राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यगाथेचे रविवारी रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेचे रत्नागिरीत रविवारी (दि. २० नोव्हेंबर) प्रकाशन होणार आहे. ॲड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शिवशाहीतील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राणी लक्ष्मीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव मनकर्णिका तांबे, तर विवाहानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर झाले. तांबे आणि नेवाळकर या दोन्ही घराण्यांची कोलधे आणि कोट ही मूळ गावे लांजा तालुक्यात आहेत. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंचे रत्नागिरी जिल्ह्याशी थेट नाते आहे. हीच राणी लक्ष्मीबाई मेरी झाँसी नाही दूंगी असे म्हणत अवघ्या ६-७ वर्षांच्या मुलाला पाठीवर घेत ४ एप्रिल १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्याबाहेर पडली आणि तिने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. राणी लक्ष्मीबाईंचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ रोजी वाराणसी येथे झाला. झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी लक्ष्मीबाईंचा मे १८४२ मध्ये विवाह झाला. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरामध्ये त्याकाळी देशात ४०० संस्थानिक असताना केवळ राणीने इंग्रजांविरुद्ध अद्भुत आणि रोमांचकारी लढा दिला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी १८ जून १८५८ रोजी राणीने देशाकरिता वीरमरण पत्करले.

रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ, लेखक ॲड. विलास पाटणे यांनी राणी लक्ष्मीबाई यांची ही शौर्यगाथा अक्षरबद्ध केली आहे. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज आणि रायगडच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, व्हॉइस अॅडमिरल अभय कर्वे, गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, शौर्यचक्र विजेते कमांडो पथकाचे प्रमुख मधुसूदन सुर्वे उपस्थित राहणार आहेत. श्री. सुर्वे यांचा अतुलनीय पराक्रम त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधीही समारंभात मिळणार आहे. लक्ष्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. अनुराधा प्रभुदेसाईही या समारंभाला उपस्थित राहणार असून समारंभाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे करतील.

येत्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता मराठा भवन सभागृहात होणार असलेल्या या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply