रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला असून, मागच्या वर्षाच्या तुलनेत हे पर्जन्यमान १४ टक्क्यांनी कमी आहे. आतापर्यंत भात आणि नाचणी या पिकांची ८८ टक्के क्षेत्रावर पुनर्लागवड म्हणजेच लावणी पूर्ण झाली आहे. पाऊस आणि संबंधित घटनांमुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. १० जनावरं मृत्युमुखी पडली असून, ७१८ शेतकऱ्यांच्या सुमारे ९९ हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्या व्यतिरिक्त घरं, दुकानं, गोठ्यांचंही कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. पाच-सहा प्रकरणं वगळता अन्य सर्व प्रकरणांमध्ये मदत देण्याचं काम अद्याप झालेलं नाही. बऱ्याच प्रकरणांसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त झालं नसून, काही प्रकरणांमध्ये अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्या व्यतिरिक्त शाळा, अंगणवाड्या, संरक्षण भिंती, रस्ते अशा सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान तब्बल सव्वातीन कोटी रुपयांच्या घरात असून, त्यासाठीही अद्याप अनुदान प्राप्त झालेलं नाही.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

