रत्नागिरी : येथील दैवज्ञ भवनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्यापासून (दि. १९ नोव्हेंबर) दैवज्ञ हितवर्धक समाज आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा सुरू होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत स्पर्धकांची नोंदणी केली जाणार आहे.
दैवज्ञ भवनात होणार असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन संगमेश्वर दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष दादा सैतवडेकर आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष विजय पेडणेकर म्हणाले की, १९९८ साली स्थापन झालेल्या दैवज्ञ भवनाने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. मुंबईचे जगन्नाथशेठ पेडणेकर यांनी पुढाकार घेऊन या भवनाची निर्मिती केली. त्यासाठी लांजेकर यांनी विनामोबदला जागा दिली. त्या काळात समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान केले. अशा संस्थेचा रौप्य महोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कॅरम स्पर्धेने या उपक्रमांना प्रारंभ होणार आहे. पुढे वर्षभर दरमहा कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महिला, मुले यांच्यासह कला क्रीडा विषयातील उपक्रम, वंचितांना मदत आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा समन्वयक सचिन बंदरकर आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी सांगितले की, अखिल भारतीय कॅरम फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय कॅरम पेडरेशनच्या प्रचलित नियमावलीनुसार स्पर्धा होणार आहे. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून स्थानिक मुलांचा भरपूर सहभाग आहे. मुलींचा सहभागही लक्षणीय आहे. पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी, कुमार-कुमारी गट (१८ वर्षांखालील) आणि किशोर, किशोरी गट (१४ वर्षांखालील) अशा ७ गटात स्पर्धा होईल. ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश नोंदवणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण २९ हजार ५०० रुपयांची बक्षिसे असून विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. सर्व सहभागींना प्रमाणत्र दिले जाणार आहे.
स्पर्धा सुरू होईपर्यंत १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत स्पर्धकांची नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणार आहेत.
पत्रकार परिषदेला दैवज्ञ हितवर्धक समाजाचे कार्याध्यक्ष संतोष भुर्के, विश्वस्त कन्हैय्या वेदक, उपखजिनदार धनेश रायकर, प्रमोद खेडेकर, उपाध्यक्ष सुहास वीरकर, प्रदीप भाटकर आणि उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

