तुका म्हणे आता – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२७ मार्च २०२२, सायंकाळी ७.०० वाजता) – तुका म्हणे आता

सादर करणारी संस्था – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोजचे नाट्यप्रयोग होतील. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता तुका म्हणे आता हे नाटक कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सादर करणार आहे. हे या नाट्य स्पर्धेतील अखेरचे नाटक आहे.

तुका म्हणे आता हे संगीत नाटक प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिले आहे.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली ४४ वर्षे कणकवली येथे सांस्कृतिक संवर्धनाचा काम करत आहे. या काळात सातत्याने महाराष्ट्रातील जुनी आणि नामांकित अशी ‘नाथ पै एकांकिका स्पर्धा’, प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांचा मच्छिंद्र कांबळी नाट्यमहोत्सव, शास्त्रीय संगीताचा संगीत महोत्सव, छोट्या मुलांसाठी सृजनाच्या वाटा, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारे सघन गान शिक्षण केंद्र असे विविध उपक्रम संस्था आहे. संस्थेने आजपर्यंत २२ एकांकिका आणि १६ दोन अंकी नाटकांची निर्मिती केली आहे. संस्थेच्या एकांकिकांना राज्यस्तरावर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक पारितोषिकांनी सन्मानित केले असून संस्थेची नाटके राज्य नाट्य स्पर्धा व महाराष्ट्रातील नामांकित नाट्य महोत्सवांमध्ये सादर झाली आहेत.

संस्थेची पार्श्वभूमी :

संस्कृती म्हणजे समाजाचे व्यक्तित्व. या व्यक्तित्वाच्या संपन्नतेत आर्थिक विकास जसा महत्त्वाचा आहे, तसाच, किंबहुना त्याहून मोठा सहभाग वैचारिक उद्बोधनाचा आहे. जीवनाचा निकोप आनंद लुटण्यासाठी रसिकता जागवणे महत्त्वाचे आहे. कोकणची माती तळपते बुद्धिवैभव प्रकट करणारी आहे. नाट्य, संगीत, चित्र यासारख्या ललितकलांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे ही कोकणच्या लाल मातीची देणगी आहे.

कै. वसंतराव आचरेकर हे संगीत क्षेत्रातील असेच एक कोकणातील विलोभनीय व्यक्तिमत्त्व होते. केवळ कुमारजींना केलेल्या तबल्याच्या साथीमुळे ते मोठे नव्हते तर भारतभर पसरलेल्या संगीतप्रेमींना एका परिवाराचे स्वरूप देण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीतून “वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली” ही संस्था सन १९८० साली स्थापन करण्यात आली. संस्था स्थापन करताना विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आली.

ही उद्दिष्टे अशी :
१) संशोधन वृत्ती वाढीला लागेल अशा तर्‍हेचे परिसंवाद, व्याख्यानमाला आयोजित करणे, परिसराच्या सांस्कृतिक विकासाला मदत होईल, अशा संशोधन कार्याला सहाय्य करणे.
२) सामाजिक वास्तवाचे भान नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे उत्पन्न करता येते. या दृष्टीने एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा, नाट्यलेखन स्पर्धा अशा स्पर्धा आयोजित करणे. नाट्याबरोबर संगीत येणे अपिरहार्य आहे. यासाठी अभिजात संगीताची अभिरुची वाढीला लागण्यासाठी शास्त्रीय गायन स्पर्धा, वादन स्पर्धा, भावगीत गायन स्पर्धा आयोजित करणे, संगीत शिक्षण वर्ग सुरू करणे, नाट्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
३) नवशिक्षित व अल्पशिक्षितांमध्ये साहित्यविषयक जाणीव वाढीस लावण्याच्या दृष्टिकोनातून कथा, कविता वाचन, साहित्यिक गप्पा-टप्पा यांचे आयोजन करणे – जेणेकरून त्यांच्या प्रतिभेला संधी उपलब्ध होईल. थोडक्यात कलेचा विकास व्हावा यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे व तशा तऱ्हेने कार्य करणे.

या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संस्था अविरत कार्यरत आहे. संस्थेने या संदर्भात विविध विभागात आजवर केलेले कार्य थोडक्यात असे :

१. व्याख्याने / मुलाखती- ४ नाटककार रत्नाकर मतकरी- सन १९७९ * नाटककार जयवंत दळवी – सन १९८२ * समीक्षका श्रीमती पुष्पा भावे – सन १९८३ * ख्यातनाम लेखक रणजित देसाई – सन १९८४ * सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक माधव मनोहर – सन १९८५ * ख्यातनाम समीक्षक कमलाकर नाडकर्णी – सन १९८५ * ख्यातनाम वैज्ञानिक, विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके – सन १९८७ * दूरदर्शन निर्मात्या सौ. किरण चित्रे यांचेशी दूरदर्शन माध्यमासंदर्भात चर्चा-माहिती-गप्पांचा कार्यक्रम सन १९८८ ५ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे – सन १९८९ * दूरदर्शन निर्माते डॉ. विश्वास मेहेंदळे – सन १९९०. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि प्रभावी वक्‍ते प्राचार्य गोपाळराव मयेकर – सन १९९१ « सौंदर्य शास्त्राचे अभ्यासक, नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्याशी नाट्यशास्त्राविषयी गप्पा-टप्पांचा कार्यक्रम – सन १९९२ * विख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल – सन १९९२. प्रा. सतीश आळेकर – सन १९९२ * दिग्दर्शिका श्रीमती विजया मेहता – सन १९९३ ५ विजय तेंडुलकर – सन १९९३ * महेश एलकूंचवार – सन २००० * अनंत भावे – सन २००२ * थोर शिक्षणतज्ञ श्रीमती लिलाताई पाटील – सन २००३ * नाट्य संमेलनाध्यक्ष श्री. सुरेश खरे

  • सन २००६ * नाट्य संमेलनाध्यक्ष श्री. दत्ता भगत – सन २००७. नसिरुद्दीन शाह – सन २००७ * अरुण काकडे – सन २००८. नाट्य संमेलनाध्यक्ष लालन सारंग – सन २००८ * रत्नाकर मतकरी – सन २००९ * मुक्ता बर्वे, चिन्मय केळकर, मनस्वीनी लता रवींद्र – सन २०१०. प्रेमानंद गज्वी – सन २०११ एकांकिकाकार म्हणून आणि २०१९ नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणून * संजय पवार – सन २०१२ ५ योगेश सोमण – सन २०१३
  • अमोल पालेकर – सन २०१७ * संस्थेने दि. २० जानेवारी २०१९ रोजी मिळून साऱ्यांजणी, पुणे यांचे सहयोगाने महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी सावित्री ज्योतिबा समता महोत्सवात महाविद्यालयीन नाट्यांश स्पर्धा आयोजित केली. ५ २ जून २०१९ रोजी प्रसाद घाणेकर सादर करीत असलेला “डॉ. रा. चिं. ढेरे स्मृति जागर” अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग आयोजित केला. १ डिसेंबर, २०१९ रोजी सायं. ५ वा. संस्थेने सुप्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या सीतेची गोष्ट या कथेचा डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला.

शिवाय संस्थेला वेगवेगळ्या कारणानिमत्त भेट दिलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्यांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे हे नमूद करण्यात संस्थेला अभिमान वाटतो. कुसुमताई अभ्यंकर, प्र. श्री. नेरूरकर, वासुदेव पाळंदे, कै. आत्माराम सावंत, कै. रमेश चौधरी, दामू केंकरे, सौ. ललिता केंकरे, ह. मो. मराठे, कै. जयवंत दळवी, माधवराव गडकरी, नारायण आठवले, आत्माराम भेंडे, सुरेश प्रभू, अरुण आठव्ये, प्रा. वि. शं. चौघुले, प्रा. ज्ञानेश्वर नाडकर्णी, मा. कृ. पारधी, समर नखाते, शकाअत खान, अजित भगत, मृणालिनी जोगळेकर, डॉ. तारा भवाळकर, अनंत भावे, प्रकाश बुद्धिसागर, महेश केळुसकर, प्रा. विजय तापस, डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर, डॉ. श्रीराम लागू, अमोल पालेकर, मंगेश पाडगांवकर, न. नि. पटेल, भक्‍ती बर्वे, मच्छिंद्र कांबळी, रोहिणी हट्टंगडी, जयदेव हट्टंगडी, शांता गोखले, अशोक साठे, प्रदीप मुळे, प्रसाद वनारसे, रवींद्र पाथरे, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, मुकुंद नाईक, माधव वझे, चेतन दातार, डॉ. शुभदा शेळके, राजीव जोशी, शामला वनारसे, प्रेमानंद गज्वी, योगेश सोमण, डॉ. शरद भुताडिया, जयंत पवार, संदेश कुलकर्णी, श्रीमती मनीषा दीक्षित, अतुल पेठे, मकरंद साठे, अतुल कुलकर्णी, मंगेश कदम, डॉ. राजीव नाईक, डॉ. अर्जुन देव चारण.

(संस्थेची अधिक माहिती acharekarpratishthan.org या संकेतस्थळावर)

या वर्षी संस्थेने प्रथमच संगीत नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाच्या निर्मात्या सौ. स्वाती राजेंद्र कदम आहेत.
तुका म्हणे आता’ हे १९६४ साली पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले पहिले नाटक. त्यावेळी हे नाटक ४ प्रयोगात बंद पडले. त्यानंतर हे नाटक सादर करण्याचे धाडस कोणी केलेल नाही. त्यासाठी मालवण येथील सौ. स्वाती राजेंद्र कदम पुढे आल्या. त्यांनी प्रथमच वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या साथीने हे नाटक रंमंचावर आणले आहे.

खोगीरभरतीच्या प्रस्तावनेत पुलंनी लिहिले आहे, “माझे हे दुसरे पुस्तक. पहिले ‘तुका म्हणे आता’. पु. ल. देशपांडे यांनी `तुका म्हणे आता` या नाटकात तुकारामांचे अभंग इंद्रायणीने तारले या परंपरागत श्रद्धेचा एक तर्कसंगत अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकपरंपरेचे आणि तुकारामांच्या कवितेचे अद्भुत सामर्थ्य दर्शविणारे हे नाटक आहे. पु.ल. देशपांडे यांची प्रकाशित ही पहिली साहित्यकृती. तर्कसंगत मांडणी करणारे, पुलंचे भाषेवरील प्रभुत्व आणि तुकारामांच्या साहित्याचा व्यासंग दाखवणारे हे नाटक सर्वोत्तम उदाहरण आहे. ४५ वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक आजही समाजाच्या डोळ्यांत अंजन घालते. पुलंच्या शब्दांची ताकद आणि तुकारामांचे विचार समजून घेण्यासाठी तसेच पारंपरिक संगीत नाटकाचे आयाम तोडणारे हे नाटक सहकुटुंब पाहायलाच हवे, असे आहे.

श्रेयनामावली :
लेखक : पु. ल. देशपांडे
काही गीतांचे लेखन : मंगेश आनंद कदम
दिग्दर्शक : रघुनाथ भास्कर कदम
प्रकाश : संजय विनायक तोडणकर, धनराज नामदेव दळवी
नेपथ्य : अंकुश गिरीधर कांबळी
रंगभूषा : तारक शशिकांत कांबळी
ऑर्गन/हार्मोनियम : मंगेश आनंद कदम
तबला/पखवाज : वैभव दिलीप मांजरेकर
टाळ/चिपळी/चंडा/डफ : अक्षय सखाराम सातार्डेकर
वेशभूषा साह्य : राजेंद्र हरी कदम
नेपथ्य साह्य : रामचंद्र राजाराम आर्डेकर,
नामदेव पुंडलिक केरकर
रंगमंच व्यवस्था : लीना गुरुनाथ काळसेकर, सीमा प्रसाद कोरगावकर
व्यवस्थापक : राजेंद्र हरी कदम

भूमिका आणि कलावंत :
तुकाराम : जगन्नाथ शामसुंदर आंगणे
संतू : सुदिन गंगाराम तांबे
ग्यानबा : विजय श्रीपाद कदम
आवली : दीक्षा रामचंद्र पुरळकर
मंबाजी : श्यामसुंदर मधुकर नाडकर्णी
पिऱ्या : प्रमोद प्रकाश तांबे
शिवाजी/रामेश्वर : शरद प्रभाकर सावंत
जानकी : प्रियांका सुरेंद्र मुसळे
चोपदार : पंकज सुभाष कदम

नाटकातील काही प्रसंगांची क्षणचित्रे :

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply