाख ९३ हजार ८८ मतं मिळवून विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकाची तीन लाख ४३ हजार ३७ मतं नीलेश राणेंना मिळाली होती. या निवडणुकीत मतदारसंघात ६५.५६ टक्के मतदान झालं होतं. त्यापैकी ५५ टक्के मतं राऊत यांना, तर ३८ टक्के मतं राणे यांना मिळाली होती.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीतर्फे विनायक भाऊराव राऊत यांनाच उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना तिकीट मिळालं होतं. नीलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवली, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती रामचंद्र जोशी यांना उमेदवारी मिळाली होती. त्या निवडणुकीत विनायक राऊत चार लाख ५८ हजार २२ मतं मिळवून विजयी झाले होते. त्याखालोखाल नीलेश राणे यांना दोन लाख ७९ हजार ७०० मतं मिळाली होती. मतदारसंघात त्या वेळी ६१.९९ टक्के मतदान झालं होतं. झालेल्या मतदानापैकी सुमारे ५० टक्के मतं राऊत यांना, तर ३१ टक्के मतं नीलेश राणे यांना मिळाली होती.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे यंदाच्या निवडणुकीतली परिस्थिती वेगळी आहे. कोकणात आणि प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात दीर्घकाळ शिवसेनेचा प्रभाव आहे. त्यातही खासकरून बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे; मात्र एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या बंडानंतर गणितं बदलली आहेत. आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात ही जागा कायम शिवसेनेकडेच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पक्ष या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे.
पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्ष कोकणात आपलं बळ वाढवू पाहत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभावही मोठ्या भागावर आहे. तसंच, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर भाजपचं या भागातलं बळ वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल अनुकूल मतप्रवाह असलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचं चित्र अनेक अ-राजकीय कार्यक्रमांमधूनही दिसलं आहे. भाजप शिवसेनेच्या युतीचं युग सुरू झाल्यानंतर गेली वीस वर्षं भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेले. त्यामुळे गेली वीस वर्षं विधानसभेची जागाही पक्षाकडे नसल्यामुळे या वेळी तरी न्याय मिळावा, या उद्देशाने या वेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या या जागेवर आपला दावा सांगितला आणि तो आग्रह लावून धरला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवत असल्याने आणि हक्काचा मतदारसंघ म्हणून शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर आपलाच दावा असल्याचं सांगितलं जात होतं. विद्यमान आमदार उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि उद्योजक किरण सामंत या जागेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांच्याकडून बरीच मोर्चेबांधणीही केली गेली. दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच वाटाघाटी झाल्या. त्यामुळे उमेदवार घोषित व्हायला खूप वेळ लागला; मात्र उमेदवार भाजपचाच असेल हे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. अखेर अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ एप्रिलला सकाळी नारायण राणे यांचं नाव उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली नाही, तेव्हाच त्यांच्या नावाचा विचार लोकसभेसाठी केला जात असावा, अशी अटकळ बांधली जात होती. ती खरी ठरली. राणेंना उमेदवारी जाहीर झाली, त्याचदरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राणे यांच्यासोबत राहू असंही जाहीर केलं.
दरम्यान, आपणच सलग तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रत्नागिरीत त्यांची मोठी प्रचारसभा झाली. आतापर्यंत १०७ खळा बैठकांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विजयासाठी अपार मेहनत घेत असल्याचंही ते म्हणाले. शक्तिप्रदर्शन करणारी मोठी मिरवणूक काढून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मित्रपक्षांचे दोन्ही जिल्ह्यांमधले नेते आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षातर्फे उशिरापर्यंत उमेदवार घोषित झाला नसला, तरी पक्षाने प्रचारमोहिमेवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. भाजपचे लोकसभा प्रभारी आणि रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराच्या तीन फेऱ्या उमेदवार घोषित होण्याआधीच पूर्ण झाल्या होत्या. त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अगदी घरोघरी जाऊन प्रचार केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार हेदेखील प्रचारात सक्रिय असून, स्वतः नारायण राणे यांच्याही दोन्ही जिल्ह्यांत प्रचारसभा सुरूच आहेत. नारायण राणे स्वतः प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत असले, तरी या वेळच्या निवडणुकीसह तीन निवडणुकांमध्ये राणे कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. ते कोणत्याही पक्षात असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नावाचा करिष्मा आहे. सध्या ते भाजपमध्ये असल्याने त्यांच्या रूपाने भाजप आणि मित्रपक्षांकडे जिल्ह्यातली बरीच सत्तास्थानं आहेत. राणे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करणारी मिरवणूक काढून अखेरच्या दिवशी अर्ज भरला आणि आपण अडीच-तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या रत्नागिरी आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अनुक्रमे उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आमदार आहेत. राजापूर आणि कुडाळ-मालवण या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे राजन साळवी आणि वैभव नाईक हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. चिपळूणमध्ये शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आमदार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं, तर सहापैकी चार आमदार महायुतीचे आहेत.
या मतदारसंघात मारुती रामचंद्र जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, राजेंद्र लहू आयरे यांनी बहुजन समाज पक्षाकडून, अशोक गंगाराम पवार यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून, तर सुरेश गोविंदराव शिंदे यांनी सैनिक समाज पक्षाकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर शकील अब्दुल करीम सावंत, अमृत तांबडे, तसंच शिवसेना उबाठाच्या राऊतांशी नामसाधर्म्य असलेले विनायक लवू राऊत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत; मात्र या मतदारसंघातली मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच राणे विरुद्ध राऊत अशीच होणार आहे. सलग दोन पराभवांची मालिका राणे कुटुंबीय खंडित करणार, की सलग दोन विजयांची मालिका राऊत कायम राखणार, याचा कौल शेवटी जनतेच्याच हाती आहे.
– अनिकेत कोनकर
ई-मेल : aniketbkonkar@gmail.com
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

