ग्रेस इज ग्रेट

मराठीतील नवकवितेच्या प्रवाहातील बा. सी. मर्ढेकरांनंतरचे चिंतनशील कवी म्हणून माणिक सीताराम गोडघाटे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी ग्रेस या टोपण नावाने कवितालेखन केले. आयुष्यभर गूढ कवी आणि दुःखाचा महाकवी ही ओळख त्यांनी जपली. त्यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले. त्यानिमित्त त्यांना ही शब्दसुमनांजली.

………………………….

‘पाऊस कधीचा पडतो’ हे हृदयनाथ मंगेशकर यांच्या आर्त आवाजातील गीत कानावर पडताच डोळ्यांसमोर येतात ते अतिशय गूढ व्यक्तिमत्त्वाचे कवी ग्रेस. खरेच एक ग्रेट असा कवी होता तो. सर्वांपासून अलिप्त आणि लोक म्हणतात तसा अगदी गूढ अवलिया. एक इंग्रजीचा प्राध्यापक. ख्रिस्त प्रेषिताचा अनुयायी असलेला. त्याच्या कवितांमधूनही दुःखाचेच गीत पाझरत असावे. नदीचा प्रवाह जसा आपल्याच तालात आणि नादात वाहत असतो. आपल्या भोवतीच्या परिसराचे सुख-दुःख नदी अलिप्तपणे पाहते. कवी गजानन दिगंबर माडगूळकरांनी एका गीतात म्हटल्याप्रमाणे संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही या उक्तीप्रमाणे स्वतःच्या जीवनातील सुखादुःखाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

ते दुःखाचे महाकवी होते. त्यांनी स्वतःच एका कवितेत ते उद्धृत केले आहे.

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल…

ते दुःखाशी समरस झालेले कवी होते. त्यांनी वरील कवितेत तेच सांगितले आहे. त्यांच्या हाती असलेल्या दगडाचेदेखील फूल होते असे ते म्हणतात. कवितेत इतकी ताकद असते, हे त्यांना सुचवायचे असावे.

त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील लष्करात काम करीत होते. त्यांच्या बालपणीच त्यांची आई लहानपणीच निवर्तल्याने त्यांच्या मनावर खोल आघात झाला. त्यावेळी पाऊस रिमझिमत होता. त्यातून ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता, या कवितेच्या ओळी त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या. ती आर्त आणि दर्दभरी कविता हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केली. हृदयनाथांनी त्यांच्या कवितेतील सुबोधता सामान्य वाचकांच्या नजरेस आणून दिली. गाण्याच्या रूपाने ती सतत ऐकायला मिळाल्याने त्यांच्या कवितेतील दुर्बोधता जाणवेनाशी झाली.

कदाचित अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे या कवितेमुळे ग्रेस अनेकदा दुर्बोध वाटत असावेत.

अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे
तू पाठीवर रंग आज विणले की द्राक्षवेलीतले
यात्रेच्या अपुर्‍या अभंग समयी पाठीत कैशा विजा?
अश्रूही सरल्यावरी उमलसी तू एकटी स्वप्नजा …

या कवितेतील अर्थ अनेक समीक्षणांनी विविध प्रकारे उलगडण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्या या शब्दकळेमुळेच त्यांना अनेकांनी गूढकवी ठरवले. त्यांच्या कवितेतील प्रतिमा आणि प्रतीके सगळ्याहून निराळ्या असत. वरील कवितेतच द्राक्षवेलीतील रंग, यात्रेच्या अपुऱ्या अभंग समयी आदी प्रतिमा अगदीच भिन्न आहेत.

इनग्रीड बर्मन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या प्रभावाने त्यांनी ग्रेस हे टोपणनाव कवितेसाठी धारण केले. द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या चित्रपटातील इनग्रीडविषयीचे वाक्य ‘सी इज इन ग्रेस’ या वाक्याने ते झपाटून गेले आणि त्यांच्या प्रतिभेला पंख फुटले म्हणून त्यांनी आपले कवितालेखनासाठीचे नाव ग्रेस असे ठेवून त्याच नावाने त्यांनी आपल्या कविता प्रसिद्ध केल्या. सत्यकथा आणि छंद या नियतकालिकांतून १९५५ पासून लेखनाला सुरुवात केली.

माणिक गोडघाटे हे अतिशय विद्वान व चिकित्सक, अभ्यासू वृत्तीचे विद्यार्थी होते. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून ते ना. के. बेहेरे सुवर्णपदक घेऊन मराठी विषय घेऊन एम. ए. पदवी उत्तीर्ण झाले. ते बी. एस्सी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वाङ्मयप्रेमापोटीच आपल्या अध्ययनाचा मार्ग बदलला. त्यांनी मराठी विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली.

१९६६ ते ६८ या काळात नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर १९६८ पासून ते नागपूरच्या वसंतराव नाईक समाजविज्ञान महाविद्यालय मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी आणि नंतरही त्यांचे लेखन जोमानेच सुरू असायचे.

त्यांनी १९५५ मध्ये लेखनास सुरुवात केली, तरी संध्याकाळच्या कविता हा पहिला कवितासंग्रह (१९६७) पॉप्युलर प्रकाशनने नवे कवी नव्या कविता या मालिकेत प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

चर्चबेल (१९७४) हा पहिला ललितबंध संग्रह प्रसिद्ध झाला. नंतरच्या काळात मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, मृगजळाची बांधकामे, वाऱ्याने हलते रान, ओल्या वेळूची बासरी हे ललित लेखसंग्रह विविध प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले.

त्यांना विविध संस्थांचे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळाल्याने जी. एं. प्रमाणेच ते गूढ लेखक असल्याचे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार त्यांच्या चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्य), संध्याकाळच्या कविता, चर्चबेल या पुस्तकांना मिळाले आहेत.

डॉ. जया मेहता यांनी चर्चबेल चे गुजराती भाषेत भाषांतर केले, तर डॉ. उमाशंकर जोशी यांनी त्यांच्या निवडक कवितांचा गुजराती भाषेत अनुवाद केला आहे.

अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. त्यात विदर्भ भूषण, नागभूषण फाउंडेशनचा नागभूषण पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती सोलापूर येथील भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार आदींचा समावेश आहे.

त्यांच्या वाऱ्याने हलते रान या ललित लेखसंग्रहाला २०११ साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पुण्याच्या दीननाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णशय्येवर असतानाच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २६ मार्च २०१२ रोजी कर्करोगाचा सामना करत असताना या महाकवीचे निधन झाले.

  • प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, गोवा (संपर्क : ९०११०८२२९९)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply