पाचाचे पन्नास करताना …

रत्नागिरीत अलीकडेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला. औपचारिक उद्घाटन झाले नसले तरी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ रत्नागिरीत पार पडला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू झाले. त्याबद्दल ते अभिनंदनच पात्र आहेत. महाविद्यालयाकरिता मंजुरी आणि ५२२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून वर्षभरातच महाविद्यालय प्रत्यक्षात आले आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे आणि वर्षानुवर्षांच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

रत्नागिरीत नुकत्याच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता शंभर विद्यार्थ्यांची असून आता प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी चार रत्नागिरी जिल्ह्यातले आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अशा कोकणातल्या पाच टक्के विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या समारंभात व्यक्त केली, ती योग्यच आहे. पण त्यासाठी अनेक मुद्दे विचारात घेतले जायला हवेत. महाविद्यालय रत्नागिरीत झाले असले तरी रत्नागिरीतील किंवा कोकणातील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात तेथे प्रवेश मिळण्याची शक्यता नाही. कारण वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश दिले जातात. त्यामुळे प्रवेशासाठी या महाविद्यालयाचा प्रेफरन्स ज्यांनी दिला असेल, त्यांनाच तेथे प्रवेश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असते, असेच विद्यार्थी रत्नागिरीचा प्रेफरन्स देण्याची शक्यता असते. कोकणातील विद्यार्थ्यांचा आणि एकूण कोकणी समाजाचा ओढा मुंबई-पुण्याकडे असतो. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांनाही मुंबई-पुण्यातील महाविद्यालयांमध्येच उच्च शिक्षणासाठी जायचे असते. त्यामुळे त्यांना रत्नागिरीत कसे थोपवायचे, त्यांनी रत्नागिरीचा प्रेफरन्स देण्यासाठी काय करायचे, हा एक मुद्दा आहेच, पण हा प्रेफरन्स देणे महाविद्यालयातील सोयीसुविधा, तेथे मिळणारे शिक्षण, शैक्षणिक दर्जा यावरही अवलंबून असते. रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य स्थिती किती बिकट आहे, याबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. मोठे अपघात होतात. अनेकांचा बळी जातो. त्यांची कारणे शोधण्यासाठी करण्यासाठी चौकशी समित्या नेमल्या जातात. उपाययोजनांची आश्वासने दिली जातात. ती प्रत्यक्षात कितपत येतात, हे जिल्हा रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची हेळसांड पाहिल्यानंतर लक्षात येते.

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालये या महाविद्यालयाशी संलग्न होणार आहेत. त्यामुळे अधिक उपचारांसाठी अत्यवस्थ रुग्णाला कोल्हापूरला किंवा मुंबईला हलविण्यात आले आहे, अशा बातम्या यापुढे प्रसिद्ध करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. आता प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांची तुकडी चार वर्षांनी जेव्हा बाहेर पडेल, तोपर्यंतच्या काळात तरी अत्यावश्यक सुविधा आणि यंत्रणा महाविद्यालयाकरिता म्हणून जिल्हा रुग्णालयात आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हायला हव्या आहेत. तीन वर्षांनी या महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू होणार आहे. तो लक्षात घेतला, तर त्या प्रमाणातील सुविधाही आवश्यक आहेत. त्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले गेले पाहिजे. अन्यथा महाविद्यालय रत्नागिरीत, पण त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी मुंबई-पुण्यातील महाविद्यालयात, अशी स्थितीही निर्माण होऊ शकते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये भर पडेल, अशी अपेक्षा आणि खात्री व्यक्त करण्यात आली आहे. ती वृथा ठरू नये. सध्या कोकणातील पाच टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ती संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत वाढूही शकते. पण येथून बाहेर पडणारे विद्यार्थी कोकणातच राहतील, याचीही काही खात्री देता येत नाही. या सर्वच बाबींचा विचार व्हायला हवा. अन्यथा रत्नागिरीत एक शासकीय महाविद्यालय सुरू झाले, यापलीकडे फारसे समाधान लाभणार नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १३ ऑक्टोबर २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply