कातळखोद चित्रांचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : देशाचा पुरातन वारसा असलेल्या कोकणात आढळणाऱ्या कातळखोद चित्रांच्या संशोधनाचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) सुरू झाले.

गेल्या काही वर्षांत कोकणातील सड्यांवर सापडलेल्या रहस्यमय कातळखोद चित्रांमुळे अश्मयुगीन काळातील मानवाच्या राहणीमानाबद्दल नवनवी माहिती हाती येत आहे. या कातळचित्रांवर संशोधन करण्याचे काम रत्नागिरीतील संशोधन केंद्र करणार आहे.

रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या प्रयत्नांमधून राजापूर आणि रत्नागिरीसह अनेक तालुक्यांत कातळशिल्पांचा शोध लागला. या कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी २०२२ साली केंद्र सरकारने युनेस्कोकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर नऊ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या प्राथमिक यादीत करण्यात आला आहे. या विषयाचे महत्त्व ओळखून त्यावर संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या अर्थसाह्याने रत्नागिरीत कातळखोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्र सुरू झाले आहे. ‘निसर्गयात्री’सह आयआयटी-मद्रासचे प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन, आयआयटी हैदराबाद, दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आदी संस्थांचा त्यात सहभाग आहे. रत्नागिरीत राधाकृष्ण टॉकीजसमोर हे केंद्र आहे.

त्या केंद्रात आतापर्यंत सापडलेल्या कातळखोद चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पर्यटकांना एकाच ठिकाणी कातळशिल्पांबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. कला, कातळसडे, तेथली जैवविविधता यांसह विविध पैलू यात अभ्यासता येणार आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्यात येणार असला, तरी गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये आता सापडू लागलेल्या कातळशिल्पांवर संशोधनासाठीही या केंद्राचा उपयोग होणार आहे.

कोकणात आढळणाऱ्या कातळखोद चित्रांचा कालावधी अद्याप नक्की होऊ शकलेला नाही, पण ही चित्रे सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीची असावीत असा अंदाज आहे. त्याबाबत रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी पुढाकार घेऊन अकरा वर्षांपूर्वी अशा चित्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आतापर्यंत २१२ चित्रे आढळले आहेत.

यावेळी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे पुरातत्त्व विभाग व प्राचीन इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. व्ही. एच. सोनावणे यांनी यावेळी सांगितले की, कोकणात आढळलेली कातळशिल्पे ही भूमी खोदचित्रे आहेत. खोदचित्र आणि वारसा संशोधन केंद्रही सुरू होत आहे, ही सर्वांत मोठी घटना म्हणावी लागेल. पुरातत्त्वीयदृष्ट्या ही खोदचित्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. गेल्या काही महिन्यांत जेव्हा कोकणात रिफायनरी होण्याचा विषय आला, त्यावेळी या परिसरातील खोदचित्रांची माहिती अनेक ग्रामस्थांना मिळाली. हा विषय ग्रामस्थांनी उचलून धरला आणि तो वारसा जपण्याची भूमिका मांडण्यात आली. यामुळे खोदचित्रांचा विषय अग्रस्थानी आला आहे.

पत्रकारांशी बोलताना डॉ. सोनावणे म्हणाले की, रिफायनरीविषयी मला जास्त माहिती नाही. परंतु बारसूमध्ये रिफायनरीचा विषय आला. त्यावेळी कातळशिल्पांचा विषय चाळवला गेला. त्यावेळी कातळशिल्पांबाबत लोकांना आवड वाटू लागली. कातळशिल्पांना संरक्षण दिले पाहिजे, हा विषय पुढे आला. यानिमित्ताने कातळशिल्पांचे जतन होण्यासाठी सकारात्मक पावले पडत आहेत.

आयआयटी मद्रासचे प्रा. डॉ. अरुण मेनन म्हणाले की, संशोधन केंद्र सुरू होणे ही महत्त्वाची गोष्ट होती. जनतेला या केंद्रात कातळशिल्प संशोधनाची माहिती मिळेल. सर्वांच्या प्रयत्नांतून काम होणार असून कोकणचा इतिहास समोर येईल. कातळशिल्प हे समाजाचे प्रतिबिंब आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. श्री प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प असून काही ठरावीक प्रकल्पांनाच संशोधन केंद्र मंजूर होते. विज्ञान, संस्कृती, इतिहास या अनुषंगाने संशोधन केले जाणार आहे. शाश्वत पर्यटनासाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे.

आयआयटीएम-प्रवर्तकचे सीईओ शंकर रमण यांनीही संशोधन प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांनी संशोधन केंद्राचा प्रवास सांगितला. त्यांनी सांगितले की, खोदचित्रांच्या समग्र संशोधनासाठी श्री योजनेला दोन वर्षांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. साधारणपणे फक्त संशोधनासाठी निधी उपलब्ध होत नाही. परंतु प्रथमच असा निधी मिळत असल्याने खोदचित्रांच्या संशोधनाला गती मिळत आहे. दर तीन आणि सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. आयआयटीएम, निसर्गयात्री संस्था यांच्या विद्यमाने हा प्रकल्प होत आहे. जागतिक वारसास्थळे होण्यासाठी ९ ठिकाणच्या कातळशिल्पांचा अहवाल बनवण्यात आहे.

केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयआयटी-मद्रास प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे श्री. रमण, पुरातत्त्व विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. सोनवणे उपस्थित होते. दोन वर्षे चालणार असलेल्या या संशोधन प्रकल्पाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेच्या नऊ सदस्यांनी गेल्या चार महिन्यांत राजापूर तालुक्यातील गोवळ आणि देवाचे गोठणे या दोन गावांमध्ये प्रत्यक्ष केलेल्या पाहणीचा अहवाल यावेळी चित्रफितीद्वारे प्रदर्शित केला. त्या दोन गावांमधील लोकसंस्कृती, आढळलेली कातळखोदचित्रे, अन्य पुरातन वस्तू, परिसरातील अन्य वैशिष्ट्ये यांचा अभ्यास त्यांनी केला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply