रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक ‘शिमगोत्सव- प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटातून लवकरच उलगडणार आहे. काव्या ड्रीम मुव्हीजने या माहितीपटाची निर्मिती चालविली असून लेखन-दिग्दर्शन आशीष निनगुरकर यांचे आहे.
कोकणातील शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते. या पालख्या का नाचवतात, कशा नाचवतात, होळी कशी आणतात, गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’ नावाच्या माहितीपटाची निर्मिती होत आहे. या माहितीपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त वांद्री गावातील श्री सोमेश्वर मंदिरात पार पडला.
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा असतो. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिलाची जशी पक्षीण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात. कोकणात शिमगा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे आणि पालखी सजवून ढोल-ताशांच्या गजरात नाचवत साहणेवर आणणे.
समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणामागचा मूळ हेतू आहे. तो ठेवूनच सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र केला जातो. गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करतात.
या साऱ्याचे चित्रण काव्या ड्रीम मुव्हीज व कलादर्पण फाउंडेशन यांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या ‘शिमगोत्सव- प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटामध्ये करण्यात आले आहे. माहितीपटाची संकल्पना विक्रांत गांधी, विकास ताठरे, विनायक सनगर आणि महेश भिंगार्डे यांची असून या माहितीपटाचे संपूर्ण चित्रीकरण वांद्री, उक्षी आणि आंबेड गावात करण्यात आले.
या माहितीपटाचे लेखन-दिग्दर्शन आशीष निनगुरकर यांनी केले असून सिद्धेश दळवी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रतीश सोनवणे, प्रदीप कडू आणि सुनील चौपाल या इतर तंत्रज्ञांनी आपल्या भूमिका समर्थपणे सांभाळल्या आहेत. या माहितीपटासाठी निर्माती अर्चना नेवरेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेंदर्गे आणि निर्माते मंगेश जगताप यांचे सहकार्य लाभले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रीकरणाच्या मुहूर्ताला गजानन डांगे, दिलीप मयेकर, मनोहर डांगे, गजानन सालीम, पुरुषोत्तम रानभरे, सुरेश चोचे, संजय सागवेकर, दिगंबर डांगे, नितीन डांगे, संदेश गांधी, राजेंद्र देसाई, पद्माकर देसाई, गणपत घाणेकर तसेच आंबेड गावातील प्रवीण मुळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रीकरणाच्या वेळची क्षणचित्रे