ग्रामीण आवास योजनांमध्ये धामणसे आणि कोतवडे ग्रामपंचायतींना मिळाला प्रथम क्रमांक

रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा मान प्रधानमंत्री आवास योजनेत कोतवड्याला, तर राज्य पुरस्कृत योजनेत पावसला मिळाला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे आज (१९ जुलै) वितरण करण्यात आले. या दोन्ही योजनांमध्ये सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तसेच, तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या ५० लाभार्थ्यांचा रानडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक आणि चावी देऊन सन्मानही करण्यात आला.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कारांमध्ये यशवंत गणपत शेलार (नेवरे) यांना प्रथम, रत्नप्रभा उदय ढवळे (वेळवंड) यांना द्वितीय, तर इंदू लक्ष्मण कोळंबेकर (कोतवडे) यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार विजेत्यांमध्ये विश्वास लक्ष्मण फुटक (कुरतडे) यांना प्रथम, संगीता बबन सावंत (वळके) यांना द्वितीय, तर उज्ज्वला रमेश सुतार (गावखडी) यांना तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले.
गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहायक व लाभार्थी या वेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply