Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नगिरीत ११ मार्चला ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन

Advertisements

रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशाहीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत येत्या ११ मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.

सभेत सामाजिक कार्यकर्ते तसेच विचारवंत व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी आणि मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा शिवाजीनगर येथील शासकीय जलतरण तलाव मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे. ही सभा ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’च्या वतीने होणार आहे.

बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अल्पसंख्याक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, सांविधानिक संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांवर निर्माण केलेल्या दबाव, डिजिटल माध्यमांवर निर्माण केलेली हुकमत आदी आजचे कळीचे मुद्दे आहेत; मात्र या मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून मंदिर, मशीद मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य जनतेचे लक्ष वळवले जात आहे. संसदेत मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना मोठ्या प्रमाणावर सांविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे. सरकारी उद्योगांचे खासगीकरण, कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करत बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केले जात आहे. भांडवलदारांच्या हिताचा विचार करून शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित केल्या जात आहेत. शेतीचे कंपनीकरण करण्याचे धोरण, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बनविलेले कायदे बदलून भांडवलदारांच्या हिताचे करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे.
सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपविण्याची प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. अशा परिस्थितीत समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत, समाजिक जाणीव असणारी व्यक्ती, संस्था, संघटना, पक्षांनी शांत न राहता निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारणे गरजेचे आहे. यादृष्टीने प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ हे अभियान महाराष्ट्रभर राबविले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’तर्फे येथे ही सभा आयोजित केली आहे.

या सभेला रत्नागिरी तालुका तसेच संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक अभिजित हेगशेट्ये, दीपक राऊत, बशीर मुर्तुझा, विलास कोळपे, कुमार शेट्ये यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version