शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांची गिनेस बुकातील नोंदीची वाटचाल सुरू

रत्नागिरी : दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे बनवल्याबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेले विक्रमवीर प्रसन्न कांबळी यांनी तयार केलेल्या कोड्यांनी दहा हजार ही संख्या गाठली आहे. आता त्यांची गिनेस बुकातील नोंदीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

श्री. कांबळी गेली सत्तावीस वर्षे शब्दकोडी तयार करत असून रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ सर्व दैनिके आणि साप्ताहिकांमधून त्यांची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. शासकीय अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून ही शब्दकोडी तयार करणारे कांबळी यांनी विशिष्ट विषयावर कोडे तयार करणे (जसे- गणपती), पाच मिनिटांत कोडे बनविणे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे अशी अनेक कोडी रचून प्रावीण्य मिळविले आहे. आतापर्यंत दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. या वाटचालीबद्दल श्री. कांबळी यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दहा हजार चौकोनांचे एक भव्य शब्दकोडे तयार केल्यामुळे लिम्का बुक आणि इंडिया बुकमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. भविष्यात प्रथम ‘एशिया बुक’ आणि नंतर ‘गिनेस बुक’ सर करण्याचा मानस श्री. कांबळी यांनी बोलून दाखवला. आता २५० चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे त्यांनी तयार केले आहे. इतक्या शब्दांचे कोडे अद्याप दुसऱ्या कोणी बनविले नसल्याचा त्यांचा दावा असून आपल्या या नव्या विक्रमाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्याकरिता ते प्रयत्नशील आहेत.

आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) हे प्रसन्न रंगनाथ कांबळी यांच्या घराण्याचे मूळ गाव आहे. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र कृषी उद्योग या शासनाच्या अंगीकृत उद्योगात वरिष्ठ अधिकारी म्हणून ते अनेक वर्षे रत्नागिरीत कार्यरत होते. शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे आयोजित करणे इत्यादी उपक्रमांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली.

प्रसन्न कांबळी यांनी १९९५ पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरुवात केली. ‘दै.रत्नागिरी एक्स्प्रेस’च्या प्रकाशक सौ.नमिता कीर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक बाळ भिसे यांच्या सहकार्याने या उपक्रमाला नियमितपणा आला. त्यानंतर ‘दै.रत्नागिरी टाइम्स’, ‘दै.भैरव टाइम्स’, ‘दै.तरुण भारत’, ‘दै.कोकण गर्जना’, ‘दै.रत्नागिरी समाचार’, ‘दै.प्रहार’, ‘दै.पुष्पराज’, ‘साप्ताहिक बलवंत’, ‘पाक्षिक रंगयात्री’, सांगली येथून प्रसिद्ध होणारे ‘नियती वेध’, गणपती विशेषांक, दिवाळी विशेषांक, इत्यादींमध्ये त्यांची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत.

उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले श्री. कांबळी यांनी श्री गणेशाचा बेचाळीस लाख जप केला आहे. गेल्या सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून ‘चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, आपले दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि आपली अर्धांगिनी सौ.मयूरी यांच्या सहकार्याने हे यश मी खेचून आणले, असे त्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply