कातळशिल्पांच्या अनुषंगाने कोकण पर्यटन मॉडेल बनवावे – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर आहेत. तसेच ज्या गावात कातळशिल्प आहेत, त्या गावांनी पुढाकार घेतल्यास कोकण समृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.

थिबा राजवाड्याच्या प्रांगणात पर्यटन संचालनालयाच्या कोकण प्रादेशिक कार्यालय विभाग, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि निसर्गयात्री संस्था आयोजित पहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवात २६ मार्च रोजी सायंकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, कातळशिल्प या रत्नाचे महत्त्व ओळखून त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचे अर्थार्जनामध्ये रूपांतर होईल. यातून कातळशिल्प असलेल्या भागांचा विकास होऊन तेथील गावांचा कायापालट होईल. त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. जिल्ह्यात १७०० पेक्षा जास्त कातळशिल्पांचा योग्य अभ्यास करून त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले तर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. या गावातील तरुणांना रोजगारांसाठी बाहेर जावे लागणार नाही. कातळशिल्प पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा वारसा, संस्कृती, वैविध्य, ऐतिहासिक महत्त्व जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी कातळशिल्प महोत्सवाबद्दल समाधान व्यक्त केले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले की कोकणातील प्रत्येकाने आपल्या गावात, शहरात, जिल्ह्यात पाहण्यासारखे काय आहे, ते आधी पाहिले पाहिजे. शाळेपासूनच त्याची सुरुवात व्हायला हवी.

याप्रसंगी व्यासपीठावर नालंदा विद्यापीठाचे प्रा. डॉ. तोसाबंता प्रधान, माजी माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश लळित, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, शोधकर्ते सुधीर रिसबूड, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, धनंजय मराठे आदी प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी रिसबूड म्हणाले, २०१२ पासून कातळशिल्प अभियान सुरू केले. आज दहा वर्षांनी महोत्सव होत आहे. आज आनंदाचा दिवस आहे. युनेस्कोच्या वारसायादीत कातळशिल्पांचा समावेश होण्यासाठी ९ प्रस्ताव आहेत. पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. कोकणातील चित्रे आकाराने अतिप्रचंड आहेत. संवर्धनावेळी बरेवाईट अनुभवही आले. कातळशिल्प पाहण्यासाठी आजवर ६० ते ७० हजार पर्यटक येऊन गेले आहेत. त्यामुळे गावातच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे.
कातळशिल्प मोहीम आणि संवर्धनासाठी मदत करणारे उक्षीचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, तहसीलदार शशिकांत जाधव, गुहागर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, चवे सरपंच दीपक गवाणकर, देऊड जागामालक प्रसाद आपटे, देवाचे गोठणे जागा मालक नीलेश आपटे, वास्तुविशारद मकरंद केसरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, कोटचे संजय पाष्टे, लांज्यातील प्रा. विजय हटकर, रुण (ता. लांजा) ग्रामस्थ, यूट्यूबर मुक्ता नार्वेकर, डॉ. श्रीधर आचार्य, सुहास ठाकूरदेसाई, चित्रकार आशुतोष कोतवडेकर, सुशांत पेटकर यांचा सन्मान करण्यात आला. फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या रितू छाब्रिया यांच्या वतीने जनरल मॅनेजर तानाजी काकडे यांनी सन्मान स्वीकारला.

आधी राजापूरला आणि सध्या गुहागरमध्ये तहसीलदार असलेल्या सौ. प्रतिभा वराळे म्हणाल्या की, राजापूरमधील सर्व कातळशिल्पांची महसुली नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जो कोणी जागामालक आहे, त्याला या कातळशिल्पांचे संवर्धन करावे लागेल. ही जबाबदारी निश्चित होणे महत्त्वाचे होते. संवर्धनामुळे प्रत्येक गाव सक्षम होणार आहे.

दरम्यान, पहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवातील विविध प्रदर्शनांचे उद्घाटन थिबा राजवाड्याच्या प्रांगणात सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे न्यावयाचा असल्याने विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्‌घाटन केले. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली. यात कातळशिल्पांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. कातळशिल्प म्हणजे काय, कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी येथे कातळशिल्पे कशी चितारली, याचा इतिहास तेथे सांगण्यात येत आहे. प्रदर्शनात रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्‍यातील पर्यटनस्थळांचे सादरीकरण करणारे ४ स्टॉल, अवेकनिंग ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांच्या वस्तूंचा स्टॉल पाहण्यासारखा आहे. या दिव्यांग कलाकारांनी कातळशिल्पांची छबी पर्स आणि अन्य शोपीसवर उमटवली आहे. या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी अनेकांनी या स्टॉलला भेट दिली. तसेच कथित संस्थेने साकारलेल्या वारसा जपणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन आणि देवरूखच्या डीकॅड कॉलेजचे कला प्रदर्शन उल्लेखनीय आहे. दगडांमधील प्रकार, दगडांपासून आदिमानव हत्यारे कशी तयार करत होता, याचे प्रदर्शन बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे डॉ. तोसोपंत प्रधान यांनी भरवले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन जाणून घेण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी झाली. ओरिगामी ट्रेक डायरी या यूट्यूब चॅनेलतर्फे कोकणातील पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आडवळणावरच्या कोकणचे पैलू उलगडणारे सादरीकरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि रमेश कीर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply