रत्नागिरी : कोकणाचे वैशिष्ट्य आणि आगळावेगळा वारसा ठरलेल्या कातळशिल्पांचा महोत्सव भरविण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या गेल्या काही वर्षांपासून कातळशिल्पांचा शोध आणि जतन करण्याच्या चळवळीला महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा पाठिंबा मिळाल्यामुळे महोत्सवालाााा चालना मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पर्यटन सेवा संस्थेने नुकतीच शाश्वत पर्यटन परिषद आयोजित केली होती. संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या जाणाऱ्या अशा तऱ्हेच्या परिषदेचे हे तिसरे वर्ष होते. वारसा पर्यटन (हेरिटेज टुरिझम) हा यावर्षीच्या परिषदेचा विषय होता. परिषदेला पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय संचालक हनुमंत हेडे उपस्थित होते. विशेष म्हणजे केवळ उपस्थिती न दर्शविता ते दिवसभर या परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी परिषदेदरम्यान कोकणातील वारसस्थळांबरोबरच कातळशिल्पांविषयीची सविस्तर माहिती घेतली. तसेच तेवढ्यावरच न थांबता त्यांनी निसर्गयात्री संस्थेच्या सदस्यांबरोबर चवे देउड, उक्षी येथील अष्मयुगीन कातळखोद चित्रांच्या परिसराला आवर्जून भेट देऊन पाहणी केली. माहितीही घेतली. त्यानंतर कातळशिल्प महोत्सव राबविण्याची संकल्पना मांडून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. कातळशिल्पांचा परिसर पर्यटनाच्या अंगाने विकसित करण्याबाबत पुढाकार घेऊ आवश्यक कामाबाबत जागेवरच चर्चा केली. शाश्वत पर्यटन विकासासाठी धडपडणारे सुहास ठाकुरदेसाई, सुधीर (भाई) रिसबूड, मकरंद केसरकर, श्रीवल्लभ साठे, ऋत्विज आपटे यांच्याबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळेच पहिल्या कातळशिल्प महोत्सवाची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
श्री. हेडे यांनी उदय बने यांच्या निरूळ येथील प्रकल्पाला भेट दिली. ‘विशेष पर्यटन तालुका’ या योजनेबाबत माहिती दिली. त्यावर आवश्यक माहिती एकत्र करण्याबाबत मार्गदर्शन केले. पर्यटनपूरक विविध प्रकल्प पुढे आणण्याकरिता सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही मार्गदर्शक सूचनादेखील मांडल्या. कोकणाच्या पर्यटन विकासाकरिता सदैव सोबत असल्याची खात्री दिली. महिन्यातून किमान एकदा आढावा बैठक घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
श्री. हेडे यांनी दाखविलेल्या विश्वासाबाबत रत्नागिरीच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आणि श्री. हेडे यांचे आभार मानले.

