रत्नागिरीत २६ मार्चपासून दोन दिवसांचा पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कातळ खोदचित्रांना राजाश्रय मिळू लागला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे यावेत आणि अपरिचित पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना देण्यासाठी पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव येत्या २६ आणि २७ मार्च रोजी आयोजित केला आहे. पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, निसर्गयात्री संस्थेचे संचालक सुधीर रिसबूड यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत यासंदर्भात विस्तृत माहिती दिली.

थिबा पॅलेस येथे होणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महोत्सवात कातळशिल्प सचित्र माहिती प्रदर्शन, कोकण भौगोलिक आणि जैवविविधता छायाचित्रे, पारंपरिक कला वस्तू प्रदर्शन, कातळशिल्पांची माहिती देणारी कार्यशाळा, सादरीकरण, शोधकर्त्यांबरोबर मुलाखत आणि गप्पागोष्टी, आडवळणावरचे कोकण- सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य जत्रा, सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

अश्मयुगीन कातळशिल्परूपी वारसा ठेवा ही रत्नागिरी जिल्ह्याची वेगळी ओळख होत आहे. या ठेव्याच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी पर्यटन संचालनालय आणि निसर्गयात्री संस्था, सुवर्णसूर्य फाउंडेशनने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कातळशिल्प पर्यटन महोत्सव घेण्यास पर्यटन विभागाने मंजुरी दिली आहे. थिबा पॅलेस येथे २६ मार्च रोजी सकाळी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दोन्ही दिवशी सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत महोत्सवात विविध कार्यक्रम होतील. यात पर्यटकांसह विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटन संस्था, रत्नागिरीकर आणि कातळशिल्पांच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दगडांमधील प्रकार, दगडांपासून आदिमानव हत्यारे कशी तयार करत होता याचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक प्रा. डॉ. तोसोपंत प्रधान दाखवणार आहेत. कातळखोद चित्रांच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन, वाळू आणि अन्य माध्यमांमधून खोदचित्रांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. देवरूखमधील डीकॅड कॉलेज ऑफ आर्टसचे विद्यार्थी कला वस्तू प्रदर्शन आणि त्यातील करिअर यावर मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री गंगाराम गंगावणे आणि सहकारी चित्रकथी कला प्रदर्शन मांडणार आहेत. बांबूपासून विविध कला वस्तू प्रदर्शन आणि ओरिगामी आर्ट प्रदर्शन नरेंद्र घाणेकर सादर करणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply