मराठीची सक्ती नव्हे, भक्ती करावी : न्या. अंबादास जोशी

रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.

मराठा भवन येथे अॅड. विलास पाटणे यांच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. मराठी पुस्तके अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत, अशी चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, घरोघरी दर महिन्याला एक तरी मराठी पुस्तक खरेदी करून वाचावे. आपण हॉटेलमधील जेवण कसे होते, यावर चर्चा करतो. मग वाचलेल्या पुस्तकावर का करत नाही? मराठीला बोलण्यात दुय्यम स्थान दिले जाते. वास्तविक मराठी पुस्तकांचे रसग्रहण व्हायला हवे, तरच चोखंदळ वाचकांची चळवळ सुरू राहील. श्री. पाटणे यांच्या पुस्तकाविषयी बोलताना ते म्हणाले, ब्रिटिशकाळात संस्थाने खालसा होताना पेन्शन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते. पण राणीने जिवावर बेतले, तरी प्रतिकूल स्थितीत प्रतिकार केला तो फक्त राष्ट्रवादासाठी. तिने बलिदान केले दिले, ते फक्त स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या स्फुल्लिंगामुळेच. आज देशभक्ती, राष्ट्रभक्ती शिकवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादाचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या सर्वांचे स्मरण करणे आवश्यक आहे, असेही न्या. जोशी म्हणाले.

लेखक ॲड. विलास पाटणे यांनी मनोगतामध्ये झाशीच्या राणीची महती सांगितली आणि हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली हे सांगितले. शिवतर (ता. खेड) येथील शौर्यचक्रविजेते कमांडो पथकाचे प्रमुख मधुसूदन सुर्वे यांनी मंत्रमुग्ध करणारे प्रसंग सांगितले. ते घराण्याच्या चौथ्या पिढीतील सैनिक होते. त्यांनी ऑपरेशन हिफाजत, इंफाळ (मणिपूर) येथील चित्तथरारक माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये त्यांच्या पायात आणि पोटात ११ गोळ्या घुसल्या होत्या. त्या अवस्थेत त्यांना २४ तास उपचारांविना राहावे लागले. कारण परिस्थिती प्रतिकूल होती. प्रचंड पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. तरीही ऑपरेशन हिफाजत यशस्वी झाले. आपला गौरवशाली इतिहास सांगितला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सैनिकांचा इतिहास, वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या रंजक कथा मुलांना पाठ्यपुस्तकातून अभ्यासायला द्यायला हव्यात, अशी अपेक्षा श्री. सुर्वे यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकणात भक्तिभाव आणि लोककला आहेत. राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोकणातील लांजा तालुक्यातील होत्या. त्यांनी झांशीच्या संस्थानात या कलांना प्रोत्साहन दिले. धर्माच्या माध्यमातून संस्कारित पिढी घडवता येईल, हे राणीने ओळखले होते. हा कोकणच्या संस्कारांचाच भाग होता. हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच वापरले जाणार आहे.

व्हाइस अॅडमिरल अभय कर्वे यांनी सांगितले की, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य सर्वांना माहिती आहे. पण अॅड. पाटणे यांनी इत्थंभूत माहिती देऊन पुस्तक सजवले आहे. भारतीय सेनेची तिन्ही दले प्रत्येक क्षणी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहेत. देशसेवा बजावताना ते घरी परत येतीलच, याची शाश्वती नसते. इतर कोणत्याही शासकीय सेवेपेक्षा केवळ सैन्य दलातील सैनिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण अत्यंत प्रामाणिकपणे देशसेवा करत असतात. ती करताना त्यांच्या कुटुंबीयांना ताणतणाव सहन करावा लागतो. सैनिक कधीही हे नाही, ते नाही असे म्हणत नाहीत. असेल त्या स्थितीत ऊन शत्रूला पराजित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. राणी लक्ष्मीबाई या कोकणच्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे हेसुद्धा कोकणातील. त्यांनी पश्चिम किनारपट्टी मराठ्यांकडे राखून ठेवली. कोकणने नेहमीच इतिहासात शौर्य दाखवले आहे. याची जाणीव कोकणवासीयांनी ठेवली पाहिजे.

लक्ष्य फाउंडेशन अध्यक्ष सौ. अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या की, पुणे, कोलकाता, मुंबईप्रमाणे रत्नागिरीतही कारगिल महोत्सव घेण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी रत्नागिरीकरांची साथ हवी आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव युवा पिढीला व्हायला हवी. जनमानसाला कीड लागलेली असताना राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याची कथा मांडावी, असे अॅड. पाटणे यांना वाटणे हे आताच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे लेखन हृदयाला भिडणारे आणि राष्ट्रभक्ती जागवणारे असते हे विशेष आहे.

राणी लक्ष्मीबाईंच्या नेवाळकर घराण्यातील राजू नेवाळकर आणि मुखपृष्ठ साकारणारे गौरव पिळणकर यांचा यावेळी पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे यांनी केले. गायिका ईशानी पाटणकर हिने म्हटलेल्या पसायदानाने सांगता झाली. स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply