रत्नागिरीत रविवारी मंडप व्यावसायिकांची दिशा ठरविणारा मेळावा

रत्नागिरी : करोनामुळे मंडप आणि आनुषंगिक व्यवसायांची झालेली दशा आणि त्यावर चर्चा करून नवी दिशा शोधण्यासाठी रत्नागिरीत रविवारी ( ३१ जानेवारी) रत्नागिरीत मेळावा होणार आहे.

अंबर मंगल कार्यालयात दिवसभर हा मेळावा भरणार आहे. मेळाव्यात मंडप, लाइट, साउंड, इव्हेंट्स आणि केटरर्सच्या व्यवसायाची दशा आणि दिशा यावर चर्चासत्र होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील २२५ जण संघटनेचे सभासद झाले असून ते सर्वजण या वेळी उपस्थित राहणार आहेत.

करोनाच्या कालावधीत सर्वांच्याच व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात व्यवसायाचे बदलते स्वरूप, त्यातील आव्हाने यासंदर्भात एकत्र येण्याची सर्वांनाच गरज भासली. त्यातून संघटना तयार झाली आहे. ऑल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनशी रत्नागिरी जिल्हा मंडप, लाइट, साऊंड इव्हेंटस अँड केटरर्स असोसिएशन संलग्न झाली आहे. प्रत्येक तालुक्याची संघटना तयार करण्यात आली आहे. एकमेकांशी दरावरून स्पर्धा करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन चांगली सेवा ग्राहकांना देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे व त्याकरिता योग्य दरसुद्धा ठरवला पाहिजे, असे संघटनेने ठरवले आहे. मंडप आणि इतर आनुषंगिक सर्व सेवा देणाऱ्यांनी एकत्र येऊन प्रथमच संघटना स्थापन केल्यामुळे तालुक्यातून उदंड प्रतिसाद लाभत आहे. याचा फायदा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मिळत आहे. त्यातूनच आणखी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्याचा मेळावा होणार आहे.
मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष अमरेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजन कोकाटे, जिल्हा सचिव सुहास ठाकुरदेसाई मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी ९ वाजता नावनोंदणी आणि अल्पोपाहाराने सुरुवात होईल. सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार, ११ वाजता व्यवसायाची दशा व दिशा यावर चर्चासत्र, दुपारी १२ वाजता सभासद प्रमाणपत्र ओळखपत्र वितरण केले जाणार आहे. दुपारी भोजन आणि नंतर अध्यक्षीय भाषणाने मेळाव्याची सांगता होणार आहे. मेळाव्याला सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशन अध्यक्षांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply