कोकणातील कातळशिल्पे, शिवरायांचे किल्ले जागतिक वारसास्थळांच्या यादीत जाणार; ‘युनेस्को’कडून प्रस्ताव तत्त्वतः मंजूर

मुंबई : जागतिक वारसा दिनी (१८ एप्रिल) कोकणवासीयांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कोकणातील सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा वारसा असलेली कातळशिल्पे आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले सागरी व डोंगरी किल्ले यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत (ASI) सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज (१८ एप्रिल) ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली. यामुळे मराठी माणसाचा समृद्ध वारसा आणि अभिमान असलेल्या या वास्तू आणि कलाकृतींचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होण्यास मदत होणार आहे. ‘ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे,’ अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात विविध भौगोलिक परिस्थितीत बांधलेले किल्ले मावळ्यांनी रक्त सांडून उभ्या केलेल्या स्वराज्याच्या समृद्ध इतिहासाची, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभे आहेत. तसेच, गेल्या काही वर्षांत कोकणात, प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या कातळांच्या सड्यावर मोठ्या प्रमाणावर कातळशिल्पे (कातळ-खोद-चित्रे) आढळून आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसंच गोवा राज्यातही काही कातळशिल्पे आढळली. या शिल्पांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण ही शिल्पे कोकणात आढळली असली, तरी त्यांच्या संशोधनातून अखिल मानवजातीच्या इतिहासावर प्रकाश पडण्यास मदत होणार असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ यांचे प्रस्ताव जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी युनेस्कोकडे पाठवले होते. या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्त्वत: स्वीकार केल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

नामांकन प्रक्रियेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या डोंगरी व समुद्री किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या कोकणातील कातळशिल्पांचा, तसेच, गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पाचा समावेश आहे.

‘छत्रपती शिवरायांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होईल. तसेच, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व जागतीक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल,’ असे अमित देशमुख यांनी सांगितले.

कोकणातील कातळ-खोद-चित्रे हा गेल्या काही वर्षांत अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. या अमूल्य पुरातन ठेव्याचे जतन संवर्धन व्हावे, यासाठी या कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते असलेले रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, प्रा. धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांची स्वखर्चाने धडपड चालू आहे. पूर्वजांच्या या पाषाणखुणा शोधण्याचा त्यांचा प्रवास खूपच उद्बोधक आणि रंजक आहे. त्यांच्या या शोधकार्याच्या प्रवासाबद्दलचा प्रदीर्घ लेख साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकात प्रसिद्ध केला होता. हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply