पु. ल. कला महोत्सवाची रविवारी सांगता

मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने होत असणाऱ्या पु. ल. कला महोत्सवाची सांगता येत्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) होणार असून त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम पार पडणार आहेत.

सांगतेच्या पूर्वसंधअयेला १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णनाथ घुले आणि सहकारी हलगी आणि संबळ जुगलबंदीचा कार्यक्रम सादर करणार असून त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता ओपन कॅफेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनाच आपल्या विविध कलांचे सादरीकरण करता येणार आहे. त्यात कवी, गायक, लेखक, चित्रकार, वादक, अभिनेते, स्टॅंडअप विनोदवीर यांना सहभागी होता येणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता बीड येथील नाट्यवाडा संस्था पाझर हे नाटक सादर करणार आहे.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच अन्य सर्वांसाठी खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांना कागद आणि प्राथमिक रंगसाहित्य दिले जाणार आहे. ही स्पर्धा मोफत असून सर्वांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.

सकाळी १० वाजता आदिनाथ पातकर आणि सहकारी ‘आठवणीतले पु.ल.’ हा कार्यक्रम सादर करतील. विशेष म्हणजे प्रथमच आत्मा मलिक कॉलेजचे आदिवासी विद्यार्थी सायंकाळी ४ वाजता तारपा आदिवासी नृत्य सादर करणार आहेत. सायं. साडेपाच वाजता रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ रवींद्र संगीत आणि बॅंड यांचे सादरीकरण शार्दूल नाईक, आशीष चासकर आणि सहकारी करतील. सायंकाळी साडेसात वाजता मराठी नाट्यसंगीतातील रागदारीचा प्रवास नवोदित तरुण कलाकार उलगडणार आहेत. सांगता समारंभाच्या निमित्ताने रात्री साडेनऊ वाजता होणाऱ्या समूहगानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ने मदतीने परत मातृभूमीला या गीताचे गायन करायचे आहे. यात सहभागी होण्यासाठी ९१६७०७९०६० या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याच्या समूहगानाच्या तयारीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता सर्वांनी अकादमीमध्ये जमावे, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply