इतिहास अभ्यासक हटकर यांना प्रोत्साहन देणारा सन्मान

कोकण पर्यटनाबाबत विचार मंथन, मार्गदर्शन करण्याच्या हेतूने येत्या २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी रत्नागिरीत निसर्गयात्रीच्या पुढाकाराने पहिला कातळशिल्प महोत्सव भारणार आहे. कोकणातील कातळशिल्पांच्या बाबतीत काम करणारे इतिहास अभ्यासक आणि त्या त्या गावच्या ग्रामस्थ प्रतिनिधींना बोलावून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये लांज्यातील नवोदित इतिहास अभ्यासक विजय हटकर यांचाही सन्मान होणार आहे. याचा त्यांच्या मित्रमंडळींना अत्यानंद झाला आहे.

…………………………..

विजय हटकर हे लांज्यातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहायक शिक्षक आहेत. उत्तम वक्तृत्व आणि विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या वृत्तीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहेत. त्याचबरोबर समाजातही त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. चौफेर वाचनामुळे त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे, अफाट शब्दसंग्रह आहे आणि त्याच्या जोडीला अभिव्यक्तीकरिता आवश्यक असलेला आत्मविश्वास असल्यामुळे कोणत्याही विषयावर कोणत्याही क्षणी बोलण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे लांजा परिसरात निवेदनाच्या प्रांतात त्यांनी चांगले नाव कमविले आहे.

श्री. हटकर सतत नावीन्याच्या शोधात असतात. त्यात इतिहास हा आवडीचा विषय असल्याने रत्नागिरी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व जगासमोर आणण्यासाठी गड, दुर्ग, गढी, खिंडी, वाडे, मंदिरे यांचा शोध घेणे, त्यांची माहिती गोळा करणे यासाठी त्यांना फिरण्यात समाधान मिळते.

ऑक्टोबर महिन्यात लांजा तालुक्यातील कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी त्याच्या गावातल्या माचपठार या टेकडीवर काही आकृत्या दिसताहेत, असे श्री. हटकर यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब कॅमेरा घेतला आणि गाव गाठले. त्या पठारावरील त्या आकृत्या म्हणजे कातळशिल्पे असल्याचे त्यांनी सांगितले. तो गावचा मोठा ऐतिहासिक वारसा असून तो जगाच्या नकाशावर नेण्याची गरज बोलून दाखवली. कातळशिल्पांचा शोध लागल्याची बातमी आणि छायाचित्रे प्रसारमाध्यमांमार्फत जगासमोर आणण्याचे कामही त्यांनी केले.

या कातळशिल्पांच्या संरक्षणाचे तसेच त्यांच्या स्वच्छतेचे काम ग्रामस्थांकडून घेतले पाहिजे. तसेच त्यावर अधिकारवाणीने लिहिणारे हवेत, यासाठी त्यांनी रत्नागिरीतल्या निसर्गयात्री या संस्थेशी संपर्क साधला. ही संस्था गेली काही वर्षे कातळशिल्पांचा अभ्यास करते आहे. संस्थेने वेळीच दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथील साफसफाई करून ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले.

कोट हे झाशीची राणी लक्ष्मीबाईचे गाव असल्याने या गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. त्यात या कातळशिल्पांची भर पडली आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या पर्यटकाला बरेच काही पाहता येणार आहे. अर्थात योग्य नियोजन झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, याचा आनंद विजय हटकरांना अधिक असणार आहे.

श्री. हटकर यांच्या कामाची व त्यांच्या धडपडीची योग्यवेळी दखल घे़ऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, ही फार मोलाची गोष्ट आहे. कारण कुणी पुरस्कार मिळावा म्हणून काम करीत नसते, तर काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. पुरस्कार म्हणजे काय मोठे असते? पुरस्कार किंवा सन्मान हे एक प्रोत्साहन असते. तहानभूक हरवून काळवेळेचे गणित उधळून जी माणसे पिसाटल्यागत काम करतात, त्याची किंमत चुकती करता येत नाही आणि त्याची त्यांना अपेक्षाही नसते. आपण समाजासाठी काहीतरी सत्कर्म केले, याचाच आनंद त्यांना मोठा असतो. पण त्याचवेळी कुणी पाठीवर कौतुकाची थाप मारली, तर ती व्यक्ती अधिक उत्साहाने त्या कामाला वाहून घेते आणि त्यातून समाजाला आणखी काही नवीन मिळते. म्हणूनच सन्मानामुळे विजय हटकर यांचा संशोधनाचा घोडा अधिक गतीने पळेल याचा खात्री वाटते. आमच्या परिवारातील एक व्यक्ती इतिहास अभ्यासक म्हणून नावारूपास येईल, ही आशा अधिक बळावते आहे.

विजय हटकर यांना यानिमित्ताने मनापासून शुभेच्छा!

  • सुभाष लाड, मुंबई

(98691 05734)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply