झाशीच्या राणीच्या गावी कोरीव कातळशिल्पांचा समूह

लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.

कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी कोट गावात कोलधे-कोट गावच्या सीमेलगत असलेल्या माच पठारावर पांडवकालीन आकृत्या असल्याची बाब राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पर्यटन अभ्यासक विजय हटकर, महेंद्र साळवी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड, विजय हटकर यांनी त्या भागाला भेट दिली. यावेळी सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे, प्रणव वाघाटे उपस्थित होते. त्या आकृत्या पाहताच ती पांडवकालीन शिल्पे नसून नवाष्मयुगात या ठिकाणी नांदत असलेल्या आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणजेच कातळशिल्पांचा समृद्ध समूह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. श्री. लाड आणि श्री. हटकर यांनी ग्रामस्थांच्या ते लक्षात आणून दिले.

कोट गावाच्या पूर्वेकडे असलेल्या कातळसड्याला ग्रामस्थ माचपठार म्हणतात. कोलधे गावातून कोटकडे जाताना लागणाऱ्या सड्यावर पाष्टे कुटुंबीयांच्या एकत्रित जमिनी आहेत. तेथे पाष्टे कुटुंबीयांची शेतघरे आहेत. पावसाळ्यानंतर भातपिकाची कापणी झाल्यानंतर झोडणी, मळणीचे तेथे केले जाते. त्याच शेतघरांच्या परिसरात अनेक चित्रविचित्र आकृत्या दगडात कोरलेल्या आहेत. कातळशिल्पांचा हा अमूल्य खजिना म्हणजे ग्रामस्थांच्या दृष्टीने पांडवकालीन आकृत्या आहेत. काही कातळशिल्पांची झीज झाली आहे. काही शिल्पे मात्र सुस्थितीत आहेत. राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावात आर्यादुर्गा मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या कातळशिल्पाप्रमाणे कोट गावातील आकृत्यांची रचना आहे. आयताकृती भौमितिक रचना, वाघाचे चित्र, पंजा, विविध पक्षी, प्राणी, मासे यांच्या आकृत्या खोदण्यात आल्या आहेत. सुमारे १५ ते २० कातळशिल्पांचा समूह तेथे असण्याची शक्यता आहे.

पुरातत्त्वीय दृष्ट्या खूप महत्त्वाची आणि त्या भागातील आदिम मानवी समूह आणि त्यांची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कोटसह लांजा तालुक्यातील भडे, हर्चे, लावगण, जावडे इत्यादी अनेक गावांमध्ये कातळशिल्पे आहेत. त्यांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. तसे केल्यास कोकणाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पर्यटनदृष्ट्याही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल, असे मत यावेळी सुभाष लाड आणि विजय हटकर यांनी व्यक्त केले. कातळशिल्प समूहाची जपणूक स्थानिक ग्रामपंचायतीने लोकसहभागातून केली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

(कोकणातल्या कातळशिल्पांबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख वाचा खालील लिंकवर…)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply