मधुमेह आणि डोळ्यांच्या आजाराविषयी उपयुक्त माहिती
रत्नागिरी : मधुमेह असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले डोळे रेटिना तज्ज्ञांकडून तपासून घेतले पाहिजेत. त्यासाठीच रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे २३ मार्चपासून मधुमेह सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी ही माहिती दिली.
डॉ. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेह हा आपला आयुष्यभर साथ देणारा जोडीदार आहे. आपली त्याच्याकडे बघण्याची भावना ही आपला एक जीवाभावाचा मित्र अशी असेल, तरच ही साथ सुखाची होऊ शकते. मधुमेहाचे सर्वांत जास्त प्रेम आपल्या शरीरातील हृदय, डोळे, किडनी आणि मेंदू. या चार अवयवांवर आहे.
मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
प्रकार १ ] विशेषतः हा लहान मुलांमध्ये असतो. यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही. त्यामध्ये सत्य असे आहे किी इन्सुलिनशिवाय जगता येत नाही.
प्रकार २] यामध्ये थोडेच इन्सुलिन तयार होते किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा शरीराला वापर करता येत नाही.
मधुमेहामध्ये समतोल आणि दिवसातून निश्चित वेळेला ठरावीक अंतराने योग्य आणि प्रमाणात आहार घेणे तसेच हलका आणि योग्य व्यायाम करणे आणि दैनंदिन जीवनशैली नियंत्रित ठेवणे हा मधुमेहाची साथ सुसह्य करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
मधुमेह असलेल्यांनी घरच्या घरी आठवड्यातून एकदा युरिन स्ट्रिपच्या मदतीने स्वतःच्या लघवीतील साखर सकाळी अनशापोटी आणि दुपारी जेवणानंतर बरोबर दोन तासांनी तपासावी आणि आपल्या वहीमध्ये त्याची नोंद तक्त्यामध्ये करावी. याशिवाय प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा रक्तातील साखर चांगल्या लॅबमधून सकाळी अनशापोटी तसेच दुपारी जेवणानंतर दोन तासांनी अशी तपासून घ्यावी. ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन ही तपासणीही करावी. याशिवाय प्रत्येक मधुमेही व्यक्तीने वर्षातून एक वेळेस लघवीची संपूर्ण तपासणी, लघवीतील मायक्रो अल्ब्युमिन्युरिया तपासणी आणि रक्तातील युरिया, क्रिअॅटनिन, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड तपासावे. त्याची नोंद ठेवावी. आपल्या नेहमीच्या फिजिशियनकडून संपूर्ण शारीरिक तपासणी करून घ्यावी.
डोळे हा जसा भावनांचा आरसा आहे, तसाच तो रक्तातील साखरेचे किंवा मधुमेहाचे परिणाम प्रतिबिंबित करणारा मुख्य अवयव आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेच्या होणाऱ्या चढउतारांचा दीर्घकालीन दुष्परिणाम थोड्याच कालावधीत नेत्रतज्ज्ञांना त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये सर्व प्रथम दृश्य स्वरूपात दिसू लागतो. डोळ्यांच्या पडद्यामध्ये मधुमेहामुळे तयार झालेली विकृती ही त्या मधुमेही व्यक्तीची दृष्टी हळूहळू चोरून नष्ट करते. असा झालेला दृष्टीनाश हा लवकर तर लक्षात येत नाहीच, पण अशी गेलेली दृष्टी परत कधीही येत नाही. हे डॉक्टरांनी सांगितलेले सत्य पचवणे सर्वांनाच अवघड जाते. पुष्कळ वेळेस मधुमेही माणूस माझी साखर नियंत्रणात आहे आणि मला काहीच त्रास नाही, अशी बढाईखोर बतावणी करतो. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे टाळतो, परंतु पडद्यामागे रक्तावरील साखरेचे दुष्परिणाम त्याला समजून आलेले नसतात. त्यामुळे अशा व्यक्ती आत्मविश्वासाने बोलत असल्या तरी स्वतःचे आणि स्वतःचे डोळे, किडनी, हृदय आणि मेंदू या अवयवांचे कळत नकळत अपरिमित नुकसान करून घेतात नंतर दुष्परिणाम दिसू लागले की वैद्यकीय तपासणी, औषधोपचार हा खर्च मध्य किंवा उतार वयामध्ये नकोसा वाटू लागतो.
एका अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मधुमेही व्यक्तींचे प्रमाण दर १०० लोकसंख्ये मागे १८ ते २० एवढे जास्त आहे. त्यातील या दुष्परिणामांची जाणीव नसलेल्या आणि बेधडक असणाऱ्या लोकांची संख्या काळजी वाटावी एवढी जास्त आहे.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मधुमेहाबद्दल संवेदनशील असून अशी माहिती आणि या संवेदना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असते. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगितल्याने सर्वांमध्ये या प्रश्नाविषयी जागृती निर्माण होते, असे इन्फिगोला वाटते. मधुमेहाविरुद्धच्या सर्वव्यापी लढ्यामध्ये खारीचा वाटा उचलावा या हेतूने रत्नागिरीमध्ये इन्फिगोने डोळ्यांच्या पडद्यावरील निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया असा सुसज्ज विभाग सुरू केला आहे. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील एकमेव असून डॉ. प्रसाद कामत हे उच्च प्रशिक्षित रेटिना तज्ज्ञ मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या रेटिनाच्या दोषांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध असतात.
कोणत्याही गोष्टीचे वेळीच निदान आणि तपासणी झाली तर पैशाचा आणि वेळेचा नाश वाचवता येतो, हे लक्षात घेवून मधुमेह असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले डोळे रेटिना तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत, अशी आग्रहाची विनंती आणि सूचना इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केली आहे. दिनांक २३ ते ३० मार्च २०२२ हा कालावधी मधुमेह सप्ताह म्हणून पाळला जाणार असून या काळात डॉ. कामत उपलब्ध असणार आहेत. मधुमेह असणाऱ्या प्रत्येकाने पूर्वनोंदणी करून आपल्या डोळ्यांच्या पडद्याची सर्वंकष तपासणी त्यांच्याकडून करून घ्यावी. यामुळे दृष्टीचे पुढील नुकसान टाळता येईल, असे आवाहन ‘इन्फिगो’मार्फत करण्यात आले आहे.
तपासणीसाठी आणि पूर्वनोंदणीसाठी ९३७२७६६५०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

