रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातल्या वाटद-खंडाळा इथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आज (१९ जुलै) मोर्चा काढला होता. शस्त्रास्त्रांचा कारखाना इथे होणार असून, त्या प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द करावी, अशी या नागरिकांची प्रमुख मागणी आहे.
मोर्चानंतर खंडाळा इथे झालेल्या सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ‘कोणी तरी काही तरी कायदा करील, प्रोजेक्ट आणून अचानक कायद्याचं जाळं टाकून आपली जमीन हडप करणं हा न्याय नव्हे, तर अन्याय आहे. हे एमआयडीसीचं काम नाही. त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. तसंच ते काम करताना लोकांचे प्रश्न, लोकांचं जीवन जगण्याचं साधन, त्याच्याबद्दलचा पर्याय या सगळ्याचा विचार करून जमिनीचा वापर करणं अपेक्षित आहे. परंतु एमआयडीसीची माणसं नेत्यांच्या सांगण्यानुसार वागणारी आणि नेत्यांच्या विकासासाठी काम करणारी झाली असल्याचं पाहण्यात येतं. त्यामुळे सामान्य माणूस म्हणून आपण आता त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यांनी सतत शंकास्पद काम केलेलं असल्यामुळे त्यांच्या योजनांबद्दल साशंकता वाटते.’
विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जुना एक व्हिडिओ दाखवून सरोदे यांनी उपस्थितांना सांगितलं, की त्या वेळी सामंत यांनी नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी या एमआयडीसीबद्दल केली होती. त्यानुसारच आपण आत्ता वागत आहोत. पक्ष बदलल्यावर भूमिका बदलल्याबद्दल सरोदे यांनी सवाल उपस्थित केला. तसंच, सामंत यांनी ग्रामस्थांना चर्चेस बोलावल्यास खुलेपणाने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आपलं म्हणणं मांडावं असंही सरोदे यांनी सांगितलं. शांतताप्रिय कोकणात असे प्रकल्प नकोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Follow Kokan Media on Social Media



