रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाचा ८९ वा वर्धापनदिन विविध पुरस्कारांच्या वितरणाने रविवारी (दि. २७ मार्च) उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या उपाध्यक्ष स्मिताताई परांजपे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यदिग्दर्शक वामन ऊर्फ राजाभाऊ जोग उपस्थित होते.

येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. विविध पुरस्कारांचे वितरण उपाध्यक्ष स्मिताताई परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे, सदस्य डॉ. संतोष बेडेकर, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, शरद लेले, अनिरुद्ध लिमये, गोविंद भिडे, केतकी जोगळेकर, अॅड. अविनाश काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य कार्यक्रमात (कै.) सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार नलिनी गाडगीळ, सुनीता गोगटे. डॉ. माधुरी जोशी यांना सुपूर्द केला. आदर्श विद्यार्थी पुरस्कार ल. वि. केळकर वसतिगृहातील तन्मय कवठेकर, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मंडळाच्या आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतिगृहातील स्वरदा पाध्ये, युवा गौरव पुरस्कार कश्ती शेख हिला प्रदान करण्यात आला. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ डॉक्टर अलिमियॉं परकार यांना जाहीर झाला. परंतु ते परदेशी असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य बसणकर यांनी तो स्वीकारला.

संस्कृतप्रेमी पुरस्कार डॉ. दिनकर मराठे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार अनिरुद्ध गोगटे आणि जितेंद्र विचारे यांना आणि बाजीराव- मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील श्रेयस शिंगटे याला देण्यात आला. रत्नदुर्ग माउंटेनिअर्स तसेच गौरांग आगाशे डॉ. केदार भिडे, सीए कपिल लिमये, वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या आजीव सभासदांना यांचाही यथोचित सन्मान केला.

पुरस्कारार्थी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply