Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राणी लक्ष्मीबाई शौर्यगाथेच्या हिंदी आवृत्तीचे २९ जानेवारीला प्रकाशन

Advertisements

रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेच्या शौर्यगाथेच्या प्रतीक पुरी यांनी केलेल्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन येत्या २९ जानेवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे.

लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्रजी निंभोरकर यांच्या हस्ते प्रकाशन होईल.

अत्यंत चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि धोरणी, तसेच अंगी नेतृत्व असणाऱ्या लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर अर्थातच झाशीची राणी लक्ष्मीबाई तांबे १८५७ साली हिंदुस्थानात झालेल्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता असे अढळ स्थान लक्ष्मीबाईंना प्राप्त झाले. राणीने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढा दिला. वयाच्या तेविसाव्या वर्षी राणीने वीरमरण स्वीकारले. युद्धात लढता लढता राणीने प्राण गमावला; मात्र तिने शेवटपर्यंत आपल्या साम्राज्यासाठी लढा दिला. त्यामुळेच इतिहासात अभिमानाने राणी लक्ष्मीबाईचे नाव घेतले जाते. राणीने दिलेला लढा इतिहासात अजरामर ठरला आणि अगदी शत्रूलादेखील तिच्या वीरमरणाची दखल घ्यावी लागली आणि कौतुक करावे लागले.

अशा राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेची लेखक अॅड. विलास पाटणे यांच्या शब्दांतून अक्षरबद्ध झालेली शौर्यगाथा पुरी यांनी अनुवादित केली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन सोमवारी, २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र रामराव निंभोरकर (परमविशिष्ट, अतिविशिष्ट, उत्तम युद्धसेना मेडलप्राप्त तसेच उरी एअरस्ट्राइक नेतृत्व) उपस्थित राहणार आहेत.

समारंभाला रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष आणि कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे आणि रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

प्रकाशन सोहळ्याला रत्नागिरीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या सोहळ्याचे निमंत्रक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या विशेष सहभागाने हा कार्यक्रम होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version