‘मसाप’च्या देवरूख, लांजा, राजापूर शाखांना मान्यता

चिपळूण : आद्य मराठी साहित्य संस्था (१९०६) असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपल्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख, लांजा आणि राजापूर शाखांना मान्यता दिली आहे. यामुळे आगामी काळात मसाप कार्यकारिणीत कोकणातून दोन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

‘मसाप’च्या उपाध्यक्षपदी कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड झाल्यानंतर कोकणात परिषदेच्या कामाने अधिक वेग घेतला आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी कोकणात ‘मसाप’चे काम वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पुढील काळात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मसाप’चा विस्तार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मसापचे संपूर्ण कोकणात आठशे सभासद झालेले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी येथे शाखा सुरू झाल्या आहेत. नामवंत कवी अरुण इंगवले, कथाकार प्रा. संतोष गोणबरे, शाहीर राष्ट्रपाल सावंत, गुहागरचे राजेंद्र आरेकर, दापोलीचे गझलकार प्रा. कैलास गांधी, रत्नागिरीतील नाटककार अनिल दांडेकर, अॅड. विलास कुवळेकर आदी ‘मसाप’च्या कार्यविस्तारासाठी कार्यरत आहेत. मसापतर्फे शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मसाप’ने कोकणात नव्याने तीन शाखांना मान्यता दिल्याने साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply