Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

जाणीव फाउंडेशनच्या प्रयत्नांनी निवेंडीतील नदी गाळमुक्त

Advertisements

रत्नागिरी : येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांमुळे निवेंडीच्या भगवती नगरातील नदी गाळमुक्त झाली. या गाळउपशाचा फायदा शिगणवाडी आणि नमसलेवाडीला होणार आहे.

या नदीतील गाळ गेली कित्येक वर्षे उपसण्यात आला नव्हता. त्यामुळे जवळच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत असे. पावसाळ्यात नदीजवळील सर्व शेतात आणि घरात पाणी येत असे. या अडचणींना ग्रामस्थांना दरवर्षी सामोरे जावे लागत होते. ही समस्या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जाणीव फाउंडेशनच्या माध्यमांतून गाळ उपसण्याचा उपक्रम करण्याचा प्रस्ताव जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांच्याकडे ठेवला. त्यानंतर त्यांनी नदीची पाहणी केली. याकरिता ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.

सर्व सरकारी परवानग्या घेऊन नदीचा गाळ उपसण्याचे काम जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, डॉ. चंद्रशेखर निमकर, भगवतीनगरच्या सरपंच प्रगती प्रमोद भोसले, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. श्री. कळेकर यांनी जाणीव फाउंडेशनचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगितले. डॉ. निमकर यांनी जाणीवच्या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात पाणी ही काळाची गरज आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढे येऊन असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी दोन जेसीबी आणि लोकसहभागातून चार दिवस काम पूर्ण करण्यात आले.

यादरम्यान जाणीव फाउंडेशनचे अवधूत मुळ्ये, उमेश महामुनी, निवेंडी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शिर्के, तेजल पोमेंडकर, पोलीस पाटील नितीन मायंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले, सीआरपी काजल सावंत, ग्रामस्थ नंदकुमार यादव, शंकर आंबेकर, प्रकाश भोसले, अमेय शिगवण, देवीदास शिगवण, वासुदेव शिगवण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवेंडीच्या भगवतीनगरातील नदीतील गाळ उपसल्यानंतर नदीची वाढलेली खोली

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version