स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत मैफल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव निवासी अंधशाळा असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ही सांगीतिक मैफल २६ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरीत होणार आहे. या दिवशी सायंकाळी सात वाजता मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) ही मैफल होणार आहे. जाणीव फाउंडेशन या दशकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या रत्नागिरीतील नावाजलेल्या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या वेळीही असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

स्नेहज्योती या विद्यालयाचे नाव आज महाराष्ट्रभर पोहोचले आहे; पण हा प्रवास सोपा नव्हता. आयुष्याच्या सायंकाळी जेव्हा बहुतांश जण निवांत आयुष्य जगत असतात, तेव्हा आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी वेगळी वाट निवडून अंध मुलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव ठरलेल्या अशा या अंधशाळेची स्थापना केली. प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्यांवर मात करून या दोघींनी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या छोट्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे़. भारतरत्न सचिन तेंडुलकरसह सलील कुलकर्णी, संदीप खरे आदी अनेक मान्यवरांनी स्वत: भेट देऊन या संस्थेला गौरविले आहे. या विद्यालयाच्या मुलांनी आपल्या सादरीकरणातून संपूर्ण महाराष्ट्रावर संगीतमय गारूड केले आहे़.

संस्थेचे उत्तम जैन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यासारख्या सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांनी स्नेहज्योती संस्थेची वाटचाल सुकर केली आहे. या मुलांच्या भाळी नियतीने अंधार लिहिला असला, तरी त्या तिमिरावर मात करून त्यांच्या गायन-वादन कौशल्याने ते श्रोत्यांना तेजाकडे घेऊन जातात आणि दोन तासांच्या जादुई संगीत मैफलीनंतर प्रत्येक श्रोता तृप्त मनाने बाहेर येतो.

या वेळच्या कार्यक्रमात बालश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध गायिका मनश्री सोमण यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमाची घोषणा होताच रत्नागिरीतील आणि जिल्ह्यातील अन्य ठिकाणांहूनही रसिकांनी आणि सामाजिक जाणीव असणाऱ्या नागरिकांनी प्रवेशिका खरेदी करून, तसेच वेगवेगल्या स्वरूपाची मदत करण्याची तयारी दाखवून चांगला प्रतिसाद दिला आहे, असे जाणीव फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. या भगीरथ कार्याला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी प्रवेशिका खरेदी करून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून उपलब्ध होणारा निधी हा स्नेहज्योती अंधविद्यालयास देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे (94220 03128) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका रत्नागिरी शहरातील पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत. सिद्धाई फूड्स-आरोग्य मंदिर, हॉटेल वैशाली-बाजारपेठ, श्रावणी ग्राफिक्स-आरोग्य मंदिर, हॉटेल व्हेज ट्रीट-कॉंग्रेस भवन

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply