गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकातील लेख)
………………
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू गावाच्या सड्यावर धनगर समाजातील सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबर गप्पा सुरू असताना सड्याच्या दुसऱ्या टोकाला निर्देश करून ‘असे काहीतरी आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले आणि जवळपास दीड-दोन वर्षे अंधारात चालू असलेल्या आमच्या कातळ-खोद-चित्र शोधाच्या प्रवासाला आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा एक मोठा खजिना समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.
कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. प्रस्तुत लेख आहे तो या कातळ-खोद-चित्रांच्या शोध प्रवासाचा आणि त्यात आलेल्या अनुभवांचा.
या कातळ-खोद-चित्रांचा शोध हा खरे तर आमच्या ‘आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेतील एक भाग. कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश आम्हा कोकणातील लोकांनाच माहिती नाही. निसर्गप्रेमातून आमची भटकंती सुरू झाली आणि या बाबी आमच्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच जन्माला आली, ती ‘आडवळणावरचे कोकण’ ही संकल्पना.

कातळ-खोद-चित्रांच्या शोधप्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी या विषयातील कोणतेही ज्ञान आम्हाला नव्हते. डोळ्यासमोर होत्या त्या निवळी, देवीहसोळ येथील एक-दोन चित्ररचना. काहीतरी पुरातन आहे, एवढाच काय तो आमचा या चित्रांशी संबंध. प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या भेटीत या चित्रांचे महत्त्व समजले. आणि ती चित्रे मनावर कोठे तरी कोरली गेली होती.
बारसूच्या सड्यावर भेटलेल्या व्यक्तीने आमच्या चौकशीतील निसटत असलेली कडी गुंफून दिली. त्या भल्याथोरल्या सड्यावर निव्वळ अंगुलीनिर्देशानुसार मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाण शोधणे म्हणजे एक आव्हानच होते. तुटपुंज्या माहितीच्या जोरावर, दिशादर्शनातून मिळालेल्या ठिकाणी पोहोचलो. हे ठिकाण म्हणजे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकले. नकळतच ‘अरे बापरे’ हे शब्द बाहेर पडले. एवढ्या मोठ्या सड्यावर शोधणार कसे? मिळालेल्या भौगोलिक माहितीच्या आधारे नजरेसमोर एक भासमान क्षेत्र उभे केले. अर्थात त्यासाठी आपल्याला बोलीभाषेतील शब्द, खुणा यांची थोडीफार तरी जाण असावी लागते. ‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ करत प्रत्येक पावलागणिक पायाखाली पाहत मार्गक्रमणा सुरू झाली. थोड्या वेळात ‘इथे काही तरी आहे’ असे शब्दोच्चार झाले. अगदी पुसटपणे दिसत असलेल्या चित्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन साफसफाई सुरू केली. काम करता करता ‘अरे इथे पण आहे, तिकडे पण,’ असे करत करत तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह समोर आला. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शोधाच्या पहिल्याच पावलावर मिळालेले हे यश आम्हाला आनंद देऊन गेले. हे काम करत असताना त्या वेळचे वातावरण मात्र असह्य करणारे होते. वातावरणातील हा फरक आम्हाला लक्षात येत नव्हता. शक्य तेवढ्या लवकर काम आटोपून तिथून परत फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुक्कामी परतेपर्यंत एका मोठ्या वादळी पावसाने आम्हाला गाठले आणि वातावरणात झालेल्या फेरबदलाचे कारणदेखील समजले. एका वेगळ्या विषयातील आमचा प्रवेश, सोबत निसर्गातील वेगवेगळे अनुभव यांची व्याप्ती पुढे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल, याची आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला परिचित असलेले प्र. के. घाणेकर, डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. सचिन जोशी व रवींद्र लाड या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. आम्हाला मिळालेल्या रचना खूपच पुरातन असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती लागलेला खजिना कोकणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे लक्षात आले. ही गोष्ट सर्वांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ती भेट म्हणजे आम्ही निवेदन देणे आणि त्यांनी ते गोड हसत स्वीकारणे, या पलीकडे काही नव्हते. आज हा विषय जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. असे असतानादेखील त्या खात्याचा प्रतिसाद आजपर्यंत तसाच आहे.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उजळणी केली. आज सर्वज्ञात असलेला कातळ-खोद-चित्र हा शब्द त्या वेळी सर्वसामान्य माणसांना माहीतदेखील नव्हता. त्या संदर्भात एखाद्याला काही माहिती असल्यास त्याची ओळख निराळी होती. तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहितीही अत्यंत त्रोटक होती. आम्हाला आलेल्या अनुभवांतून आमची चौकशीची दिशा बदलली. कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आमच्या बदलेल्या कार्यपद्धतीला यश आले. अल्पावधीतच आठ ते १० ठिकाणी असे काही तरी आहे, अशी माहिती समोर आली. आमची शोधमोहीम तीन टप्प्यांत विभागलेली होती. पहिला टप्प्यात मिळालेल्या संदर्भानुसार खात्री करण्याचा समावेश होता. त्यानुसार खात्री करण्यात आली आणि पाच-सहा ठिकाणी चित्ररचना असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
दुसऱ्या टप्प्याच्या मोहिमेची कल्पना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना दिली. शिंदे सर म्हणजे एक निसर्गप्रेमी आणि वर्दीमागील संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समान आवडीच्या विषयातून ऋणानुबंध जुळून आले. आमच्या गप्पांमध्ये ते एक गोष्ट सातत्याने सांगायचे, की एखादे चांगले काम निःस्वार्थी भावनेने आणि सर्वस्व अर्पून हाती घेतले, की निसर्गही त्याला साथ देतो; आपल्या नकळत ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तशी परिस्थिती निर्माण करतो. गरज असते ती ओळखण्याची. आमच्या कातळ-खोद-चित्रांच्या शोधमोहिमेत त्यांच्या या सांगण्याची प्रचीती आम्हाला सातत्याने येत गेली. त्यांनी लगेचच त्यांच्या परीने मदत देऊ केली. त्यांनी देऊ केलेली ही मदत मोलाची होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या मदतीचा आम्हाला फायदा झाला. लोकांशी संवाद साधणे सोयीचे गेले.
शोधाच्या या टप्प्यावर एकंदर पाच गावांचा समावेश होता. ही सर्व गावे राजापूर तालुक्यातील होती. (१) सफाईसाठी आवश्यक साहित्य व सोबत्यांसह भालावली गावाच्या सड्यावर पोहोचलो. परिसराची पाहणी करताना पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन झाले. बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला होता. उर्वरित भागातील चित्रे शोधून साफसफाई केली. या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह मिळाला. या ठिकाणाची कथा येथे संपत नाही. पुढे आम्ही चालविलेल्या प्रयत्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने साथ दिली. या ठिकाणाच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला, असे कळले. या परिसराचा विकास तर सोडाच, परंतु याच ठिकाणी झालेल्या अन्य एका शासकीय कामात चित्रपरिसराला धक्क्का बसून दोन-तीन चित्रे कायमस्वरूपी नष्ट झाली आहेत. एकंदर घडलेल्या सर्व प्रकारातून लोकांची आस्था नक्की कशात आहे, यावर मात्र आमच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.
बरोबर उलटा अनुभव सोलगावात आला. (२) तिथे पोहोचलो, तेव्हा त्या गावचे काही ग्रामस्थ आणि पोलीस पाटील वाट पाहत होते. गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. साफसफाई केल्यावर चित्ररचना स्पष्ट झाल्या. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना आढळून आली.
परतीच्या वाटेवर आपापसांत झालेल्या गप्पांमधून एक निराळीच गोष्ट समोर आली. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे. एक वेगळीच गोष्ट.
आपल्या गावातील प्राचीन ठेवा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिले. त्यांचे हे आश्वासन राजकीय नेते, सरकार यांसारखे नव्हते. ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.
असाच अनुभव आम्हाला देवाचे गोठणे या गावात आला. (३) लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. या गावात कोकणाचा निर्माता श्री भार्गवरामाचे म्हणजेच परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ३५०-४०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. इ. स. १७१० ते १७२०च्या दरम्यान ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी मूळच्या गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री भार्गवरामाच्या मंदिराची स्थापना केली. येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात. मंदिराजवळच्या सड्यावर सुमारे साडेसात फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या रचनेची स्थानिक ओळख रावण अशी आहे. त्यावरून या सड्याला रावणाचा सडा असेही ओळखले जाते. सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत. या रचनांचा शोध घेत असताना आम्हाला एक अनोखी गोष्ट मिळाली.
गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे… असे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या जागेचा संपूर्ण दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न आम्ही अंगीकारला होता.. अगदी सुरुवातीपासूनच.
या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध आम्हाला लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले; पण हा विषय सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आकलनापलीकडचा होता. एक तर या चित्रपरिसराला रावणाचा सडा म्हणतात. त्यामुळे काही ना काही श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटलेल्या. त्यात त्यांच्या डोळ्यासमोर होकायंत्रातील गोलगोल फिरणारा काटा. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव उमटले होते. त्यातूनच त्यांनी ‘साहेब आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली आहे का? असेल तर आपण इथे नारळ देऊ या’ अशी विनंतीवजा सूचना केली. स्थानिक लोकांमध्ये या गोष्टी किती खोलवर रुजल्या आहेत, याचे दर्शन झाले.
चुंबकीय विस्थापन हे प्रकरण स्वस्थ बसू देत नव्हते, दगडातील चुंबकीय घटकांमुळे हे घडते आहे, हे जरी लक्षात आले असले, तरी नक्की काय हे जाणून घेण्याची धडपड चालू होती. भूगोल विषयातील नामांकित प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची भेट घेतली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या चुंबकीय विस्थापन क्षेत्राचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात आला. त्यातून पुढे आलेले अनुमान आणखी कोड्यात टाकणारे निघाले. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही. येथील चुंबकीय विस्थापन, तसेच जागामालक नीलेश आपटे व त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ, त्यांची मिळालेली साथ, तिथला परिसर हा अजून एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
येथून आमचा पुढचा प्रवास होता (४) हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावातील. या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. ‘सातविणीच्या बुंध्याखाली’ एवढाच काय तो संदर्भ. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. आम्हाला या चित्राचा संदर्भ मिळाला होता. नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.
या परिसरातील एक वेगळी प्रथा अनुभवायला मिळाली. ढोल-ताशा हा कोकणातील एक पारंपरिक वाद्य प्रकार. इथे दोन मेळ्यांमध्ये (गटांत) ढोल-ताश्यांच्या बोलातून स्पर्धा भरते. जाखडी नृत्यप्रकारात असणाऱ्या सवाल-जबाबसारखे सवाल-जबाब ढोल-ताश्यांच्या बोलातून एकमेकांसमोर ठेवले जातात. कोकणाची कला-समृद्धी दाखविणारा हा वाद्यप्रकार. (५) देवीहसोळ गावाच्या सड्यावर आर्यादुर्गा देवीचे मंदिर वसले आहे. उपळे येथे असलेल्या चौकोनी आकाराच्या मोठ्या रचनेसारखी, पण अत्यंत सुस्पष्ट रचना या मंदिराच्या परिसरात आहे. या चित्ररचनेच्या आजूबाजूला अस्पष्ट अवस्थेत आणखी काही रचना आढळून येतात.
मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येथे उत्सव साजरा केला जातो. जवळच्या भालावली गावाची देवी पालखीतून आर्यादुर्गा देवीला भेटायला येते. भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो. हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही.
कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. लोकांशी झालेल्या बोलण्यातून तेथे असलेली रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही, असे लक्षात आले. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या माहितीमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बातमीवजा वृत्त प्रसिद्ध झाले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरून प्रसारण झाले. हा विषय बऱ्यापैकी सर्व लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत चौकशी, वृत्तपत्रांतील बातम्या यातून नवीन संदर्भ हाती येऊ लागले. सगळेच संदर्भ बरोबर होते असे नाही; पण आपणहून पुढे येऊन माहिती द्यायच्या लोकांच्या प्रयत्नांना मान देणेही तेवढेच आवश्यक होते. शेकडो किलोमीटरची पायपीट चालू होती.
राजापूर तालुक्यातून मिळत असलेल्या संदर्भांबरोबर आता रत्नागिरी तालुक्यातून मिळालेल्या संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी-पावस मार्गावर (६) गोळप सड्यावर चित्र आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील (७) करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून आला. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले आतापर्यंतच्या शोधातील हे एकमेव ठिकाण.
एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून मेर्वी गावाच्या सड्यावरील चित्ररचनांचा शोध लागला. पावस-पूर्णगड मार्गावर असलेले हे गाव. मिळालेल्या संदर्भानुसार, या गावातील मधुकर गुरव ठिकाण दाखविण्यास सोबत आले. चालता चालता माहिती घेण्याचे काम सुरू होते. काही तरी चित्रविचित्र खुणा आहेत, त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. त्यांनी एक आख्यायिका सांगितली. कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.
बोलता बोलता चित्रपरिसरात पोहोचलो. काही रेषा कातळावर वाहून आलेल्या मातीखाली आपले अस्तित्व दाखवत होत्या. साफसफाई केल्यावर चित्रे स्पष्ट झाली. या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. एकंदर रचना पाहून गुरव यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. एवढी वर्षे येथे वावरूनदेखील या रचना नक्की काय आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर (१०) दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.
या गावातील रहिवासी डॉ. गजानन रानडे यांनी एक आख्यायिका सांगितली. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.
एव्हाना आमच्याकडे पुरेशी माहिती गोळा होऊ लागली होती. शोधातून मिळालेल्या चित्ररचनांची छायाचित्रे आमच्याकडे होती. लोकांशी संवाद साधताना ही छायाचित्रे आम्ही दाखवू लागलो. असे काही बघितले आहे का, हे विचारणे सोयीचे जात होते. त्यात राजापूर तालुक्यात (११) साखरकोंबे गावाचा संदर्भ हाती लागला. गावात केलेल्या चौकशीतून काहीच हाती लागत नव्हते. एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांची गाठ पडली. गावातील लोकांबरोबर चाललेला संवाद त्या मुलांच्या कानावर पडला. आम्ही दाखवलेली छायाचित्रे त्यांनी पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत आपल्याला काही वेगळी माहिती मिळून जाते, याचा अनुभव आम्हाला आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये वेळोवेळी आला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह न मोडता आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर पोहोचलो. त्यांनी पुरवलेली माहिती अचूक होती. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे. या ठिकाणाचा आमच्या शोधाचा दुसरा टप्पा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार शाळेची सुट्टी संपल्यानंतर घेण्यात आला.
शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेतील मुलांसह शिक्षकदेखील सहभागी झाले. तीन-चार ठिकाणी विभागलेला हा परिसर. या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. काही चित्ररचना शोधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. असाच अनुभव आम्हाला पुढे आणखी एका ठिकाणी आला.
आडिवऱ्यानजीक (१२) रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. दोन-तीन फूट लांबी-रुंदीचे काही तरी आहे, एवढ्या माहितीवर प्रवास सुरू झाला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना मिळाली. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना. या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना मिळाली.
या चित्ररचना शोधत असताना एका अनाहूत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे मिळाली. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह मिळाला. दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. संबंधित जागामालकासह आजूबाजूच्या गावांतील जवळपास सर्वच लोकांना आपल्या येथे असे काही आहे, याची माहिती नव्हती. पुढे काही दिवस औत्सुक्यापोटी ही मंडळी सड्यावर या चित्ररचना पाहण्यासाठी जात होती, हे विशेष.
निनाद तेंडुलकर यांनी लांजा तालुक्यातील भडे गावात काही चित्रे असल्याचा संदर्भ दिला. (१३). या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. या ठिकाणी आमचे काम चालू असताना एका अनाहूत व्यक्तीने आणखी माहिती पुरविली आणि अधिक चौकशी करण्याच्या अगोदर निघूनही गेली. (१४) हे ठिकाण होते लावगण गावाच्या हद्दीत. तिथे सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळेपणाकडे आमचे लक्ष वेधले गेले. यातून आमचा सर्व चित्ररचनांचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. याच वेळी आम्ही परत एकदा खूप पूर्वीपासून पाहत आलेल्या (१५) निवळी, व रामरोड या ठिकाणी भेट दिली. निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. (१६) रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.
चित्ररचनांचा शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण चालू होते. त्यातून असे लक्षात आले, की मिळालेल्या रचनांमधील प्राण्यांच्या रचना या वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आहेत. पक्षी या प्रकारातील काही रचना आकाराने खूपच भव्यदिव्य अशा आहेत. मनुष्याकृतींमध्ये वैविध्य आहे. भौमितिक रचनेतील आकारांमध्ये आणि विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे. प्राणी, पक्षी, भौमितिक रचना, मनुष्याकृती या सर्व रचना खोदून निर्माण केलेल्या, रेषेने केलेल्या आहेत. भौमितिक रचनांचे आकलन होत नसले, तरी बाकी रचनांमधून ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे, पक्ष्यांचे आहे, याचे आकलन नेटक्या पद्धतीने होते. मोठ्या चौकोनी आकाराच्या उठावाच्या भौमितिक रचना आणि त्यांच्या आजूबाजूला सापडणाऱ्या ढोपरापासून खाली पायाच्या रचना आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या अशा आहेत.
पूर्वीपासून ज्ञात रचना आणि हाती आलेल्या रचना यात असलेला फरक आणि वैविध्य तज्ज्ञ मंडळींच्या निदर्शनास आणले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. चित्रांचा आकार, त्यातील वैविध्य, त्यांचा पसारा या गोष्टी त्यांच्यासाठीदेखील नवलाच्या होत्या. अर्थात त्यांच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण झाले हे मात्र नक्की.
जे आहे ते आगळेवेगळे आहे, पुरातन आहे हे मात्र निश्चित होते. म्हणून पुरातत्त्व ख्यात्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी भा. वि. कुलकर्णी हे अधिकारी होते. परंतु ‘हा माझा विषय नाही. त्यामुळे मी याबाबत काही माहिती देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. आमची निराशा झाली; पण त्या प्रसंगातून या विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेथून सुरू झाला चित्ररचना शोधाबरोबर त्यांच्या निर्मात्याचा शोध.
शोध घेत असताना चित्ररचनांना असलेल्या धोक्यांबाबतदेखील अंदाज आला. पर्यटनाच्या अंगानेदेखील याचे महत्त्व, वेगळेपण आमच्या लक्षात आले. अभ्यास हा न संपणारा विषय आहे; पण त्यासाठी या गोष्टी टिकणे गरजेचे आहे. या विचारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सविस्तर माहितीवजा निवेदन त्यांना सादर केले. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे सर यांची मोलाची मदत मिळाली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीदेखील सकारात्मक साथ दिली.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनादेखील हा विषय सांगितला. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन राजापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात तेथील अधिकारी व नागरिक यांच्याबरोबर एकत्रित बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे फलित म्हणजे राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पुढे त्यांचे मिळालेले सहकार्य अप्रतिम असेच. आमच्या शोधकार्यासाठी आता आम्हाला रत्नागिरीच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांची साथ लाभली होती.
एका बाजूला याविषयी अभ्यास करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला या विषयातील माहीतगार व्यक्तींचा शोध. त्याचबरोबर शोधादरम्यान मिळालेल्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्या नकाशावरून एक आकृतिबंध तयार केला. इंटरनेटच्या माध्यमातून हाती माहिती मिळत होती; पण कोकणाशी संबंधित अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडोपी येथे असलेल्या चित्ररचना कळल्या. त्या चित्ररचनांवर सतीश लळीत यांनी काम केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे असलेल्या रचनेपलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही. कुडोपी येथील रचना नवाश्मयुगीन कालखंडातील असाव्यात, असे मत त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे. गोवा राज्यात कुशावती नदीच्या किनाऱ्यावरदेखील अशा रचना असल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून लक्षात आले.
एकीकडे अभ्यास चालू असताना नवीन ठिकाणांचे शोधकार्यदेखील चालू होते. ‘टिक्याच्या (ता. रत्नागिरी) कातळावर काही तरी आहे,’ एवढ्या संदर्भावर शोध सुरू झाला. गावात चौकशी करण्यासाठी गेलो असता एके ठिकाणी काही व्यक्ती भेटल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आणखी एका ठिकाणाची माहिती समोर आली. (१७) हे ठिकाण होते उमरे गावाच्या सड्यावर. त्यांच्यातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी असे काही असल्याचे सांगितल्याचे आठवत होते. ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा हा संदर्भ. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. पहिला टप्पा पार पडला. परतीच्या वाटेवर सोबतची व्यक्ती सहेतुक आपल्यासोबत वावरत असल्याचा अंदाज आला. त्याचा खिसा गरम करून आणि ‘काही मिळाले तर कळवा’ असे सांगून निरोप घेतला. आमच्या एवढ्या प्रवासात अनुभवलेला हा असा पहिलाच प्रसंग.
या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. गंमत म्हणजे ज्या ठिकाणाचा संदर्भ घेऊन पोहोचलो होतो, ते ठिकाण आजतागायत मिळालेले नाही.
निवळी गावडेवाडी येथे काही तरी आहे, अशी माहिती पुढे आली. (१८) गावडेवाडी परिसरात पोहोचलो, तेव्हा हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, हे निदर्शनास आले. थोडी माहिती घेण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध माणसाची गाठ पडली. त्या व्यक्तीने शिल्लक चित्ररचना दाखवल्या. या रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.
सुदैवाने शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीचा मालक तेथे आला. या चित्ररचनांना धक्का लावू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही प्राथमिक होकार दर्शवला. परतीच्या वाटेवर त्या वृद्ध माणसाने खंत व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासक आहोत,’ असे सांगून काही मंडळी या ठिकाणी पूर्वी येऊन गेली असल्याची माहिती दिली. परंतु पुढे काय? हे जपले पाहिजे वगैरे गोष्टी सांगतात; पण त्यावर कोणीच काही करत नाही. ही चित्रे पण लवकरच नष्ट होतील. बाकीच्या चित्रांसारखी. असे सांगून ‘तुम्ही स्थानिक काही करणार का,’ असा प्रश्न आमच्यासमोर मांडून ठेवला.
‘पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर खरोखरच या ठिकाणाने सोडवले. काही महिन्यांनंतर या ठिकाणी काही पर्यटकांसोबत आलो असता चिरा खाणमालकाने आपला शब्द पाळला नसल्याचे लक्षात आले. चित्ररचनांपासून अगदी जवळ चिरा खाणीचे काम सुरू करण्यात आले होते. लगेच हा विषय जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी तातडीने कारवाई करून खाणीचे काम बंद केले. तसेच अन्य कोठे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित काम बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित कातळचित्रे ‘सात-बारा’वर नोंद करता येतील का, या दृष्टीने विचार करून, त्या ठिकाणची महसुली कागदपत्रे गोळा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या. त्यामुळे कातळचित्र संरक्षणासाठी एक आश्वासक सुरुवात झाली.
येथे मिळालेल्या माहितीनुसार काही अभ्यासक भेट देऊन गेल्याचे पुढे आले. योगायोग कसा असतो… त्याचदरम्यान ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राध्यापक मराठे यांची गाठ पडली. कला या दृष्टीने विचार केल्यास आढळलेली चित्रे, ती कोरण्याची पद्धती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचा संदर्भ दिला. त्यांना संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. अशोक मराठे, प्रधान सर व सुबोध शिवलकर ही टीम कोकणातील प्राचीन बंदरे या विषयावर काम करत असताना त्यांना एक-दोन ठिकाणी चित्ररचना आढळलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखातून पालशेत, निवळी व देवीहसोळ या ठिकाणांचा उल्लेख समोर आला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी कोत्रे हिने कापडगावात चित्रे असल्याची माहिती दिली. आमच्या शोधात प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळी रचना समोर येत होती. (१९) कापडगावातदेखील वेगळी रचना समोर आली. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.
राजापूर तालुक्यात (२०) सोगमवाडी येथील चित्ररचना शोधत असताना त्या गावातील एका माणसाची मदत घेतली. त्याने त्यांचे देव जिथे पूजतात, त्या ठिकाणाचे दर्शनदेखील घडवून आणले. लेणे असावे असे हे डोंगराच्या एका कपारीत असलेले स्थान. याच्या बाजूला पाण्याचा एक ओढा आहे. या पाण्याच्या साठ्याला हे लोक देव मानतात आणि पूजा करतात. (२१) आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या (२२) राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रपरिसर शोधण्यासाठी गावाच्या माजी सरपंचांची मदत झाली. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चित्रांमध्ये एखादे चित्र नेहमी नवीन कोडे निर्माण करत होते. इथेही तोच प्रकार. प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या. तेथील कथा अजून वेगळी. शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीच्या परिसरात आणखी काही रचना आहेत हे नंतरच्या कालावधीत पुढे आले. राजापूरचे प्रांताधिकारी खांडेकर यांनी तातडीने लक्ष घालून ही चिरा खाण बंद केली. खांडेकर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व. राजापुरातील पर्यटनवाढीसाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून नवदुर्गा दर्शन या वेगळ्या पर्यटनपूरक ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा कोकणातील हा पहिलाच पर्यटनप्रयोग होता. खांडेकरांनी कातळचित्रांबाबत त्यांच्या क्षेत्रात आढळून आलेल्या चित्रठिकाणांची कागदपत्रे गोळा करून कातळचित्रांची नोंद सात-बारा दप्तरी व्हावी, यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिला. त्यांचे संपूर्ण सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले.
पावसामुळे प्रत्यक्ष शोधाच्या प्रवासाला थोडी खीळ बसली. या कालावधीत चित्रांचे वर्गीकरण, मिळालेल्या ठिकाणांचा अक्षांश- रेखांशांच्या साह्याने एकत्रित नकाशा तयार केला. तज्ज्ञ लोकांकडून मिळालेली माहिती, या अगोदर काही ठिकाणांबाबत प्रसिद्ध झालेली माहिती याबाबत साकल्याने विचार झाला. ठाकूरदेसाई सरांमुळे एकंदर भौगोलिक रचनेचा अभ्यास करता आला. चित्रांच्या वर्गीकरणाच्या वेळी प्राणिशास्त्रातील मित्रांची मदत घेतली. त्यातून रचनेतील प्राणी नक्की कोणते हे जाणून घेणे शक्य झाले. त्यातून चित्ररचनेमध्ये मिळालेले सर्व प्राणी हे जंगलातील (वाइल्ड) आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. निवळी येथील मोठ्या चौकोनी आकाराच्या भौमितिक रचनांसारख्या रचना अन्यत्रही आढळून आल्या. त्या रचना प्रथमदर्शनी सारख्या दिसत असल्या, तरी त्यात खूप फरक आहे. आजपर्यंत मिळालेल्या संदर्भानुसार, यापूर्वी फक्त निवळी, देवीहसोळ, उमरे व बारसू याच ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी भेटी दिल्या असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांनी काढलेल्या अंदाजांचा पुरेसा मेळ आमच्या शोधात आढळलेल्या रचनांशी होत नसल्याचेदेखील लक्षात आले. उदा. बारसूच्या सड्यावर ज्या चित्ररचनेला तज्ज्ञ लोकांनी भेट दिली आहे, त्यांनी तिथे असलेल्या एका रचनेला दिशादर्शक चिन्ह असे संबोधले आहे. प्रत्यक्षात ते दिशादर्शक चिन्ह नसून, ती वाघळी माशाची चित्ररचना आहे.
एकंदर चित्ररचनांच्या ठिकाणचा पसारा लक्षात आला. त्यावरून आणखी कोठे चित्ररचना असू शकतील, याचा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. मिळालेली माहिती कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागलो. वेगवेगळ्या माध्यमांतून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालूच होता. आलेल्या अनुभवांतून शोधपद्धतीतदेखील थोडा बदल केला. सरकारदरबारी थोडा अधिक प्रयत्न चालू केला. पुढे येत असलेल्या माहितीतून भारतात अन्यत्र असलेल्या अशा प्रकारच्या चित्ररचनांपेक्षा वेगळ्या रचना, त्यांची निर्मितीची पद्धत यातील फरक स्पष्ट होऊ लागले. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था यामध्ये केलेल्या कार्यक्रमांतून कातळ-खोद-चित्रे हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला. नाही म्हटले तरी काही प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले.
पाऊस कमी होताच शोधमोहिमेच्या पद्धतीत केलेल्या बदलानुसार चौकशी सुरू झाली. (२३) गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे असावीत, असा आमचा अंदाज त्याच गावच्या विलास काळेंकडे बोलून दाखवला. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन माहिती घेतली आणि खरोखरच त्या गावाच्या सड्यावर चित्रे असल्याचे निश्चित झाले. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेली. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत.
(२४) परचुरी गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते.
इथल्या आख्यायिकेने आम्हाला नक्कीच विचारात टाकले. कातळात एखादी गोष्ट कशी काय गाडली जाऊ शकेल. कोवळा कातळ म्हणजे काय? मग प्रवास सुरू झाला आख्यायिका उलगडण्याचा. कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा बुडणे, गाडणे अशी आख्यायिका असलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती परत एकदा नजरेखालून घातली. आणि अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडला. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.
परचुरीच्या या सड्यावर असताना आमची एका हरहुन्नरी व्यक्तीशी गाठ पडली. ती व्यक्ती अनोळखी तर नव्हतीच. आमचा चांगला मित्र मिलिंद खानविलकर. उक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सध्या या व्यक्तीच्या खांद्यावर आहे. आम्ही त्याला सूचना केली, ‘तुमच्या गावाच्या सड्यावरदेखील अशा रचना आहेत. एकत्र शोध घेऊ.’ उक्षी गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. (२५) जांभरुण गावाच्या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलीच्या मनुष्याकृती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. या परिसराला राक्षसाची जाल असे म्हणतात.
करबुडे, जांभरुण, परचुरी येथील माहिती मिलिंदला दिली. रचना कशा शोधायच्या, याची कल्पना त्याला दिली. खरेच अत्यंत उत्साही अशा मिलिंदचा दोन दिवसांतच निरोप आला. (२६) उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना या ठिकाणी आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना.
मधल्या कालखंडात आमचे सरकारदप्तरी प्रयत्न चालूच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आमच्या कामाचे महत्त्व ओळखून, ग्रामीण पर्यटन विकास योजनेमध्ये कातळचित्रांच्या ठिकाणांचा समावेश केला आणि आपल्या परीने संपूर्ण मदत देऊ करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळत असलेले सहकार्य वादातीत होते. अशी दुर्मीळ उदाहरणे असतात. त्यात आम्ही एक होतो.
देशभ्रतार यांनी घेतलेला पुढाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याला उक्षीचे सरपंच मिलिंद यांनी खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद दिला आणि कातळचित्राच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग करून घेतला.
दरम्यानच्या काळात आमच्या पाठी उभ्या असलेल्या या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. अर्थात सरकारदरबारी नवा गडी नवे राज्य सुरू झाले. ते प्रयत्न एका बाजूला चालू असताना दुसरीकडे शोधकार्य चालूच होते.
प्र. के. घाणेकर यांच्यामुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या अंकातून लेख प्रसिद्ध झाला. आशुतोष बापट यांची सरांमुळे ओळख झाली. त्यांची मदत सातत्याने होत होती आणि आहेही.
एका बाजूला अप्रतिम सहकार्य मिळत होते, तर काही प्रसंगी वाईट अनुभवदेखील पदरात पडत होते. इतिहास या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या एका संस्थेने आमच्याकडून माहिती घेऊन वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न चालविला. या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले. ज्ञानदानाच्या क्षेत्रातील या गोष्टीची खंत वाटली.
शोधात नवनवीन ठिकाणांची भर पडत होती. (२७) कोतापूर, (२८) शेडे, (२९) नाटे, (३०) विखारे गोठणे, (३१) जयगड, (३२) कुरतडे, (३३) मासेबाव, (३४) रावारी, (३५) हर्चे, (३६) भडे, (३७) बेनी, (३८) कोळंबे अशी विविध ठिकाणे. प्रत्येक ठिकाणची चित्रे वेगवेगळी. काही ना काही कोडे निर्माण करणारी आणि आख्यायिकांपासून दूर. या सर्व प्रवासात आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सर्व ठिकाणांचा परत एकदा साकल्याने विचार केला. त्यातून चवे देऊड पंचक्रोशीत (३९) चवे गावी नवीन ठिकाण समोर आले. देवीहसोळ परिसरात अनेक चित्ररचना मिळाल्या. बारसूच्या सड्यावर आणखी खूप मोठा खजिना हाती लागला. यापूर्वी अभ्यासकांनी मांडलेली मते, गृहीतके यांचा नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे, हे आमच्या शोधकार्यात आलेल्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. बारसूच्या सड्यावर मिळालेल्या खजिन्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
कातळचित्रांच्या शोधाबरोबर आम्ही आडवळणावरचे कोकण जवळून अनुभवत होतो. जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांची ओळख होत होती. पक्षी कुळातील वेगवेगळ्या प्रजातींची भर पडत होती. कास पठाराएवढे सौंदर्य कोकणातील या कातळसड्यांवर अनुभवायला मिळत होते. कोकणातील जैवसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या बिबट्याचे दर्शन हे आमच्या दृष्टीने नेहमीचेच झाले.
गोवळ गावच्या टिपऱ्या, जैतापूर येथील खारवी समाजातील समई नृत्य, राजापुरातील शिमगोत्सवातील रोम्बाट ही आगळीवेगळी प्रथा, धनगर समाजातील गजा नावाचा नृत्यप्रकार, भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कोकणची समृद्धी अलगद उलगडली जात होती.

शिंदे सरांचे शब्द अगदी खरे होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यांना या विषयात विशेष रुची आहे. त्यांच्या येण्याने सरकारी पातळीवर काहीशा रेंगाळलेल्या विषयाला गती मिळाली. त्याचदरम्यान रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांची गाठ पडली. त्यांच्याकडून लाभत असलेल्या मदतीबाबत सांगण्यास शब्द अपुरे पडतील. खरे सांगायचे झाले, तर ते आमच्या टीमचे एक सहकारी बनून गेले आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून तेजस गर्गे यांच्याकडे कारभार सोपविला गेला. गर्गे सर स्वतः पुरातत्त्व शास्त्रज्ञ. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या विभागाला याच विषयातील व्यक्ती संचालक म्हणून तब्बल २२ वर्षांनी लाभली. आमच्या शोधाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण अशी बाब. त्यांची गाठभेट झाली आणि कातळचित्र या विषयाला ‘बुलेट ट्रेन’ची गती मिळाली. कातळचित्रांच्या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आजही ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मधल्या कालखंडात या विषयाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सरकारदरबारी ही चित्रठिकाणे संरक्षित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सातत्याने विचारविनिमय चालू आहे. त्यात अमित शेडगे यांच्याबरोबर लोकसहभागातून ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याही वेळी मिलिंद खानविलकर उभे राहिले आणि बघता बघता लोकसहभागातून उक्षी येथील गजराज संरक्षित झाले. जागामालक, स्थानिक ग्रामस्थ यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली, तर काय होऊ शकते, याचे एक जिवंत उदाहरण उभे राहिले. चित्र संरक्षित झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत सुमारे सात हजारांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला झाला आहे. अखंड महाराष्ट्रात प्रागैतिहासिक ठिकाण लोकसहभागातून संरक्षित झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. हा मान उक्षी या लहानशा ग्रामपंचायतीने पटकावला. मिलिंद खानविलकर यांच्यासारखे सरपंच सर्वत्र लाभले तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास वेळ लागणार नाही.
कातळ चित्रांबरोबर आमचा मंदिरांवरही अभ्यास होत होता. मंदिरातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. आज जगाच्या पाठीवर पोहोचलेले दशावतारी खेळे सर्वांना ज्ञात आहेत; पण कधीतरी लुप्त पावलेल्या या कलेला आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुनरुज्जीवन मिळाले आहे, हे कीती लोकांना ठाऊक आहे? गणेशगुळ्यातील लक्ष्मी- दामोदरची दुर्मिळ मूर्ती, गोवळमधील ब्रह्मदेवाची अत्यंत सुरेख मूर्ती, साटवलीमधील गुप्तकालीन विष्णूमूर्ती, अशी एक ना दोन… कोकणाचे वैभव असणारी ही मंदिरे.
मध्यंतरीच्या कालखंडात आणखी एक ठिकाण मिळाले. (४१) कशेळी. राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. या गावाच्या सड्यावर एका भल्या थोरल्या चित्ररचनेशी आमची गाठ पडली. ‘अबब’ हाच शब्द त्या रचनेला योग्य. सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह. या चित्ररचनेने परत एकदा वेगळ्या विचारांना गती दिली.
चित्ररचनांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ऋत्विज आपटे यांची नेमणूक करण्यात आली. आपटे स्वतः पुरातत्त्व अभ्यासक. त्यांच्यासोबत महसूल खात्याच्या अधिकारीवर्गाबरोबर सर्व ठिकाणांचा एकत्रित सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेदरम्यान आपटे यांच्या ज्ञानाचा आम्हाला अधिक उपयोग झाला. तत्कालीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आम्हाला मिळाली. कातळ-खोद-चित्रांच्या कालनिश्चितीसाठी थोडीफार का होईना, एक दिशा मिळाली.
या सर्व्हेदरम्यान माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळाल्या. सर्व्हेवेळी उमरे गावात गेलो. त्या वेळी गावातील ४०-५० माणसे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा विरोध होता. ‘आमची जागा आहे. आम्ही देणार नाही,’ वगैरे गोष्टींनी सुरुवात झाली. ती माणसे आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हती. ही चित्रे पुरातन नाहीत, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादात त्यांच्याच बोलण्यातून ही चित्रे कोणी कधी निर्माण केली हे माहिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा कुठे राग थोडा शांत झाला. या चित्रांचे महत्त्व, त्यामुळे गावाला होणारा फायदा या बाबींची कल्पना दिली. कोकणी माणसाची टिपिकल ओळख ही मंडळी बाजूला ठेवतील अशी अपेक्षा. उक्षीचे उदाहरण सर्व लोकांनी समोर ठेवले, तर या चित्रांचे संरक्षण नक्कीच शक्य आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत.
शोधप्रवास आजही चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आमचा प्रवास सुरू झाला आहे. आजमितीस ५२ गावांतून सुमारे ९० ठिकाणी १२००हून अधिक कातळ-खोद-चित्ररचना शोधण्यास यश मिळाले आहे. खरे म्हणजे प्रत्येक ठिकाणावर एक स्वतंत्र लेख होईल.
या चित्ररचना का कोरल्या गेल्या? त्यामागील उद्देश काय? चित्ररचनेतील गेंडा, पाणघोडा हे प्राणी कधी काळी कोकणात अस्तिवात होते का? त्यांचा कालखंड कोणता? या रचना एकाच कालखंडात कोरलेल्या आहेत की वेगवेगळ्या? देव, धर्म, भाषा या गोष्टी त्या माणसाला माहिती होत्या का? मानवी उत्क्रांतीचे गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन ही कातळचित्रे आपणासमोर उभी आहेत.
कातळ-खोद-चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली मिळालेली दगडी हत्यारे यांचा विचार करता या रचना निर्माण करणारा मानव भटका होता. अन्न मिळविण्यासाठी तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता. शेतीचे ज्ञान त्याला अवगत झाले नव्हते असे दिसते. यातून या रचना इसवी सन पूर्व १० हजार ते १२ हजार या कालखंडातील असाव्यात, असा अंदाज तज्ज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. अश्मयुगीन कालखंडातील या रचना भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची आणि अधिक पुराव्यांची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.
एक महत्वाआहची बाब म्हणजे या शोधाची दखल बीबीसी, दी हिंदू, लाइव्ह इंडिया, हिस्टरी डॉट कॉम यांसारख्या जगातील अग्रगण्य प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे अन्य देशांतील तज्ज्ञ, पर्यटकही कोकणाकडे वळू लागले आहेत. कातळ-खोद-चित्रांचा शोध, संरक्षण व संवर्धन या आमच्या विषयाला आता योग्य बळ मिळू लागले आहे. आमचा हा प्रवास पूर्णपणे तन, मन, धन अर्पून चालू आहे. आजपर्यंत एक नया रुपयाचीही मदत संस्था, सरकार किंवा व्यक्ती अशा कोणाकडूनही मिळालेली नाही. हे मुद्दाम लिहायचे कारण, की महाराष्ट्र सरकारने २४ कोटी रुपयांची घोषणा केली आहे; पण ती फक्त घोषणा आहे. कोकणाच्या सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.
कातळचित्रांच्या शोधात आम्हाला फक्त ती चित्रेच मिळाली, असे नव्हे, तर आडवळणावरील कोकणाचे खरेखुरे सुंदर रूप आमच्यासमोर उलगडले. माणसांच्या स्वभावांचे अंतरंग उलगडले, कातळचित्रे म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नव्हे. तो अभ्यास आहे पुराशास्त्राचा, माणसाच्या उत्क्रांतीचा, भौगोलिक गोष्टींचा, जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांचा. भौतिक आणि रसायनशास्त्राचा. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण असा हा विषय आहे.
संपर्क : ९४२२३ ७२०२०, ९४२३२ ९७७३६
ई-मेल : bhairisbud@gmail.com
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
7 comments