कोकणातील कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट येतोय! पाहा झलक…

रत्नागिरी : कोकणातील कातळ खोद चित्रे अर्थात कातळशिल्पे हा अत्यंत औत्सुक्याचा विषय आता जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. निसर्गयात्री संस्थेचे भाई रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई गेल्या १० वर्षांहून अधिक काळ या कातळशिल्पांचा शोध आणि संरक्षण यासाठी कार्यरत आहेत. या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे. दृश्यम कम्युनिकेशनचे सायली खेडेकर आणि राहुल नरवणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या माहितीपटाची झलक निसर्गयात्री संस्थेच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती https://youtu.be/VR6UniAKsBs या लिंकवर पाहता येईल.

Petrohlyphs किंवा Geoglyphs म्हणून ओळखली जाणारी कातळशिल्पे म्हणजेच कातळ खोद चित्रे म्हणजे कोकणातल्या कातळावर साकारलेल्या भव्य चित्राकृती. या अनेक चित्राकृतींमधून मानवी संस्कृतीची दृश्यरूप जडणघडण झालेली पाहायला मिळते. या चित्राकृतींची सुरवात आदिमानव काळापासून झालेली दिसून येते. आदिमानवाने फारसे संस्कार न करता रेखाकृती साकारल्या. तरीदेखील त्यात खूप मोठा आशय विषय सामावलेला आहे. या रेखाकृती साकारणारे कोण आणि कुठले, त्यांचा कालखंड कोणता आणि मुळात ह्या रेखाकृती करण्यामागची त्यांची मानसिकता नेमकी काय, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या वारशाचा मागोवा निसर्गयात्री संस्थेचे भाई रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई गेल्या १० वर्षांहून अधिक काळ घेत आहेत. त्यांनी स्वखर्चाने आणि अविश्रांत मेहनतीतून हाती घेतलेल्या शोध, संरक्षण आणि संवर्धन मोहिमेतून आजतगायत हजारो कातळशिल्पे त्यांनी जगासमोर आणली आहेत. त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली आहे. त्यांचे हे काम अनमोल आहे. हे काम आणि कोकणातील कातळशिल्पे यांची माहिती सुयोग्य स्वरूपात सर्वांसमोर जाण्यासाठी माहितीपटाची निर्मिती करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी दृश्यम कम्युनिकेशनचे सायली खेडेकर आणि राहुल नरवणे यांनी पुढाकार घेतला आहे. दृश्यम कम्युनिकेशन ही जाहिरात, लघुपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेची निर्मिती असलेल्या दोन लघुपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘हे सर्व करत असताना आम्हाला आपल्या सर्वांगीण मदतीची निश्चितच गरज आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून माहितीपटाची झलक असलेला व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे,’ असे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्गयात्री संस्थेच्या शोधकर्त्यांनी साप्ताहिक कोकण मीडियासाठी कातळशिल्पांची अद्भुत शोधकथा लिहिली होती. त्याची लिंक सोबत देत आहोत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply