विठू आले माहेरा – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२३ मार्च २०२२) – विठू आले माहेरा
सादरकर्ती संस्था – सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज २३ मार्च २०२२ रोजी विठू आले माहेरा हे नाटक सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा या संस्थेने सादर केले.

विठू आले माहेरा ही संगीत नाट्यकृती संत एकनाथांचे पणजोबा संत कवी भानुदास यांच्या जीवनावर आधारित आहे. भानुदासांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा असते. प्रत्येक आषाढी एकादशीला ते न चुकता पंढरपूरला जायचे. त्यांची कारभारीण सावित्रीही भानुदासांप्रमाणेच विठ्ठलभक्त असते. पण एक गृहिणी असल्याने विठ्ठलभक्तीबरोबरच प्रपचातही आपल्या नवऱ्याने लक्ष घालावे, असे तिला वाटत असते. परंतु भानुदास विठ्ठलभक्तीने एवढे वेडे झालेले असतात की, त्यांना त्या सावळ्या विठूखेरीज काहीच सुचत नाही. त्यामुळे घरचे दैन्य वाढीस लागते. सावित्रीचे वडील म्हणजेच भानुदासांचे सासरे भानुदासांना कपड्यांचे दुकान थाटून देतात. पण काही काळानंतर तोही धंदा भानुदास सोडून देतात आणि पांडुरंगाच्या सेवेत रुजू होतात. पण पांडुरंग त्यांच्या मित्रमंडळींच्या रूपात त्यांना मदत करतो.

एकदा विठ्ठल मंदिराचा पुजारी नारोभट तीर्थयात्रा करत विजयनगरला जातो आणि विजयनगरचा राजा रामराजा यांच्या राज्यात जाऊन त्यांची भेट घेतो. रामराजा मोठा शूर असतो. राजाई हे त्याचे आराध्य दैवत असते. तो सोन्याच्या दागिन्यांनी तिला मढवतो. राजाईचे मंदिर म्हणजे जणू मोठा राजवाड्याचा थाट असो. जेव्हा नारोभट विजयनगरात जातो, तेव्हा रामराजा त्याचे स्वागत करून आपल्या राजाईचे वैभव मोठ्या गर्वाने करत असतो. पण त्याचबरोबर पंढरीच्या विठ्ठलाची निंदा करतो. पंढरीच्या कोणत्याही वारकऱ्याला हे सहन होणार नसते. नारोभटाचेही नेमके तेच होते. नारोभटही मोठ्या अभिमानाने सांगतो की पांडुरंगाच्या देवळापुढे या राजाईचे देऊळ फार फिके पडेल. राजाला राग येतो. राजा नारोभटाला घेऊन प्रत्यक्ष मंदिर पाहायला पंढरीला येतो. पांडुरंग आपल्याल भक्ताला खोटे कसे ठरवील? राजा पंढरपुरात पोहोचत्याला त्याला कळून चुकते की, पांडुरंगासारखे दुसरे दैवत नाही. सारे मंदिर स्वर्गाप्रमाणे सजविलेले असते. ही सारी पांडुरंगाचीच कृपा. रामराजाला विजयनगरची देवता राजाई पंढरपुरात झाडू मारताना दिसते. तेव्हा राजाला खात्री पटते की, राजाईपेक्षा पांडुरंगच श्रेष्ठ आहे. तेव्हा आपण त्याला सोबत घेऊन गेले पाहिजे. राजा दिवसरात्र भक्ती करून पांडुरंगाला प्रसन्न करून घेतो आणि जेव्हा राजा पांडुरंगाला विजयनगरला येण्याची विनंती करतो, तेव्हा विठ्ठल एका अटीवर ते मान्य करतो. ती अट म्हणजे आपल्या कुठल्याही भक्ताचा छळ राजाकडून झाला, तर तो विजयनगरात राहणार नाही. ती अट मान्य झाल्यावर पांडुरंग रामराजाबरोबर विजयनगरला पोहोचतो. त्यानंतर जेव्हा भानुदास आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो, तेव्हा त्याला सारी हकीगत समजते. मग तो स्वतः पांडुरंगाला आणायला विजयनगरला जातो. कडेकोट पहाऱ्यातून तो पांडुरंगाची भेट घेतो आणि त्याच्या आशीर्वादानेच विठ्ठलमूर्तीची पुन्हा पंढरपुरात प्रतिष्ठापना करतो.

सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा ही संस्था कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेतर्फे गोव्यात नाटकांचे अनेक प्रयोग होतात. गावातील नाट्यप्रेमी तरुण या संस्थेचे सदस्य आहेत. कलेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही संस्थेचा मोठा हातभार असतो. आजपर्यंत या संस्थेने महाराष्ट्र राज्य शासनाच्या नाट्य स्पर्धेत अनेक नाटकांचे सादरीकरण केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील योगी पावन मनाचा, गोव्यातील संत कवी सोहिरोबानाथांच्या जीवनावर आधारित म्हणे सोहिरा, संत कबीर यांच्या जीवनावर आधारित बोल हे कबिरांचे ही संगीत नाटके स्पर्धेत सादर केली गेली. स्पर्धेत प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा तीच नाटके पाहावी लागतात. म्हणूनच ही संस्था दरवर्षी नवीन नाटकांची निर्मिती करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. नवीन विषय घेऊन त्यावर संगीत नाटक लिहून जुन्या, गाजलेल्या नाटकांच्या स्पर्धेत ते सादर करणे तसे जोखमीचे असते. पण संस्था ती जोखीम पत्करून ती यशस्वी करून दाखवते. यावर्षीही सान्वी कला मंचाने विठू आले माहेरा ही अशीच एक नवी नाट्यकृती निर्माण केली आहे.

श्रेयनामावली :
लेखक : महादेव हरमलकर
दिग्दर्शक : जयंद्रनाथ हळदणकर
संगीत दिग्दर्शक आणि ऑर्गनसाथ : शिवानंद दाभोलकर

स्पर्धेचे वेळापत्रक

२४ मार्च – मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, मोरजी, पेडणे, गोवा. शिक्का कट्यार, लेखक : यशवंत नारायण टिपणीस, दिग्दर्शक : साबाजी गं. च्यारी.

२५ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन माझिरे.

२५ मार्च (सायंकाळी ७.०० वाजता) – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.

२६ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत पंढरपूर, लेखक : जगदीश दळवी, दिग्दर्शक : वैशंपायन.

२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply