भाग्य अपुले अपुल्या हाते…

देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रणधुमाळी आता अवघ्या चार दिवसांत संपुष्टात येणार आहे. प्रचाराच्या या काळात दिग्गज नेते मंडळी जिल्ह्यात येऊन गेली. मोठमोठी आश्वासने देऊन गेली. त्याचबरोबर एकमेकांच्या पक्षांवर आणि विरोधी उमेदवारांवर मोठे दोषारोप करून गेली. पाच वर्षांपूर्वी यांनीच लोकांच्या विकासासाठी आणि हितासाठी आपण सारे काही करणार आहोत, असे सांगितले होते. त्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडलाच, पण मतदारांनाही तो पडल्याचे गृहीत धरून त्यांनी प्रचाराची भाषणे ठोकली. एकमेकांवर दोषारोप केले, पण मत आम्हाला द्या, आम्हाला निवडून द्या, असे आवाहन मतदारांना करून ही मंडळी निघून गेली. आता प्रचाराच्या तोफा पाच मे रोजी थंडावणार आहेत. येत्या सात मे रोजी या दोन जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. अतिरेकी प्रचारामुळे भणाणून गेलेले मतदाराचे डोके शांत व्हावे, यासाठीच मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार थांबविण्याचा नियम केला गेला असावा. आता या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या नऊ जणांचे भाग्य मतदारांच्या हातामधून मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे आणि ते येत्या 4 जून रोजी उघडणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे उमेदवारांचे भाग्य महिनाभरात ठरणार आहे, पण हे भाग्य जे लिहिणार आहेत, त्या मतदारांना पुढची पाच वर्षे आपण केलेले मतदान भाग्यवान ठरते की नाही, याचा विचार या चार दिवसांमध्येच करावा लागणार आहे. आपला लोकसभेतील प्रतिनिधी मतदारांना निवडून द्यायचा आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांनीही त्याचा विचार करून मतदानाचा आपला हक्क बजावायला हवा. त्यातून कोणाचे भाग्य उघडेल हे नंतर स्पष्ट होणार असले, तरी मतदानाच्या दिवशी ते भाग्य मतदारांना आपल्या हाताने लिहायचे आहे. यासाठीच मतदान करणे अत्यावश्यक आहे.

गीतरामायणामध्ये ग. दि. माडगूळकरांनी जय गंगे जय भागीरथी या नावाचे एक गीत लिहिले आहे. श्रीरामाला वनवास झाला, तेव्हा त्याला गंगेच्या पार करण्याची वेळ नावाड्यांवर आली. तेव्हा त्या नावाड्यांनी गायिलेले ती गीत आहे. या गीतामध्ये श्रीरामाला त्याच्या राज्यातून गंगेच्या पार नेण्याचे काम नावाड्यांना करावे लागते. त्यामुळे आपले भाग्य आपल्या हाताने दूर करायची वेळ आपल्यावर आली आहे, अशा त्या नावाड्यांच्या भावना या गीतामधून प्रकट झाल्या आहेत. त्या चरणाचा अर्धांश मतदारांनी आपल्यापुरता विचारात घेऊन आपले भाग्य आपल्या हाताने दूर लोटायचे की परतून आणायचे, हे त्यांनी ठरवायला हवे. योग्य उमेदवार निवडला गेला तर आपल्या हाताने आपण आपले भाग्य लिहिले असा अर्थ होईल, पण अयोग्य उमेदवार निवडला गेला, तर आपले भाग्य आपण आपल्या हाताने दूर लोटल्यासारखे होईल. मतदारांनी याचा योग्य तो विचार करायला हवा आणि मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपला हक्क बजावायला हवा. निवडणुकीला कोणी उभे राहायचे, हे ठरविता येत नाही. पण जे नऊ उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३ मे २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply