पावसाचे पाणी साठविण्यासाठी जलवर्धिनीचा मदतीचा हात

रत्नागिरी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जलशक्ती अभियानाला आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती उपक्रमाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जलशक्ती अभियानासंदर्भात रत्नागिरीत अलीकडेच आढावा बैठक झाली. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. हे केवळ अभियान न राहता ती एक जनचळवळ बनली पाहिजे. या भूमिकेतून यंत्रणांनी काम करावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या बैठकीत केले. अभियानात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, यासाठीही नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यापूर्वी श्री. परांजपे यांना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती जलवर्धिनीने विकसित केल्या आहेत. त्याची माहिती त्यांनी दिली होती. कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्या नमुन्याच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती परांजपे यांनी तेथे दिली.

कोकणवासीयांची गरज लक्षात घेऊन जलवर्धिनीतर्फे गरजूंना मदतीचा हात देण्याचे श्री. परांजपे यांनी पुन्हा एकदा जाहीर केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठवण टाक्या बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. गरजू ग्रामस्थांकरिता जमिनीवरील दहा हजार लिटरपर्यंतची क्षमता असलेल्या साठवण टाक्या बांधल्या जातील. लाभार्थीने टाकीसाठी पाया बांधणे, रेतीसारखे बांधकाम साहित्य देणे आवश्यक आहे. लाभार्थींनी श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.

इच्छुकांनी तसेच संस्थांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन श्री. परांजपे यांनी केले आहे.

जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती http://www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

संपर्कासाठी :
दूरध्वनी क्र. – ९८२०७८८०६१
ईमेल -jalvardhini@gmail.com

जलवर्धिनीविषयी माहिती

कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे संकलन, संपादन आणि निर्मिती ‘कोकण मीडिया’ने केली आहे. परांजपे यांच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)

 ‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ आणि ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ अशी त्या दोन पुस्तकांची नावे आहेत. पूर्वी प्रकाशित झालेली ही पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकांची किंमत अनुक्रमे १०० आणि १२५ रुपये असून, ई-बुक्स अनुक्रमे ८० आणि १०० रुपयांत उपलब्ध आहेत. ही ई-बुक्स गुगल प्ले बुक्सवर असल्याने खरेदी केल्यावर वाचकांना मोबाइलवरच सहजपणे वाचता येतील. सध्या लॉकडाउनच्या काळात हळूहळू सर्व व्यवहार सुरू होऊ लागले असले, तरी पुस्तकांची दुकाने किंवा पुस्तके घरपोच मिळण्याची सोय अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही. अशा स्थितीत ई-बुक्स हा वाचनाचा सोपा पर्याय आहे. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)

‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ हे पुस्तक किफायतशीर फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी खर्चात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करण्याच्या तंत्राची माहिती देते. तसेच, सिमेंटच्या जोडीला स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक धाग्यांचा वापर करून कमी खर्चात टाक्या तयार करण्याच्या तंत्रांची माहिती ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ या पुस्तकात दिलेली आहे. ही दोन्ही पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असून, दोन्ही पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांच्या साह्याने विषय सोपा करून समजावून सांगण्यात आला आहे.

पाणीवाले परांजपे यांच्याविषयी…
पावसाचं पाणी साठवण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उल्हास परांजपे. ज्येष्ठ नागरिक असूनही ते संपूर्ण कोकणात, तसेच इतरही अनेक ठिकाणी फिरून याबद्दल मार्गदर्शन करतात, किफायतशीर खर्चात आणि स्थानिक उपलब्ध साहित्यात पाण्याच्या टाक्या बनविण्याचं प्रशिक्षण देतात, आवश्यक तिथे स्वतःच्या खर्चाने टाक्या उभारूनही देतात. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नांनी काही लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली आहे. म्हणूनच त्यांना पाणीवाले परांजपे अशी ओळख मिळाली आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते कार्य करतात.

पुस्तकांच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या नावासमोरील लिंकवर क्लिक करावे.
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply